युद्ध थांबवण्याचीच गरज

इराणला रशिया, चीन, सिरियासारख्या देशांचा युद्धात थेट सहभाग दिसत नाही. अमेरिकेच्या दबावाला बळी पडू नये, अशा भूमिकेत हे देश आहेत. पण बहुतांश देशांची सध्या युद्ध नको, हीच भूमिका आहे. त्यातच सर्वांचे भले आहे.

Story: संपादकीय |
23rd March, 10:31 pm
युद्ध थांबवण्याचीच गरज

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्षात गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेला तणाव निवळण्याची चिन्हे अद्याप दिसत नसली, तरी अमेरिकेने घेतलेल्या एका ताज्या निर्णयामुळे जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची प्राथमिक चर्चा फलदायी झाल्याचे नमूद करत, इराणच्या वीज प्रकल्पांवरील प्रस्तावित लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी पुढे ढकलण्याचे आदेश लष्कराला दिले आहेत. ​जरी हा निर्णय तात्पुरता दिलासा देणारा असला, तरी युद्धाचे सावट पूर्णपणे हटलेले नाही. पण हे युद्ध कामयचेच थांबायला हवे. 

इराणने तर होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे अमेरिकेसह जगातील अनेक देशांवर तेल पुरवठ्यामुळे संकट उभे आहे. अमेरिकेने इराणला होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी दबाव आणत इराणचा वीज प्रकल्प उद्ध्वस्त करू, असा इशारा दिला. इराणनेही प्रत्युत्तर दिले. पण या दोघांमधील वाढत्या तणावामुळे भारतासह अनेक देशांमध्ये तेल, गॅस पुरवठ्याच्या संकटाचे सावट आहे. विशेष म्हणजे जगातील २० टक्के तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होर्मुझच्या मार्गे होते. इराणने तिथे काही निर्बंध घातल्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक देशांमध्ये तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वी ज्या कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ७० डॉलरच्या आसपास होत्या, त्या युद्ध सुरू झाल्यानंतर १०० डॉलरपेक्षा जास्त झाल्या. ट्रम्प यांच्यावर त्यांच्याच देशातून युद्ध थांबवण्यासाठी दबाव येत आहे. कालपर्यंत अमेरिका आणि इराण एकमेकाला चिथावण्याचीच भाषा करत होते. म्हणजे ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांची मुदत दिल्यानंतर इराणही गप्प बसला नाही. इराणने थेट पश्चिम आशियातील अमेरिकन लष्करी तळांना वीजपुरवठा करणाऱ्या वीज प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली. इस्रायलनेही युद्ध अजून काही दिवस सुरू राहील असे म्हटले आहे. इराणच्या धमकीचा मोठा परिणाम होईल असे दिसत नसले, तरी अमेरिकेने इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा दिलेला इशारा इराणला त्रासदायक ठरू शकतो. इस्रायलने युद्ध सुरूच ठेवले तर इराणसह त्याच्यासोबत असलेल्या देशांनाही परिणामांच्या झळा सोसाव्या लागतील. या दोन्ही देशांतील संघर्ष संपविण्यासाठी इतर देशांनी प्रयत्न केले नाहीत, तर त्याची किंमत जगाला मोजावी लागेल. होर्मुझच्या मार्गाने येणारी तेल, वायूची वाहतूक इराणने पूर्णपणे रोखली तर अनेक देश संकटात येतील. त्यामुळेच या युद्धाला पूर्णविराम देणे गरजेचे आहे. 

युद्धात आतापर्यंत इराण आणि इस्रायलचे झालेले नुकसान हे अमाप आहे. इराणने आपले मोठे राजकीय नेते गमावले आहेत आणि अनेक निष्पाप नागरिकांचाही बळी गेला आहे. त्यामुळे हे युद्ध थांबावे, अशीच जगाची मागणी आहे. कारण फक्त तेल आणि गॅसचाच पुरवठा नव्हे, तर इराण आणि आखाती देशातून अनेक गोष्टींची आयात-निर्यात जगभरात होत असते ज्यात खते, औषधे, धातू, रसायनांचा आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. भारत जगातील मोठ्या देशांना औषधांची निर्यात करतो, मात्र युद्ध सुरूच राहिले तर आखाती देशातील काही मार्गांवर निर्बंध येऊ शकतात. सध्या तेलांच्याच नव्हे तर खतांच्या किमतीही वाढल्याची झळ काही देशांना बसत आहे. इराणने जे क्षेपणास्त्र हल्ले अमेरिकेच्या लष्करी तळांवर केले, त्यातून अनेक आखाती देशांचे मोठे नुकसान होत आहे. युएई, कतार, कुवेत, सौदी अरेबिया, ओमानसारख्या ठिकाणी असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांमुळे किंवा काही देश सामुद्रीधुनीजवळ असल्यामुळे इराणच्या कारवाईमुळे नुकसानग्रस्त झाले आहेत. या गोष्टींमुळे आखाती देश नाराज आहेत, पण ते एकट्या इराणवर नाहीत तर अमेरिकेच्या कारवायांमुळेही नाराज आहेत. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे तेल, गॅस वाहतुकीवर परिणाम झाले, जहाज वाहतूक धोक्यात आली, विमा क्षेत्रात आणि गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली. या युद्धामुळे फक्त इराण, इस्रायल, अमेरिकेचेच नव्हे तर जगाचे नुकसान होत आहे. इराण आपल्या पद्धतीने होर्मुझचा मार्ग बंद करून अमेरिकेवर दबाव आणत आहे, पण त्यातून बोध घेऊन युद्ध न थांबवता तिन्ही देश एकमेकांच्या विरोधातील कारवाया करतच सुटले आहेत. इराण तसा एकाकी दिसत असला तरी त्या देशातील बंडखोर त्यांच्या मदतीला आहेत. त्यांनीच आतापर्यंत इस्रायल-अमेरिकेला प्रत्युत्तर देणे सुरू ठेवले आहे. इराणला रशिया, चीन, सिरियासारख्या देशांचा पाठिंबा असला तरी त्यांचा थेट सहभाग दिसत नाही. अमेरिकेच्या दबावाला बळी पडू नये, अशा भूमिकेत हे देश आहेत. पण बहुतांश देशांची सध्या युद्ध नको, हीच भूमिका आहे. त्यातच सर्वांचे भले आहे. हे युद्ध थांबले नाही तर बऱ्याच देशांवर महत्त्वाच्या गोष्टींसाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ शकते.