मडगाव पालिका उद्यान बचाव : न्यायालयीन लढा सुरूच राहणार

उदय भेंब्रे यांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण मागे घेताना चिराग नायक. सोबत डॉ. फ्रान्सिस कुलासो.
मडगाव : मडगाव पालिकेच्या उद्यानात उभारण्यात येणार्या इमारतीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते चिराग नायक यांनी सुरू केलेले उपोषण शनिवारी सायंकाळी मागे घेतले. उपोषणामुळे मडगाव व गोमतंकीयांना हा मुद्दा पटवून देत जागृती केली. उपोषण मागे घेतले असले तरीही न्यायालयीन लढा सुरू राहील, अशी माहिती नायक यांनी दिली.
मडगाव पालिकेच्या समोरील उद्यानात गणेश मंडपाच्या जागेवरील बांधकाम हटवून त्याठिकाणी दोन मजली इमारतीचे बांधकाम करण्याची निविदा जीएसआयडीसीकडून जारी करण्यात आली. यानंतर चिराग नायक यांनी शुक्रवारी प्रकल्प रद्दसाठी उपोषणाला सुरुवात केली होती. दोन दिवसांच्या उपोषणानंतर आता त्यांनी मडगावातील नागरिकांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले. डॉ. फ्रान्सिस कुलासो, उदय भेंब्रे यांच्या हस्ते पाणी घेत हे उपोषण संपुष्टात आणले.
यावेळी डॉ. कुलासो यांनी सांगितले की, आपण कोणत्याही पक्षाचे नसून केवळ चांगल्या कामासाठी सुरू केलेल्या लढ्याला पाठिंबा देत आहोत. मडगाव पालिका उद्यान हा वारसा असून त्याची काळजी घेण्याची गरज आहे. या उद्यानाचे पुनर्वभव परत आणण्यासाठी मडगावातील लोकांनी हा लढा पुढे न्यावा, अशी मागणी केली.
साहित्यिक उदय भेंब्रे यांनी सांगितले की, विकासासाठी बांधकाम करणे हा विचारच चुकीचा आहे. गोवा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. यापूर्वीही उद्यानात रेस्टॉरंट व बार करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती व विरोधानंतर ते झाले नाही. पालिकेचे जे उद्यान आहे, तेच राखून ठेवावे. सत्याग्रहाचा मार्ग अवलंबत चिरागने लोकांमध्ये जागृती केली असून, आता हा लढा मडगाववासीयांनी पुढे न्यावा, असेही त्यांनी सांगितले.
गरज नसताना उद्यानात इमारत उभारणे हा मूर्खपणा आहे. सरकारने आता मेगा प्रोजेक्ट्सचे शब्द टाळून मूळ गोवा जपण्यावर भर दिला पाहिजे. लोकांशी संवाद न साधता लादलेला विकास चुकीचा आहे. - उदय भेंब्रे, ज्येष्ठ साहित्यिक
मडगाव पालिका उद्यान हा आमचा वारसा आहे. या ठिकाणची हिरवळ टिकवून ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. राजकारणापलीकडे जाऊन चांगल्या कामासाठी सुरू असलेल्या या लढ्याला आमचा पाठिंबा आहे. - डॉ. फ्रान्सिस कुलासो