साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

इंधन टंचाईच्या भीतीने पेट्रोल पंपांवर रांगा, फोंडा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जोर

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
54 mins ago
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले. कुडचडे परिसरातील कथित सेक्स रॅकेटप्रकरणी कुडचडे पोलिसांनी मड्डेगाळ, काकोडा येथील सोहम नाईक या तरुणाला अटक केली. या घटनेने राज्यभर खळबळ माजली होती. तर, इंधन टंचाईच्या अफवेने पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या होत्या.

रविवार


वेर्णा-कुएली रस्त्यावर अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू

कुएली–वेर्णा अंतर्गत रस्त्यावर भीषण अपघात घडला. झुआरीनगर येथील दोन तरुणांची दुचाकी समोरून येणाऱ्या ‘इनोव्हा’ला धडकली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

शस्त्र चोरीप्रकरणी उपनिरीक्षक निर्दोष मुक्त

चोरीस गेलेल्या शस्त्राचे अस्तित्व सिद्ध करण्यात तपास अधिकाऱ्याला अपयश आले. तसेच संशयिताच्या ताब्यात देण्यात आलेले शस्त्र चोरी केल्याचा आरोप आणि पुरावे नष्ट केल्याचा पुरावा सादर करण्यात अपयश आले, असे निरीक्षण नोंदवून मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने निवृत्त पोलीस उपनिरीक्षक फेलिक्स दा लिमा यांची निर्दोष सुटका केली.

काकोडा येथील युवकाला सेक्स रॅकेटप्रकरणी अटक

कुडचडे परिसरातील कथित सेक्स रॅकेटप्रकरणी कुडचडे पोलिसांनी मड्डेगाळ, काकोडा येथील सोहम नाईक या तरुणाला रविवारी अटक केली. गेल्या दोन दिवसांपासून याविषयी चर्चा सुरू होती. ४८ तासांत चौकशी न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा कुडचडेतील नगरसेवक, समाजसेवक व नागरिकांनी दिला होता.

सोमवार 


फोंडा पोटनिवडणुकीसाठी तिघांचे अर्ज दाखल

फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले. भाजपकडून रितेश नाईक, काँग्रेसकडून केतन भाटीकर, आम आदमी पक्षाकडून गीतेश नाईक यांनी अर्ज दाखल केले.

वीरेशकडून सभापतींविरोधात हक्कभंगाची नोटीस

आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी सभापती गणेश गावकर यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. विधीमंडळ खात्याच्या सचिवांकडे त्यांनी नोटीस सादर केली. या नोटिसीवर हक्कभंग समिती निर्णय घेणार आहे.

कुडचडे लैंगिक अत्याचार; सोहमला चार दिवसांची पोलीस कोठडी

कुडचडे-काकोडा परिसरातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याला केपे प्रथमवर्ग न्यायालयाने सोमवारी चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. त्याच्याविरुद्ध ‘पोक्सो’ आणि गोवा बाल कायदाअंतर्गत कठोर कलमे लावली आहेत. दरम्यान, सोमवारी पोलिसांनी चार पीडितांची ओळख पटवली असून तपास सुरू केला आहे.

मंगळवार

सोहमवर ‘पोक्सो’चे आणखी दोन गुन्हे दाखल

कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास मंगळवारी गुन्हा शाखेकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला. संशयित सोहम नाईक (२०, मड्डेगाळ-काकोडा) याच्याविरोधात कुडचडे पोलिसांनी ‘पोक्सो’ व गोवा बाल कायदा अंतर्गत आणखी दोन गुन्हे दाखल केले. हे प्रकरण समोर आल्यानंतर दोघा अल्पवयीन विद्यार्थिनींनीही त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे.

इस्रायली नागरिक डुडूला उच्च न्यायालयाची नोटीस

कोकेन बाळगल्याप्रकरणी इस्रायली नागरिक डेव्हिड ड्रिहम ऊर्फ डुडू याला सत्र न्यायालयाने मंजूर केलेल्या सशर्त जामिनाला राज्य सरकारने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने या प्रकरणी डुडूला नोटीस बजावली आहे.

भाटवाडी-धावे येथे झोपडीला आग

सत्तरी तालुक्यातील भाटवाडी-धावे परिसरात झोपडीला आग लागल्याची घटना घडली. ही घटना मारुती मंदिराजवळ रात्री सुमारे ९:०२ च्या सुमारास घडली.

बुधवार


इंधन टंचाईच्या अफवेने पेट्रोल पंपांवर रांगा

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि संभाव्य इंधन टंचाईच्या अफवेमुळे गेल्या दोन दिवसांपासून गोव्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पेट्रोल-डिझेल संपणार या भीतीने नागरिक ‘पॅनिक मोड’वर गेले असून, राज्यातील इंधन पुरवठा केंद्रांवर मोठी झुंबड उडाली आहे. दुसरीकडे, व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

कळंगुटमध्ये बंगळुरूच्या पर्यटकांवर खुनी हल्ला

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील प्लॅनेट गोवा बीच शॅकमध्ये बंगळुरूमधील ७ जणांच्या पर्यटक गटावर क्षुल्लक कारणावरून खुनी हल्ल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी दिनेश कुमार व धुपेंद्र यादव या दोघा शॅकच्या कर्मचार्‍यांना अटक केली आहे. तसेच या शॅकमध्ये पर्यटकांवर दुसर्‍यांदा हल्ला घडल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या अहवालानुसार पर्यटन खात्याने शॅकचा परवाना निलंबित केला आहे.

