सांतिनेज खाडीला मिळणार गतवैभव !

रोहित मोन्सेरात यांनी या वर्षभरात सांतिनेज खाडी प्रवाही करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी त्यांनी जलस्रोत आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली आहे. त्यांच्या वडिलांच्या कल्पनेतून पुढे आलेली ही कल्पना साकार झाली तर सांतिनेज खाडीची दुर्दशा संपून तिला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल.

Story: विचारचक्र |
26th March, 11:38 pm
सांतिनेज खाडीला मिळणार गतवैभव !

पणजी स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत संपलेली असली, तरी हा प्रकल्प पूर्ण होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. पणजी नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ मिठागरात उभारण्यात आलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात चहूबाजूंनी दुर्गंधी पसरते. त्यामुळे पणजी नगरीत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या लोकांना नाक दाबून मांडवी पुलाजवळून प्रवास करावा लागतो. या प्रकल्पाची क्षमता मर्यादित असून कॅसिनोंमधील सांडपाण्यावर या प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येत असल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे समजते. स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत पाटो येथील मलनिस्सारण प्रकल्पाची क्षमता वाढविण्याची खरी गरज होती.

मांडवी नदीतील कॅसिनोंमुळे गोवा सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असला, तरी यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. कॅसिनो असलेल्या परिसरातील मांडवी नदीच्या पाण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने पडताळणी केली असता, कॅसिनोंजवळील पाण्यात कोलीफॉर्म जिवाणूंचे प्रमाण सुमारे २०० टक्क्यांनी वाढल्याचे आढळून आले. नदीच्या पाण्यात कोलीफॉर्म जिवाणूंचे कमाल प्रमाण शास्त्रज्ञांनी निश्चित केले आहे. त्यानुसार १०० मिली पाण्यात कोलीफॉर्मचे प्रमाण १०० एमपीएनपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे; मात्र गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने नमुने गोळा केले तेव्हा ते काही वेळा २ हजारांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. कॅसिनोंमधील सांडपाणी साठवून पाटो येथील सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केली जाते, असे सरकारतर्फे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात तसे घडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा मांडवी नदीतील जिवाणूंचे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले नसते.

मांडवी नदीतील एक छोटा कॅसिनो हलवून मोठा कॅसिनो आणणार, अशी चर्चा गेली ६ वर्षे सुरू आहे. ते महाकाय जहाज बांधून आता पूर्ण झाले आहे. हे जहाज तयार झाल्यावर मांडवी नदीतील छोटा कॅसिनो हटविण्यात आला. नवे महाकाय जहाज मांडवी नदीत कायमस्वरुपी नांगरण्यासाठी नदीत ड्रेजिंग करण्याची गरज होती. मांडवी नदीतून बार्ज वाहतूक सुरू असल्याने महाकाय कॅसिनो वेरेच्या बाजूला नांगरण्यात येणार होता. वेरे भागातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना याची चाहूल लागताच त्यांनी विरोध सुरू केला. तेवढ्यात पणजी महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. निवडणूक तोंडावर असताना महाकाय कॅसिनोचा वाद चिघळला असता तर, उत्पल पर्रीकरांचे आयतेच फावले असते. त्यामुळे सरकारने नवा कॅसिनो ‌आग्वादच्या जवळपासही दिसू नये, असा आदेश संबंधित कंपनीला दिला. तो कॅसिनो गायब करूनच सरकार थांबले नाही, तर नवा कॅसिनो येणारच नाही, अशी घोषणाही करून टाकली. या आश्वासनाचा पणजीचे पालकमंत्री बाबूश यांना मोठा लाभ झाला. उत्पल पर्रीकर यांना गोव्यातील सर्व विरोधी पक्षांनी झाडून पाठिंबा देऊनही बाबूश यांच्या प्रचारापुढे तो फिका पडला.

