जग होरपळून निघण्याची चिन्हे !

पश्चिम आशियातील युद्ध हा केवळ एका प्रदेशाचा प्रश्न नाही; तो जागतिक परिणाम घडवणारा संघर्ष आहे. त्यामुळे या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून आवश्यक ती पावले उचलणे, हीच काळाची गरज आहे. अन्यथा, या युद्धाच्या ज्वाळा केवळ सीमारेषांपुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण जगाला होरपळून काढतील

Story: विचारचक्र |
23rd March, 10:29 pm
जग होरपळून निघण्याची चिन्हे !

पश्चिम आशियातील युद्धाने चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे आणि या संघर्षाचे पडसाद आता केवळ युद्ध क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. या युद्धाच्या ज्वाळा हळूहळू जगभर पसरत आहेत आणि त्याची तीव्रता भारतीयांच्या दैनंदिन जीवनातही जाणवू लागली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत दूरवर घडणाऱ्या या घटनांकडे आपण केवळ बातमी म्हणून पाहत होतो; मात्र आज त्याचे परिणाम आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत, अगदी स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे हे युद्ध आता केवळ 'त्यांचे' राहिलेले नसून 'आपले' झाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तेलाचे वाढते दर, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसची टंचाई, तसेच कृषी हंगामाच्या तोंडावर खतांच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता या सर्व गोष्टींनी सामान्य नागरिकांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा परिणाम वाहतूक खर्चावर होतो आणि त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात. परिणामी महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसतो. आधीच आर्थिक ताण सहन करणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण ठरू शकते.

या संकटाचा परिणाम केवळ घरगुती जीवनावरच नाही, तर उद्योग-व्यवसायांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः हॉटेल आणि पर्यटन उद्योगाला याचा जबरदस्त फटका बसत आहे. गॅस आणि इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे व्यवसायाचा खर्च वाढला आहे, तर ग्राहकांची संख्या घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोव्यासारख्या पर्यटनप्रधान राज्यांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर भासते. काही लहान-मोठ्या हॉटेलांवर तात्पुरते बंद पडण्याची वेळ आली आहे, तर काही व्यावसायिक भविष्याबाबत साशंक झाले आहेत.

युद्ध लांबत चालल्याने पुढे काय होईल, याचा विचार प्रत्येक सुजाण नागरिक करू लागला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महागाईचा भस्मासुर पुन्हा एकदा आ वासून उभा राहील आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडेल, ही भीतीही व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार कोणती ठोस आणि दूरदृष्टीची पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळासोबत घेतलेली आपत्कालीन बैठक अत्यंत महत्त्वाची ठरते. देशभरात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि इतर आवश्यक इंधनांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी काटेकोर नियोजन करणे ही काळाची गरज आहे. यासोबतच खतांच्या उपलब्धतेवरही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, कारण कृषी क्षेत्रावर त्याचा थेट परिणाम होतो. शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळाले नाही, तर उत्पादन घटण्याचा धोका निर्माण होतो, आणि त्याचा परिणाम पुढील अन्नसाखळीवर होतो. सध्याच्या परिस्थितीत केवळ पुरवठा सुरळीत ठेवणे पुरेसे नाही, तर आवश्यक वस्तूंची काळाबाजार आणि साठेबाजी रोखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. इतिहास साक्षी आहे की अशा संकटाच्या काळात काही घटक नफेखोरीच्या उद्देशाने बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करतात. जर या बाबीकडे दुर्लक्ष झाले, तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. म्हणूनच प्रशासनाने कठोर पावले उचलून बाजारातील संतुलन राखणे गरजेचे आहे.

अशा काळात राज्य सरकारांची भूमिकाही येथे तितकीच महत्त्वाची ठरते. केवळ केंद्र सरकारवर अवलंबून न राहता, राज्यांनी स्थानिक पातळीवर प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन, पुरवठा यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी समन्वयाने काम केल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे आणि अफवांना आळा घालणे हीदेखील प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे. या युद्धाने आणखी एक महत्त्वाचा पैलू उघड केला आहे तो म्हणजे, जागतिक राजकारणाची गुंतागुंत. अमेरिकेची भूमिका, इराणचा पवित्रा आणि इतर राष्ट्रांचे धोरण यामुळे हा संघर्ष अधिकच क्लिष्ट बनला आहे. अनेकजण या परिस्थितीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोष देताना दिसतात. मात्र, जागतिक राजकारण हे एका व्यक्तीच्या निर्णयांपुरते मर्यादित नसते. त्यामागे अनेक आर्थिक, सामरिक आणि राजनैतिक हितसंबंध गुंतलेले असतात. या संघर्षात इराणबद्दल सहानुभूती निर्माण होताना दिसते. एखाद्या क्रीडा सामन्यात मग तो क्रिकेट, फुटबॉलचा असो वा अन्य कोणताही असो, जसे दुर्बल, कमजोर संघाला प्रेक्षकांचा हमखास पाठिंबा मिळतो, त्याचप्रमाणे येथेही अनेक देश आणि नागरिक इराणकडे सहानुभूतीने पाहत आहेत. नुकत्याच संपलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड-नेपाळ, दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान, भारत-अमेरिका अशा अनेक सामन्यांत आपण हे अनुभवले आहे. अमेरिका-इराण युद्धात सध्या जागतिक स्तरावर तेच चित्र आम्हाला दिसत आहे.

परंतु वास्तव हे आहे की, युद्धात कोणाचाही खरा विजय होत नाही. या संघर्षाचा शेवट कधी आणि कसा होईल, हे सांगणे कठीण आहे. मात्र, तो जितका लांबेल तितके त्याचे दुष्परिणाम अधिक तीव्र होतील, हे निश्चित. इराणचे जगाच्या नकाशावरील अस्तित्वच मिटवण्याचा निर्धार अमेरिका-इस्रायलने केलेला दिसतोय तर निम्मे नेतृत्व युद्धात गमावल्यानंतरही ट्रम्प ज्या भ्रमात आहेत, ते कदापि होणार नाही असे इराण सांगत आहे. त्यामुळे लांबलेले युद्ध लगेच थांबेल, अशी अपेक्षा बाळगता येणार नाही. या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामान्य नागरिकांची भूमिका. संकटाच्या काळात संयम, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव अत्यंत आवश्यक असते. अनावश्यक साठेबाजी टाळणे, अफवांवर विश्वास न ठेवणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे या छोट्या गोष्टी मोठा फरक घडवू शकतात. आजची गरज आहे ती घाबरण्याची नाही, तर सजग राहण्याची. परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य नियोजन, दूरदृष्टी आणि सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर कोणतेही संकट पार करता येते. सरकार, प्रशासन आणि नागरिक या तिन्ही घटकांनी एकत्रितपणे काम केले, तर या आव्हानालाही आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो. पश्चिम आशियातील युद्ध हा केवळ एका प्रदेशाचा प्रश्न नाही; तो जागतिक परिणाम घडवणारा संघर्ष आहे. त्यामुळे या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून आवश्यक ती पावले उचलणे, हीच काळाची गरज आहे. अन्यथा, या युद्धाच्या ज्वाळा केवळ सीमारेषांपुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण जगाला होरपळून काढतील आणि त्या झळा प्रत्येकाच्या आयुष्यात जाणवतील, यात मुळीच संदेह नाही.


वामन प्रभू

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९