
इराण-अमेरिका युद्धाचे परिणाम आता सर्वत्र दिसू लागले आहेत. युद्धामुळे जगात सर्वत्र इंधन तुटवडा जाणवत आहे. भारताचे ९० टक्के इंधन इराणजवळील होर्मुझ सामुद्रधुनीतून आयात केले जाते. युद्धामुळे या आयातीवर परिणाम झाला आहे. अर्थात गोवा देखील यातून सुटलेला नाही. राज्यात अद्याप तरी पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नसली तरी एलपीजीची तीव्र टंचाई झाली आहे. याची झळ घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक ग्राहकांनाही बसत आहे. पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या गोव्याला हा मोठा धक्का आहे. पर्यटनाचा कणा असलेले हॉटेल, शॅक, रेस्टॉरंट्सना त्यांच्या गरजेच्या तुलनेत केवळ २० ते ५० टक्के पुरवठा मिळत आहे. काळ्या बाजारात गॅसचे भाव दुपटीहून अधिक वाढले आहेत. परिणामी काही हॉटेल बंद होण्याची शक्यता आहे.
सध्या पणजीसह राज्यातील अनेक हॉटेलांमधील मेन्यूतील पदार्थ कमी झाले आहेत. गॅस टंचाईमुळे काही लहान हॉटेल केवळ चहा आणि समोसा एवढ्याचीच विक्री करत आहेत. तर काही हॉटेलांनी खाद्यपदार्थांचे दर ५ ते १० रुपयांनी वाढवले आहेत. याआधी सरकारने राज्यात एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तरी देखील पॅनिक बुकिंग केले जात आहे. पुरवठ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने कडक नियम लागू केले आहेत. साठेबाजी रोखण्यासाठी शहरी भागात दोन सिलिंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर असणे अनिवार्य केले आहे. गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी केवळ ऑनलाइन बुकिंग आणि ओटीपी प्रमाणीकरणाद्वारेच वितरण केले जात आहे. याशिवाय प्रत्येक गॅस एजन्सीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी तालुकास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
असे असले तरी 'पॅनिक बुकिंग' हे मोठे आव्हान ठरत आहे. ग्राहकांनी साठेबाजी केली नाही तर घरगुती गॅसचा पुरवठा स्थिर राहील. यासाठी लोकांनी घाबरून जाऊन बुकिंग करणे बंद केले पाहिजे. अर्थात युद्ध संपेपर्यंत इंधन पुरवठा सुरळीत होणे शक्य नाही.
जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा मार्ग सुरळीत होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी इंधनाचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. एलपीजीसाठी पर्याय शोधले गेले पाहिजेत. सरकारने देखील अशा प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. भविष्यात अन्य देशांवरील इंधनाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर व अन्य अक्षय ऊर्जा प्रकल्पांवर भर दिला गेला पाहिजे. या संकटामुळे ऊर्जा पायाभूत सुविधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पाईप्ड नॅचरल गॅसचे जाळे विस्तारण्यावर भर दिला गेला पाहिजे. याव्यतिरिक्त इंडक्शन स्टोव्हसारख्या पर्यायांचा वापर केला पाहिजे.
- पिनाक कल्लोळी