हॉटेल व्यवसाय अडचणीत : चारऐवजी एकच सिलिंडर मिळत असल्याची तक्रार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : व्यावसायिक गॅस सिलिंडरवरील निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. चार सिलिंडरचा कोटा असतानाही प्रत्यक्षात एकच सिलिंडर मिळत असल्याने लहान तसेच मोठ्या हॉटेलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक हॉटेलांना आता इंडक्शन स्टोव्हचा आधार घ्यावा लागत आहे, अशी माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली.
पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्ववत झाला असला तरी एलपीजी सिलिंडरचा तुटवडा कायम आहे. व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलिंडरचा कोटा २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. मात्र प्रत्यक्षात हॉटेलांना पूर्वीप्रमाणे चार किंवा पाच सिलिंडरऐवजी एकच सिलिंडर मिळत असल्याने ‘मेन्यू’तील सर्व पदार्थ उपलब्ध करून देणे शक्य होत नाही.
हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी सांगितले की, गॅस तुटवड्यामुळे अनेक हॉटेलांना चहा, पावभाजी, भजी यांसारखे मर्यादित पदार्थच उपलब्ध करून देता येत आहेत. त्यामुळे लहान तसेच मोठ्या हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे.
इंडक्शनचा पर्याय; खर्च वाढला
ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक हॉटेल मालकांनी इंडक्शन स्टोव्हचा वापर सुरू केला आहे. मात्र व्यावसायिक वापरासाठी विजेचा दर जास्त असल्याने वीज बिलात मोठी वाढ होत आहे. काही ठिकाणी डिझेलवर चालणारे स्टोव्ह वापरले जात असले, तरी डिझेल महाग असल्याने खर्च वाढत असल्याचेही सांगण्यात आले.
पर्यटन क्षेत्रावर विपरित परिणाम
गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेलांच्या मेन्यूवर मर्यादा आल्याने पर्यटकांनाही अपेक्षित पदार्थ मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याचा पर्यटन व्यवसायावरही परिणाम होत आहे, अशी माहिती टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी दिली. राज्यात पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) कनेक्शनची सुविधा उपलब्ध असली तरी व्यावसायिक पीएनजी कनेक्शनचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे बहुसंख्य हॉटेल्स एलपीजी सिलिंडरवरच अवलंबून असल्याचे समोर आले आहे.