सांगे शहरात शेकडो वर्षांपासून मुस्लिम समाजाचे वास्तव्य असून, इथल्या वार्षिक शिगमोत्सवात फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला पारंपरिक लोककलाकारांचा मेळ सुवारीवादन करण्यासाठी पिराच्या दर्ग्याच्या ठिकाणी जात असल्याने, धार्मिक सलोख्याचे दर्शन घडायचे.

गोव्यातील सर्वाधिक भौगोलिक आणि सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या सांगे तालुक्याचे २९ महसुली गावांसह आजच्या घडीस ५२३.३६ चौ.कि.मी. इतके क्षेत्रफळ आहे. २०११ साली सांगे तालुक्याचे विभाजन केल्यावर त्यातून दक्षिण गोव्यातला बारावा आणि १६ महसुली गावांनी युक्त आणि ३६४.६४ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेला धारबांदोडा तालुका अस्तित्वात आला. दक्षिण गोव्यातल्या काणकोण, केपे, धारबांदोडा आणि फोंडा या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या जोयडा आणि कारवार तालुक्यांशी सीमा भिडलेल्या सांगे तालुक्याचा जुन्या काळी व्यापार, उद्योगानिमित्त दिघी, कुंडल, देव, तिनई, ब्रागांझा या घाटमार्गाद्वारे कर्नाटकातील प्रदेशांशी संबंध प्रस्थापित झाले होते. उगे गावातून जुनागडाच्या पायथ्याहून जाणाऱ्या दिघी घाटातूनच बराच व्यापार, उद्योग चालू असला पाहिजे, कारण याच मार्गाचा उपयोग करून जुन्या काळी गोवा कदंबाची घाटमाथ्यावरची राजधानी असणाऱ्या हळशी (प्लासिका) त्याचप्रमाणे तत्पूर्वी कुंभारवाडा जोयडाहून कदंबाची पूर्वाश्रमीची राजधानी असणाऱ्या वनवाशीला जाणे शक्य होते. त्यामुळे गोवा मुक्तीनंतर दिघी आणि कुंडल घाटमार्गातून चालणारा व्यापार आणि उद्योग नवा रेल्वे मार्ग आणि महामार्गाच्या निर्मितीमुळे रोडावला. डिसेंबर १८८१ ते जानेवारी १८८८ पर्यंत बाग्रांझा घाटातून रेल्वेमार्ग खुला झाल्याने कॅसलरॉक ते कुळे येणाऱ्या घाटमार्गाचा उपयोग कमी कमी होत गेला. गोवा सरकारच्या १९९९ साली सांगे तालुक्यातील २११ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या नेत्रावळी अभयारण्याच्या निर्मितीमुळे आणि कर्नाटकाच्या काळी व्याघ्र राखीव क्षेत्राच्या अधिसूचनेमुळे आज दिघी आणि कुंडल घाटमार्ग विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत. आज सांगे तालुक्याचे जसे विभाजन झालेले आहे, तसेच जुन्या काळी सांगे तालुका हेमाडबार्से आणि अष्टाग्रहार अशा दोन तालुक्यांत विभागला होता. आज सांगे तालुक्यात येणारा उगे जुन्या काळी हेमाडबार्से महालाचा शेवटचा गाव ठरला होता. येथील सिद्धेश्वर देवस्थानच्या पंचायतनात येणारा हेमाडदेव हा गोवा कदंब नृपती शिवचित्त पेरमाडीदेव याचे रूप मानले जायचा.
सौंदेकर राजाकडे दक्षिण गोव्यातील नव्या काबिजादीतला जो प्रदेश यायचा त्यात धारबांदोड्यासह सांगे तालुका १७९१ साली पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. त्यामुळे आजच्या सांगे महालाचा विचार करताना २९ महसुली गावांचा विचार करणे योग्य आहे. आज या महालाचे मुख्यालय म्हणून ओळखले जाणारे सांगे शहर शेकडो वर्षांपासून दिघी, देव, कुंडल घाटमार्गांनी आजच्या कर्नाटक राज्यातील प्रदेशांशी जोडले होते. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाशी संबंध दर्शवणाऱ्या असंख्य पुरातत्वीय खाणाखुणांचा वारसा या शहरात आढळतो. दिघी घाटातून उगम पावणारी उगे आणि कुर्डी गावाची जीवनदायिनी असणाऱ्या गुळेली या दोन नद्यांच्या संगमावर एकेकाळी इथल्या लोकमानसाचे श्रद्धास्थान ठरलेले संगमेश्वराचे मंदिर, रामनाथ, पाईकदेव आणि वारकरी संप्रदायाचा प्रणेता असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या आशीर्वचनात हे शहर नावारूपास आले होते. सांगे शहरात शेकडो वर्षांपासून मुस्लिम समाजाचे वास्तव्य असून, इथल्या वार्षिक शिगमोत्सवात फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला पारंपरिक लोककलाकारांचा मेळ सुवारीवादन करण्यासाठी पिराच्या दर्ग्याच्या ठिकाणी जात असल्याने, धार्मिक सलोख्याचे दर्शन घडायचे.
दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला संपन्न होणाऱ्या गवळादेवीच्या वार्षिक जत्रेमुळे उगेमार्गे मायरा येथे जाण्यासाठी ज्या दिघी घाटाचा उपयोग होतो, त्याच घाटातून बाजीराव पेशव्यांचा मेहुणा व्यंकटराव घोरपडे, दादाजीराव भावे नरगुंदकर, जिवाजी शिंदे आदी मातब्बर सरदारांसह २३ जानेवारी १७३९ रोजी मराठ्यांच्या सैन्यासह साष्टीत उतरल्याची नोंद ‘पोर्तुगेज मराठे संबंध’ या ग्रंथात डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांनी केलेली आहे. दिघी घाटातून मराठे सैन्य उगेपर्यंत आले आणि तेथून सांगे, कुसमण व तलवडे या मार्गाने साष्टमध्ये शिरले, असे त्यांनी नमूद केलेले आहे.
१८५८ पूर्वी १७ मैलावरच्या कर्नाटकातील सुपा प्रांतात गोव्यातील मिठाची वाहतूक मद्रास प्रेसिडन्सीकडे करण्यासाठी दिघी घाटाचा वापर करत असल्याचा संदर्भ ब्रिटिशांच्या ‘कॅनरा गॅझेटियर’मध्ये आढळतो, त्यावरून या घाटाचे आर्थिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे. उगेमार्गे दिघी, नेत्रावळीहून कुंडल आणि भाटीजवळच्या कुंभारी गावातून जाणाऱ्या देवघाटाशिवाय नेत्रावळीतून वेर्ले, कणगे, कुडणे येथून जोयडा जाण्यासाठी जुना घाट मार्ग अस्तित्वात होता. गोव्यात जुन्या काळी हविग ब्राह्मणांची वस्ती होती आणि त्यांना देवाधर्माच्या कामासाठी नेत्रावळी, वेर्ले, साळजिणी, तुडव, जाके, नुंदे, विचुंद्रे, कुर्पे, कुर्डी, साळावली, शेळपे, कोर्टाली, पोर्टे, पत्रे, वालकिणी, दारजिणी, सांगे, कोळंब, रिवण, जांबावली, वालकिणी, भाटी, विलियण, कुंभारी, डोंगरी, शिंगोणे याअष्टग्रहरातील गावातील जमिनी दान देण्यात आल्याचे जे संदर्भ आढळतात, त्यातून इथल्या पोर्तुगीज पूर्वकाळातील इतिहासाच्या वारशाची प्रचिती येते.
- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५