बायकोवरून झालेल्या वादात मित्राचाच खून

मुख्य संशयितासह चौघांना अटक : आयपीएल सट्टेबाजीसाठी आलेल्या गटात वाद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March, 10:48 pm
बायकोवरून झालेल्या वादात मित्राचाच खून

म्हापसा : आयपीएल सट्टेबाजीसाठी कळंगुट येथे आलेल्या एका गटात किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलण्यात आले असून, एका २७ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे तिवायवाडा भागात ही घटना घडली. पत्नीच्या छायाचित्रावरून झालेली आक्षेपार्ह टिप्पणी आणि वादाच्या रागातून मुख्य संशयिताने हे कृत्य केले. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी मुख्य संशयितासह एकूण चार जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेवर सट्टेबाजी करण्यासाठी गुजरात आणि मध्य प्रदेशमधील ५ जणांचा गट गोव्यात आला होता. मृत राजभर रविनारायण रामदर्शनभाई (२७, रा. सुरत) आणि मुख्य संशयित कोमल उत्तम बारसकर (२८, रा. मध्य प्रदेश) यांच्यात शनिवारी पहाटे मोबाइलमधील छायाचित्रे पाहण्यावरून वाद झाला. राजभर याने संशयिताच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी राजभरने गेस्ट हाऊसमधून बाहेर धाव घेत समोरील 'रिसॉर्ट सांता मोनिका'मध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या कोमलने त्याचा पाठलाग करून रिसॉर्टच्या स्विमिंग पूलजवळ त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. छाती आणि पोटावर गंभीर जखमा झाल्याने राजभरचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने चाकू स्विमिंग पूलमध्ये फेकून देऊन आपल्या साथीदारांसह तिथून पळ काढला.

रिसॉर्ट मालक जयंत बजाज यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास वेगाने फिरवला. पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर आणि अधीक्षक हरीशचंद्र मडकईकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले असून, मुख्य संशयित कोमल बारसकर याला शनिवारी दुपारी गोव्यातून पळून जाण्याच्या बेतात असताना वास्को येथून अटक करण्यात आली.

या प्रकरणात पोलिसांनी कोमलसह इतर तिघांनाही ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोमेकॉमध्ये पाठवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आयपीएल सट्टेबाजीच्या उद्देशाने गोव्यात आलेल्या या टोळीच्या इतर कारवायांबाबतही पोलीस आता चौकशी करत आहेत.

#CalanguteCrime #GoaPolice #IPLBetting #MurderCase #CalanguteNews #GoaNews #CrimeUpdate #LaxxiAmonkar
हेही वाचा