नवा कॅसिनो आज ना उद्या येणार, हे नक्की असले तरी या कॅसिनोची क्षमता नक्की किती असेल हे अजून स्पष्ट नाही. या कॅसिनोची क्षमता ७०० असेल असे सांगण्यात येत असले तरी, या सात मजली इमारतीएवढ्या उंचीच्या जहाजाची क्षमता तब्बल २ हजार पर्यटकांची आहे, असे समजते. २ हजार क्षमता असेल तर सांडपाण्याची समस्या किती गंभीर होईल, याचा अंदाज घेता येतो. सुमारे २ हजार लोक त्या कॅसिनोवर तळ ठोकणार असतील तर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होईल. त्यासाठी त्या जहाजावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावा लागेल. अन्यथा मांडवी नदीचे पाणी प्रदूषित होऊन लोकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होण्याची भीती आहे. भरती-ओहटीमुळे कॅसिनो परिसरातील दूषित पाणी एकाच ठिकाणी स्थिर न राहता ते आमोणेपर्यंत पोहोचू शकते. या दूषित पाण्यातील मासळी खाणाऱ्या लोकांचे आरोग्य यामुळे नक्कीच धोक्यात येईल.

पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम कागदोपत्री पूर्ण झालेले असले, तरी गेली ५३ वर्षे पणजी नगरीत वास्तव्यास असलेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला गेल्या ७-८ वर्षांत शहर स्मार्ट बनल्याचे मुळीच जाणवत नाही. ५० वर्षांपूर्वी सांतिनेज खाडीत मांडवी नदीचे पाणी भरतीच्या वेळी भरायचे आणि ओहोटीच्या वेळी खाडीतील केरकचरा आणून नदीत सोडायचे. सांतिनेज परिसरात बहुमजली इमारतींचे जाळे उभे राहिले आहे. १९६६ पासून पणजीत मलनिस्सारण यंत्रणा कार्यरत असूनही सर्व इमारतींचे सांडपाणी सांतिनेज खाडीत सोडले जाते. पणजी मलनिस्सारण प्रकल्प कार्यरत झाल्यावर प्रत्येक नव्या घराची सांडपाणी यंत्रणा मलनिस्सारण प्रकल्पाला जोडणे बंधनकारक होते. या तरतुदीची कार्यवाही न करता या सर्व इमारतींना ऑक्युपन्सी दाखला कसा मिळाला? त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले असते, तर सांतिनेज खाडीचे सांतिनेज गटारात रूपांतर झालेच नसते.

सांतिनेज खाडी की नाला, यावर यापूर्वी अनेकदा वादविवाद झाले आहेत. ताळगाव पठारावरील पावसाचे पाणी मांडवी नदीत पोहोचविणारी ही खाडी आहे, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे हा नाला नव्हे, असे त्याचे म्हणणे आहे. ही खाडी ५० वर्षांपूर्वी प्रवाही होती. या खाडीत केरकचरा, टाकाऊ माती टाकण्यात आल्याने प्रवाहात अडथळे निर्माण  झाले. पाणी साचून राहिल्याने डासांची मोठ्या प्रमाणात पैदास झाली आणि मलेरिया, डेंग्यू आदी साथी पसरल्या. सांतिनेज खाडी साफ करून ती प्रवाही बनविण्यासाठी पणजी महापालिकेने अनेकदा  प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत. बड्या इमारतींनी आपले सांडपाणी या खाडीत सोडल्याने या खाडीचे रूपांतर गटारगंगेत झाले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पणजीचे आमदार बनले तेव्हापासून सांतिनेज खाडी साफ करण्याचे प्रयत्न चालू आहेत. या गोष्टीला आता तब्बल ३१ वर्षे झाली. त्यांच्यानंतर सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि बाबूश मोन्सेरात आमदार बनले. महापौर किती झाले, याची तर गणतीच नाही. गेली ५ वर्षे मोन्सेरात पिता-पुत्रांची पणजीत सत्ता आहे. नव्या महापौरांची ३० मार्चला निवडणूक होणार आहे. या वर्ष अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुत्र रोहितला आमदार करणार, अशी जाहीर घोषणा बाबूश यांनी केली आहे. त्यामुळे पुढील वर्षभर तरी रोहित हेच महापौर बनणार, हे नक्की आहे. त्यांनी या वर्षभरात सांतिनेज खाडी प्रवाही करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी रोहित यांनी जलस्रोत खाते, सार्वजनिक बांधकाम खाते आदी खात्यांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली आहे. त्यांच्या वडिलांच्या कल्पनेतून पुढे आलेली ही कल्पना साकार झाली तर सांतिनेज खाडीची दुर्दशा संपून तिला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल.


- गुरुदास सावळ

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)