अपयशाच्या भीतीवर मात करणे

तुमच्या जीवनातील विविध परिस्थितींचा वापर स्वतःला बळकट, चांगले बनवण्यासाठी केला जाऊ शकतो किंवा तुम्ही बसून रडू शकता. हा पर्याय तुमच्याकडे आहे. काहीही झाले तरी, तुमच्या जीवनातील सर्वात भयानक घटना देखील तुमच्या विकासासाठी, कल्याणासाठी वापरली जाऊ शकते.

Story: विचारचक्र |
22nd March, 10:32 pm
अपयशाच्या भीतीवर मात करणे

सद्गुरू : अपयश अशी कोणतीही गोष्ट नसते. अपयश ही एक संकल्पना आहे, कारण यश ही देखील एक मूर्ख संकल्पना आहे. हे जग बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, स्वतःची संकल्पना बदला. जर तुम्ही ती बदलली, तर सर्वकाही उत्तम आहे. जर तुम्ही रस्त्यावरचे एक भिकारी असता, तर आज रेस्टॉरंटमध्ये जाऊन मसाला डोसा खाऊ शकलात, तर हे तुमच्या यशाचे शिखर आहे, असे आहे की नाही? तर तुम्ही एका सामाजिक परिस्थितीत अडकला आहात आणि यशाची संकल्पना ही तुमची स्वतःची संकल्पना सुद्धा नाही, मग मी तुम्हाला याचे श्रेय का देत आहे? यश म्हणजे काय आहे याची संकल्पना दुसऱ्याने ठरवलेली आहे, असे आहे की नाही? तुमच्याकडे असलेली प्रत्येक संकल्पना, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना किंवा प्रत्येक मूल्य कुठूनतरी घेतले जाते आणि ते तुम्हाला आतून नियंत्रित करते. तुमचा धर्म, तुमचा समाज आणि तुमची संस्कृती तुम्हाला असे मानण्यासाठी प्रशिक्षित करते की, हेच ते सर्वकाही आहे. तुम्ही कोणा दुसऱ्याच्या संकल्पनेचे गुलाम बनू नका; हेच पहिले आणि सर्वात महत्त्वाचे यश आहे. यश आणि अपयश तुमच्या जीवनात येणाऱ्या पैशाच्या प्रमाणात ठरत नाही; यश आणि अपयश तुम्हाला या जगात मिळणाऱ्या मान्यतेवर अवलंबून नाही. तुम्हाला जर नरकात देखील आनंदाने कसे चालायचे हे माहित असेल, तर तुम्ही या जीवनात यशस्वी आहात.

जो या जीवनाकडे मोठ्या शक्यतेसाठीची एक पायरी म्हणून पाहतो, त्याच्यासाठी अपयश असे काही नसते. जो या जीवनातील साध्या घटनांना जीवनाचे ध्येय म्हणून पाहतो, त्याच्यासाठी अपयश आणि यश अस्तित्वात असते. जर तुम्ही या जीवनाकडे केवळ मोठ्या शक्यतेसाठीची एक पायरी म्हणून पाहत असाल, तर मग तुमच्याकडे एखादा चांगला सौदा असो किंवा वाईट - परिस्थिती कोणत्याही प्रकारची असो, मग ते सुंदर आणि खूप उपयुक्त आहे; तुम्ही ते स्वतःच्या कल्याणासाठी वापरता.

