
शालान्त मंडळाने घेतलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. हा निकाल अपेक्षेप्रमाणे भरघोस लागला आहे. बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढत ती ९२.६६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वेळेपेक्षा यंदाचा निकाल २ टक्के अधिक लागला आहे. यात पुन्हा नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे.
दहावी व बारावीचा निकाल हा शैक्षणिक कारकिर्दीतील महत्वाचा टप्पा असतो. पूर्वी दहावी व बारावीचे निकाल मे अखेरीस जाहीर व्हायचे. यंदा मात्र ते बरेच लवकर जाहीर झाले आहेत. यामुळे पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश तसेच इतर निर्णय घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक तो अवधी मिळणार आहे.
पूर्वी दहावी व बारावीची गुणवत्ता यादी जाहीर केली जायची. दहावीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांचा गौरव केला जायचा. बारावीत कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक मिळून प्रत्येक शाखेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या पंधरा विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर व्हायची. आता गुणवत्ता यादी जाहीर होण्याची प्रथा बंद झाली आहे. तसेच कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रम सोडले तर कायदा, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी अशा सर्व अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या प्रवेश परीक्षांच्या आधारे विविध महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. यामुळे बहुसंख्य हुशार विद्यार्थ्यांचे लक्ष बारावीपेक्षा प्रवेश परीक्षांकडे असते. ‘नीट’, ‘आयआयटी,’ ‘जेईई’, ‘बिटसॅट’ या प्रवेश परीक्षा आता होणार आहेत. केवळ दहावी, बारावी वा पदवीच्या गुणांवर आता नोकरी मिळत नाही. एल.डी.सी., यू.डी.सी., शिक्षक पदांसाठी आता कर्मचारी भरती आयोगाची परीक्षा द्यावी लागते. याशिवाय प्रशिक्षण तसेच कामाचा अनुभवही महत्त्वाचा ठरतो. यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणांचे महत्व कमी होत आहे. तरीही या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील इयत्तेत प्रवेश मिळत असतो. गोव्यात आता आयआयटी, एनआयटी, बिट्स पिलानी, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कृषी महाविद्यालय अशा मान्यताप्राप्त संस्था सुरू झाल्या आहेत. याशिवाय आता खासगी विद्यापीठेही येणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे वर्गही सुरू झाले आहेत. अभ्यासक्रम व महाविद्यालयांची संख्या वाढत असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झालेली आहे. याशिवाय आयटीआयसह कौशल्य प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पालक तसेच शिक्षकांशी चर्चा करून योग्य शाखा किंवा महाविद्यालयाची निवड करायला हवी. आपली आवड, क्षमता व संधींचा विचार करायला हवा. सरकारने सुरू केलेल्या करिअर मार्गदर्शन उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला हवे. परीक्षेच्या तयारीबरोबर करिअरचाही विचार करायला हवा.
- गणेश जावडेकर