लोकांच्या रांगा नियंत्रणात आणल्या नाहीत, तर सध्यापेक्षाही गंभीर स्थिती उद्भवू शकते. काही ठरावीक लोक पेट्रोल आणि सिलिंडरचा साठा करून ठेवतील, त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागतील. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सरकारनेही युद्ध स्थिती नियंत्रणात येईपर्यंत इंधन वितरणाचे व्यवस्थापन पाहणे गरजेचे आहे.

पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडरचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्यामुळे लोकांच्या रांगा सध्या पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सींसमोर लागत आहेत. काही ठिकाणी तर मध्यरात्री सुरू झालेल्या रांगा पहाटेपर्यंत दिसत आहेत. कोविडच्या लॉकडाऊनच्या काळानंतर पुन्हा गोव्यात लोकांची अत्यावश्यक गोष्टींसाठी धावपळ दिसत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचा तुटवडा होणार असल्याची अफवा फक्त गोव्यातच नाही, तर देशातील सर्वच राज्यांत पसरल्यामुळे आज दिवसभर सगळीचकडे रांगा दिसत होत्या. सरकार आणि पेट्रोल पंपवालेही लोकांना भीतीचे कारण नाही असे सांगत आहेत. पण एकदा तुटवड्याची अफवा पसरली, की सरकारचे कोण ऐकणार? गोव्यातील स्थिती आणखी भयानक आहे, कारण इथे पेट्रोल पंपांवरील रांगा एकेक किलोमीटर लांब आहेत आणि अशा पद्धतीने सर्वांनी पेट्रोलचा साठा करण्यासाठी प्रयत्न केले तर आठवडाभर राज्यासाठी पुरेल एवढा साठा असला तरी तो एक-दोन दिवसांत संपू शकतो. इराण विरुद्ध इस्रायल - अमेरिका युद्धाची स्थिती नियंत्रणात आली नाही, तर गोव्यात लवकरच या गोष्टींचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे सरकारने ही स्थिती नियंत्रणात आणतानाच गॅस, पेट्रोल सर्वांना योग्य पद्धतीने मिळेल यासाठी व्यवस्था करण्याची गरज आहे. अन्यथा लोक पेट्रोल, डिझेलची साठवणूक करू शकतात. सध्या तीच स्थिती गोव्यात दिसत आहे. सकाळपासून तीन-चार खेपा पेट्रोल पंपांवर मारणारे लोक घरी जाऊन पेट्रोल साठवून पुन्हा टाकी भरण्यासाठी येतात. सिलिंडरसाठी तर दिवसभर रांगेत राहत असल्याची स्थिती दिसत आहे. ही स्थिती अफवांमुळे आली असली तरी या अफवा दूर करणे आणि सर्वांना पुरेल एवढा साठा आहे, हे सरकारने सांगण्याची
गरज आहे.
पंतप्रधानांच्या भाषणानंतर देशासमोर आव्हाने उभी राहू शकतात, असा संदेश गेल्यामुळे लोकांनी पेट्रोल, सिलिंडर तुटवड्यांच्या अफवा पसरवल्या. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी तर देशात पेट्रोलचा तुटवडा नाही, हेही स्पष्ट केले. केंद्र सरकारने पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याच्या जोडण्या घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. वाहनांना सीएनजी वापरण्याचा सल्ला दिला आहे, पण म्हणून पेट्रोल तुटवडा आहे असा त्याचा अर्थ होत नाही. देशात पुरेसा साठा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सरकार जरी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सांगत असले तरी रांगेत उभे असणारे लोक अशिक्षित आहेत, असेही म्हणता येणार नाही. उलट सुशिक्षित वर्गच अधिक धास्तावलेला दिसत आहे. त्यातच अफवा पसरल्यामुळे लोकांची धावपळ होत आहे. गोव्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर सध्या लोकांची गर्दी होत आहे. आज दिवसभर गोव्यातील पेट्रोल पंप आणि गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींसमोर रांगा दिसल्या. देशातील अन्य राज्यांमध्येही आज हीच स्थिती होती. तासन् तास लोक रांगेत राहून पेट्रोल भरून घेत आहेत. एकदा भरून गेल्यानंतर तीच व्यक्ती काही वेळातच पुन्हा पेट्रोल पंपावर येते. अर्थात घरी पेट्रोलचा साठा करून ठेवण्याचे प्रकार होत आहेत. अशाने देशात कितीही साठा असला, तरी गोव्यात मात्र तो दोन-तीन दिवसांत संपू शकतो. त्यामुळेच लोकांना संयम राखण्याचे आवाहन करण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज आठ दिवसांसाठी पुरेल एवढा कोटा असल्याचे जाहीर केले आणि एलपीजीचा साठाही राज्याला पुरेल इतका आहे. त्यामुळे लोकांनी उगाच रांगा लावण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतरही रात्रभर गोव्यातील पेट्रोल पंपांवर रांगा दिसत होत्या. दिवसा एलपीजी सिलिंडरसाठी लोक रांगा लावत आहेत. लोकांना आवरण्यासाठी सरकारने या गोष्टींचे वितरण सुरळीत करावे लागेल, अन्यथा दोन-तीन दिवसांत गोव्यातील स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. लोकांच्या रांगा नियंत्रणात आणल्या नाहीत, तर सध्यापेक्षाही गंभीर स्थिती उद्भवू शकते. काही ठरावीक लोक पेट्रोल आणि सिलिंडरचा साठा करून ठेवतील, त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागतील. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सरकारनेही युद्ध स्थिती नियंत्रणात येईपर्यंत इंधन वितरणाचे व्यवस्थापन पाहणे गरजेचे आहे.