एकदा एक शेतकरी होता, जो त्याच्या पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम करणाऱ्या विविध नैसर्गिक घटकांना कंटाळला होता. म्हणून एके दिवशी त्याने शिवाला बोलावले आणि म्हणाला, ‘मी या सगळ्या नैसर्गिक मूर्खपणामुळे कंटाळलो आहे; अर्थातच तू शेतकरी नाहीस. मला माहित आहे की, पूर्वी तू शिकारी होतास. तुला शेतीचा अर्थ माहित नाही, मग तू निसर्ग माझ्या हाती का सोपवत नाहीस? मी एक शेतकरी आहे. मला माहित आहे की, पाऊस कधी पडावा; मला माहित आहे की, सूर्यप्रकाश कधी पडावा; मला माहित आहे की, वारा कधी वाहावा; मला सगळं काही माहित आहे. तुला माहित नाही, कारण तू फक्त एक शिकारी आहेस आणि एक वेडा तपस्वी आहेस. तू नक्कीच एक चांगला शेतकरी नाहीस. इथे चुकीच्या वेळी पाऊस पडत आहे, सर्व काही चुकीच्या वेळी घडत आहे; तू ते माझ्यावर सोड.’ शिव अशाच कुठल्या तरी धुंदीत होता; तो म्हणाला, ‘ठीक आहे, निसर्ग तुझ्या हातात दिला आहे.’ मग शेतकऱ्याने त्याच्या पिकाचे नियोजन केले. तर तो म्हणाला ‘पाऊस'. बोटाने जमीन उकरून पाहतो, 'ठीक आहे, सहा इंच भिजलं आहे,' 'थांब.' मग त्याने त्याचे शेत नांगरले आणि मक्याचे बी लावले आणि दोन दिवस वाट पाहिली, 'पाऊस', नंतर 'सूर्यप्रकाश.' आज मी शेतात काम करत आहे म्हणून, 'ढग'. तर सर्वकाही त्याच्या इच्छेनुसार घडले, मक्याचे सुंदर पीक आले. तो खूप आनंदी झाला. 'बघ, हे चांगलं आहे; निसर्ग शेतकऱ्याच्या हातात असावा.'

आणि मग जेव्हा कापणीची वेळ आली, तेव्हा पीक खाण्यासाठी पक्षी येऊ नयेत याची त्याला खात्री करायची होती. त्याला याबद्दल आश्चर्य वाटले, कारण जेव्हा त्याने म्हटले, 'पक्षी नको' - तेव्हा पक्षी आले नाहीत. तर तो मक्याची कापणी करण्यासाठी त्याच्या शेतात गेला, पण जेव्हा त्याने पिकाकडे पाहिले, तेव्हा कणसांमध्ये दाणे नव्हते. मग त्याला वाटले 'हे काय आहे? मी काय चूक केली?' तो ते समजू शकला नाही, कारण त्याने सर्वकाही योग्यप्रकारे व्यवस्थापन केले होते - पाऊस, पाणी आणि सूर्यप्रकाश. मग तो शिवाकडे परत गेला आणि विचारले, 'मी सर्वकाही बरोबर केले, पण धान्य नाही. तू माझ्या पिकाची नासधूस केलीस की काय?' शिव म्हणाला, 'मी फक्त पाहत होतो; तूच सर्वकाही सांभाळत होतास, म्हणून मला हस्तक्षेप करायचा नव्हता. पाऊस पुरेसा होता, सूर्यप्रकाश पुरेसा होता, सर्व काही ठीक होते, पण तू सगळे वारे थांबवलेस. मी नेहमीच जोरदार वारे पाठवायचो, जे तुझ्या पिकाला धोका निर्माण करायचे, त्यामुळे झाडांना धक्का बसायचा आणि धोका जाणवत असल्याने स्वतःची मुळे ते जमिनीत खोलवर रुजवायचे आणि त्यामुळे धान्य तयार व्हायचे. आता तुझ्याकडे मक्याचे चांगले पीक आहे, पण मक्याचे दाणे नाहीत.'

मक्याच्या पिकाने स्वतःला बळकट करण्यासाठी वाऱ्यांचा वापर केला, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील विविध परिस्थितींचा वापर स्वतःला बळकट आणि चांगले बनवण्यासाठी केला जाऊ शकतो किंवा तुम्ही बसून रडू शकता. हा पर्याय तुमच्याकडे आहे. काहीही झाले तरी, तुमच्या जीवनातील सर्वात भयानक घटना देखील तुमच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी वापरली जाऊ शकते. तुमच्या जीवनातील लहान घटना - तुमचा व्यवसाय, तुमचे लग्न, तुमची मुले या सर्व गोष्टी फक्त एक पायरी आहेत. हे तुमच्यासाठी नवीन नाही, कारण या संस्कृतीत ते हजारो वर्षांपासून तुमच्यात हे ओतत आहेत; ते तुम्हाला सांगत होते, 'तुमचे जीवन मुक्तीबद्दल आहे. तुमचे लग्न, तुमचा व्यवसाय, तुमचे सामाजिक जीवन - हे सर्व फक्त तिथे पोहोचण्याचे साधन आहे. तुम्ही त्याच्यासोबत जा किंवा त्याच्याशिवाय जा, तुम्ही संन्यासी असाल किंवा तुम्ही संसारी असाल, तुमचे एकमेव ध्येय मुक्ती आहे.'


सद्गुरू

(ईशा फाऊंडेशन)