बोअरवेलची संख्या वाढल्यामुळे भूजल पातळी कमी होते आणि नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया कमकुवत होते. यामुळे अशुद्धता वाढण्याचा धोका अधिक वाढतो.

दाबोळी परिसरातील अतिसाराच्या घटनांबाबत राज्यात वाढती चिंता व्यक्त होत आहे. पर्यटन, शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे; मात्र त्याच वेळी पाण्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसते. विशेषतः बोअरवेल (भूजल) पाण्याचा वाढता वापर आणि त्यातील संभाव्य अशुद्धता ही परिस्थिती अधिकच गंभीर बनवत आहे. हा प्रश्न केवळ आरोग्याचा नाही, तर व्यवस्थापन, नियोजन आणि जनजागृतीचा देखील आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रशासनाचाही याकडे संबंध येतो. दाबोळीतील ३२८ सदनिका असलेल्या प्रभू व्हायलोटा निवासी संकुलातील अतिसार, उलट्या व ताप येणे ही परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. आरोग्य खाते, प्रदूषण नियंत्रण महामंडळ व जलस्रोत खात्यामार्फत सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे, असे सांगण्यात येते. अतिसार (डायरिया) हा एक सामान्य वाटणारा आजार असला तरी त्यामागे मोठे आरोग्य संकट दडलेले असते. दूषित पाणी हे याचे प्रमुख कारण मानले जाते. दाबोळीसारख्या भागात, जिथे काही प्रमाणात अनियमित पाणीपुरवठा आहे, तेथे लोक पर्याय म्हणून बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहतात. मात्र हे पाणी सुरक्षित आहे की नाही, याची खात्री बहुतेक वेळा घेतली जात नाही. संकट ओढवले की धावाधाव करण्याची सरकारी प्रवृत्ती ही नित्याचीच बाब बनली आहे, असे दिसते. इतकेच नव्हे तर २०२२ पासून फक्त १२२ बोअरवेलची नोंदणी होते आणि त्याचवेळी दुप्पट संख्येने म्हणजे २२४ बेकायदा बोअरवेल या कालावधीत खोदल्या जातात, ही बाब एकाही सरकारी खात्याला दोन-तीन वर्षे जाणवली नाही, याला काय म्हणायचे? आकडेवारीनुसार गेल्या वर्षी १६३ बेकायदा बोअरवेल अस्तित्वात होत्या. त्यात तब्बल ६० ची भर वर्षभरात पडली, असाच याचा अर्थ आहे. याचाच अर्थ पुरेसा पाणीपुरवठा करण्यात संबंधित खात्याला यश आलेले नाही.
दाबोळीतील निवासी संकुलातील १५६ लोकांना अतिसार, उलट्या व ताप येण्याची लागण झाली होती. त्यानंतर केवळ दोन प्रकरणे उघडकीस आली, तर गुरुवारी एकही प्रकरण नोंदवले गेले नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या निवासी संकुलात पिण्याचे पाणी व मिनरल पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आले. अतिसारामुळे लहान मुले, वृद्ध आणि कमजोर प्रतिकारशक्ती असलेले नागरिक अधिक धोक्यात येतात. त्यामुळे अतिसाराच्या घटनांकडे केवळ किरकोळ आजार म्हणून न पाहता, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा संकेत म्हणून पाहणे आवश्यक आहे. दाबोळीमध्ये होणारा बोअरवेल पाण्याचा वापर वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे नियमित पाणी पुरवठ्याचा अभाव. भूजल सहज उपलब्ध असल्यामुळे ते स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय ठरतो. मात्र यामध्ये काही गंभीर धोके दडलेले आहेत. जर बोअरवेलजवळ सेप्टिक टँक, गटार किंवा सांडपाण्याचे स्रोत असतील, तर तेथील जिवाणू भूजलात झिरपू शकतात. ई कोलाइ, साल्मोनेला यांसारखे जीवाणू अतिसार, टायफॉइड आणि कॉलरासारख्या आजारांना कारणीभूत ठरतात. काही वेळा भूजलात नायट्रेट, फ्लोराइड किंवा जड धातूंचे प्रमाण जास्त असते. हे दीर्घकालीन आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. विशेषतः लहान मुलांमध्ये ब्लू बेबी सिंड्रोमसारखे आजार नायट्रेटमुळे होऊ शकतात, असे वैद्यकीय शास्त्र सांगते. बोअरवेलची संख्या वाढल्यामुळे भूजल पातळी कमी होते आणि नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया कमकुवत होते. यामुळे अशुद्धता वाढण्याचा धोका अधिक वाढतो. गोव्यात लवकरच पावसाळा सुरू होईल, त्यावेळी परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. मुसळधार पावसामुळे गटारांचे पाणी, कचरा आणि सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळते. विशेषतः बोअरवेल किंवा उघड्या विहिरी जवळपास असतील, तर त्यात अशुद्धता झपाट्याने वाढते. त्यामुळे पावसाळा हा अतिसाराच्या साथीचा हंगाम ठरतो. याकडे आरोग्य खात्याने लक्ष द्यायला हवे. पाणीपुरवठ्याची नियमित तपासणी आणि देखभाल बोअरवेल पाण्याचे नमुने तपासणे ही जबाबदारी सरकारवर आहे.
दाबोळीतील परिस्थिती ही केवळ एका भागापुरती मर्यादित नाही, तर काही भागांत असे घडू शकते. यावर उपाय म्हणून सुरक्षित आणि नियमित पाणीपुरवठा व्यवस्था, भूजल व्यवस्थापनाचे कठोर नियम, स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन सुधारणा करण्याबरोबरच लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे असे उपाय करावे लागतील. हा प्रश्न केवळ वैद्यकीय नाही, तर सामाजिक आणि प्रशासनिक आहे. वेळेत योग्य उपाययोजना केल्यास ही परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते; अन्यथा भविष्यात मोठ्या साथीचा धोका नाकारता येत नाही.