
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. अभिनेता विजय यांच्या 'तमिलगा वेत्री कझगम' पक्षाने राजकारणात प्रवेश केल्यामुळे प्रस्थापित समीकरणे बदलताना दिसत आहेत. नुकतेच टीव्हीकेचे नेते आधव अर्जुन यांनी केलेल्या एका दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या मते, विजय यांना मुख्यमंत्रीपद आणि समसमान जागावाटपाची ऑफर एका 'अनामित' संघटनेकडून देण्यात आली होती, परंतु विजय यांनी ती फेटाळून लावली.
आधव अर्जुन यांनी कोलाथुर येथील बैठकीत स्पष्ट केले की, विजय यांना ५० ते ९० जागांपर्यंतचे प्रस्ताव देण्यात आले होते. मात्र, विजय यांनी सत्तेपेक्षा जनतेच्या विश्वासाला प्राधान्य दिले. अर्जुन यांच्या "विजय मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीसमोर झुकणार नाहीत" या विधानामुळे राजकीय वर्तुळात असा कयास लावला जात आहे की, हा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाकडून आला असावा. भाजपप्रणीत एनडीएच्या सूत्रांनीही अशा वाटाघाटींचे संकेत दिले होते, ज्यात विजय यांना उपमुख्यमंत्रीपद आणि ५५ जागांची ऑफर असल्याचे बोलले जात होते.
भाजपला तामिळनाडूत डीएमकेची विजयी घोडदौड रोखण्यासाठी एका मोठ्या आघाडीची गरज वाटत असली, तरी त्यांचा मित्रपक्ष एआयएडीएमके मात्र विजय यांच्या एन्ट्रीने धास्तावलेला आहे. पक्षाचे प्रमुख एडप्पादी के. पलानीस्वामी यांनी टीव्हीकेसोबत कोणत्याही चर्चेत नसल्याचे जाहीर करत आपला विरोध स्पष्ट केला आहे. प्रत्यक्षात, एआयएडीएमकेला भीती आहे की विजय यांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांचे स्वतःचे अस्तित्व धोक्यात येईल.
भाजपची रणनीती स्टालिनविरोधी मतांचे विभाजन रोखण्याची आहे, परंतु सध्या ही रणनीती उलटताना दिसत आहे. के. ए. सेनगोट्टैयन यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला आहे, तर ओ. पन्नीरसेल्वम यांनी चक्क डीएमकेची वाट धरली आहे. दुसरीकडे, विजय यांनी सध्या कोणत्याही पक्षासोबत युती न करता स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत.
तामिळनाडूच्या या 'फिल्मी' राजकारणात आता जनतेचा कौल कोणाकडे जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विजय यांचा स्वाभिमानी पवित्रा त्यांना किंगमेकर बनवणार की सत्तेचा मार्ग मोकळा करणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
- प्रदीप जोशी, गोवन वार्ता