असे विकृत मनोवृत्तीचे लोक आसपास असतात, अनेकदा निष्पाप मुली त्यांच्या आमिषांना बळी पडतात. काहीवेळा परिस्थितीमुळे तर काहीवेळा ब्लॅकमेल होत असल्यामुळे. मुलींना फसवणाऱ्या विकृत माणसांना वेळीच ओळखून त्यांना धडा शिकवण्याची गरज असते.

महाराष्ट्रात भोंदू अशोक खरातचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडालेली असताना गोव्यातील कुडचडे-काकोडा परिसरातील एका युवकाने केलेल्या कारनाम्यांमुळे सध्या गोव्यात खळबळ उडाली आहे. पालकांकडून चांगले संस्कार झाले नाहीत आणि पैशांचा माज चढला तर मुले कशी हाताबाहेर जाऊ शकतात, याचे हे एक उदाहरण आहे. ड्रग्ज गोव्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याच्या बातम्या अधूनमधून येतच असतात. सरकार, प्रशासन आणि पोलीस यांना याबाबत किती गांभीर्य आहे, हे त्यांनाच ठाऊक; परंतु पत्रकारांनी वारंवार अशा घटनांवर बोट ठेवले आहे. गोव्यातील प्रसारमाध्यमांनी आपली भूमिका वेळोवेळी पार पाडली आहे. कुडचडे परिसरात सुरू असलेल्या या युवकाच्या कारनाम्याला स्थानिक पत्रकारांनीच वाचा फोडली. गोव्याला हादरवून सोडणारी ही घटना आहे. कितीतरी मुलींचे अश्लील व्हिडिओ तयार करून या युवकाने आपल्या मित्रांना शेअर केले. हा एकतर मनोरुग्ण असावा किंवा ड्रग्जच्या नशेत तरी त्याने हे कृत्य केले असावे. अनेक तरुणींना, शाळकरी मुलींना फूस लावून फसवून त्यांचे व्हिडिओ काढून ते पाहण्याची हौस असलेल्या या तरुणाला विकृतीच म्हणावी लागेल. खरातने जसे अनेक महिलांना आपल्या जाळ्यात फसवले, तसाच प्रकार या तरुणाने केला. भोंदू खरातने महिलांना, राजकीय नेत्यांना त्यांच्या वृद्धीसाठी काही खोटे तंत्र मंत्र सांगून त्यांना फसवले. महिलांचे व्हिडिओ तयार केले. आता त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. गोव्यात सोहम नाईक या तरुणाने तोच कित्ता गिरवला. त्याने तंत्रमंत्र नाही पण मैत्री करून, ऐश करून मुलींना फसवले. त्यांना आमिष दाखवून फसवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यांचे व्हिडिओ बनवले आणि ते मित्रांना दाखवले. या घटनेनंतर कुडचडे-काकोडा भागात चर्चा होती, मात्र त्याला शिक्षा कशी देणार म्हणून सगळेच गप्प होते. पण दुष्कर्म जास्त काळ लपवले जाऊ शकत नाहीत. पोलीस कारवाई होत नाही म्हणून शेवटी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी पोलिसांवर दबाव वाढवला. त्यातूनच पोलिसांनी कारवाई केली आणि नंतर सारा प्रकार उघड झाला. या विकृताने विद्यार्थिनींचेही व्हिडिओ बनवल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हे नोंदवले. गोवा बाल हक्क कायद्याखालीही गुन्हे नोंदवले आहेत. आता हे संपूर्ण प्रकरण क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले. अशा प्रकारे मुलींना बरबाद करणाऱ्या विकृत लोकांची सुटका होणार नाही, त्याला योग्य ती शिक्षा मिळेल यासाठी पोलिसांनी गांभीर्याने तपास करतानाच पुरावे मिळवून आरोपपत्र दाखल करावे. त्याच्यावर खटला चालवताना आरोप सिद्ध करताना त्रुटी राहणार नाहीत, याची काळजी पोलिसांना घ्यावी लागेल. पीडितांनीही अशा विकृत माणसांना शिक्षा व्हावी यासाठी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे. पीडितांची ओळख जाहीर होणार नाही याची हमी पोलिसांनी द्यावी लागेल. मुलींचे व्हिडिओ काढणाऱ्या या तरुणावर माहिती तंत्रज्ञान कायद्याखालीही गुन्हे नोंद व्हायला हवेत. पोलीस कालांतराने तपासात वेगवेगळी कलमे जोडतील, अशी अपेक्षा आहे.
मुले हाताबाहेर जात असताना जे पालक त्यांना पाठीशी घालतात, त्यांनी या घटनेतून बोध घ्यायला हवा. पैशानेच गोष्टी खरेदी करता येतात असे नव्हे. उलट पैशाच्या बळावर मुलांचे अति लाड केले तर मुले काय करतात, त्याचा हा परिणाम आहे. मुले मागतात त्या गोष्टी दिल्या म्हणजे, पालकत्व नव्हे. दिलेल्या गोष्टींचा वापर मुले कशासाठी करतात, त्यांची संगत काय आहे, ते समाजात कसे वागतात, व्यसनाधीन झाली आहेत का, त्यावर लक्ष ठेवण्याचे काम पालकांचे. मोबाईल, बाईक्स, चारचाकी मागितल्यानंतर त्यांना दिली म्हणजे आपण मोठे तीर मारले, असे काही पालकांना वाटत असते. पण त्याच वस्तू मिळाल्यानंतर आपल्या घराचे दीपक काय दिवे लावत असतात, तेही पालकांनी पहायला हवे. कुडचडे-काकोडा येथील घटना ही फक्त त्या कुटुंबापुरती मर्यादित नाही किंवा त्या भागापुरतीही नाही. असे विकृत लोक जागोजागी सापडतात. दोन महिन्यांपूर्वी शेजारच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वडील आणि मुलाला म्हापसा पोलिसांनी अटक केली होती. असे विकृत मनोवृत्तीचे लोक आसपास असतात, अनेकदा निष्पाप मुली त्यांच्या आमिषांना बळी पडतात. काहीवेळा परिस्थितीमुळे तर काहीवेळा ब्लॅकमेल होत असल्यामुळे. मुलींना फसवणाऱ्या विकृत माणसांना वेळीच ओळखून त्यांना धडा शिकवण्याची गरज असते.