मावळींगे-साखळी येथील ८०,९२६ चौ.मी. जमीन रूपांतरण प्रस्ताव रद्द

मावळींगे-साखळी येथील ८०,९२६ चौरस मीटर जमिनीचे कलम ३९ ए अंतर्गत रूपांतर करण्याचा वादग्रस्त प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला आहे. नगरनियोजन विभागाने (टीसीपी) हा प्रस्ताव रद्द केल्याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

गुरुवार


सोहम नाईकच्या घराची क्राईम ब्रँचकडून झडती

कुडचडे लैंगिक अत्याचारप्रकरणी क्राईम ब्रँचने गुरुवारी संशयित सोहम नाईक याच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली. क्राईम ब्रँचचे पथक वाहने घेऊन संशयिताच्या घरी पोहोचले आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

खोतोडा पंचायत क्षेत्रात चक्रीवादळाचा जोरदार तडाखा

सत्तरी तालुक्यातील खोतोडा पंचायत क्षेत्रातील विविध गावांना चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला. या वादळामुळे अनेक घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले असून, वीज वाहिन्या तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

पार्किंगवरून हाणामारी,संशयितांना प्रतिबंधात्मक अटक

म्हापसा येथील टॅक्सी स्टँडवर वाहन पार्किंगच्या किरकोळ कारणावरून कर्नाटकचे पर्यटक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात हाणामारी झाली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोन्ही बाजूच्या संशयितांवर प्रतिबंधात्मक अटकेची कारवाई केली.

शुक्रवार

मयेतील एकाला २.४८ कोटींना गंडवले

जास्त व्याजाचे आमिष दाखवून गोव्यातील अनेकांना ‘ओरिस कॉईन’मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून २.४८ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) तरुण त्रिखा याच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

कॅन, बाटल्यांमधून पेट्रोल, डिझेल विक्रीवर बंदी

पेट्रोल पंपवाल्यांनी ग्राहकांना पेट्रोल वा डिझेल किरकोळ स्वरूपात कॅन किंवा बाटल्यांमधून विक्री करायाची नाही. विक्री करताना पेट्रोल वा डिझेल थेट वाहनाच्या टाकीत भरावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. पेट्रोल पंपाची अचानक तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, युवकाला अटक

इन्स्टाग्रामवर मैत्री केली आणि दुसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी बार्देश तालुक्यातील २३ वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

सोहमवर आणखी एक गुन्हा नोंद; चार दिवसांची पोलीस कोठडी

कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात अला आहे. संशयित सोहम नाईकविरोधात तक्रार करणाऱ्या पीडितांची संख्या वाढत असून, शुक्रवारी त्याच्याविरुद्ध आणखी एक नवीन गुन्हा नोंदवण्यात आला. एका १४ वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद झाला आहे.

शनिवार

कळंगुट येथे खून, म्हापशात मृतदेह सापडला

तिवायवाडा, कळंगुट येथे कॅसिनोमधील वादातून मित्रांनी गुजरात येथील एका युवकाचा निर्घृणरित्या खून केला. म्हापसा येथे एका अज्ञाताचा संशयास्पद स्थितीत शेतीत मृतदेह सापडला आहे. अंगावर जखमा असून, पोलीस खुनाच्या नजरेतून तपास करीत आहेत.

बोर्डा-फातोर्डा येथे शॉपिंगसाठी गेलेल्या मुलीचा विनयभंग

बोर्डा-फातोर्डा येथील एका दुकानात खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी संशयित तिबुर्शिओ मोंतेरो याला अटक केली आहे. संशयिताने मुलीसमोर अश्लील चाळे केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

म्हापसा येथे गांजा जप्त

म्हापसा येथे एएनसीने छापा टाकून १.९२ लाखांचा ३.८५४ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी साईश खावरे ( २९, वेर्ला काणका) याला अटक केली.

लक्षवेधी

म्हापसा येथील कोर्ट जंक्शनवर कारची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. जंक्शनला वळण न घेता दुचाकीस्वाराने थेट चुकीच्या दिशेने गाडी घेतल्याने हा अपघात घडला. दोन्ही गंभीर जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

मतदार पडताळणी मोहीम (एसआयआर) पूर्ण झाल्यानंतर राज्यातील नगरपालिकांमधील प्रभाग रचनेत बदल झाले आहेत. मतदारांच्या संख्येत घट झाल्यामुळे काही ठिकाणी प्रभागसंख्येत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार मुरगाव पालिकेचे प्रभाग २५ वरून २१, तर मडगाव पालिकेचे प्रभाग २५ वरून २४ करण्यात आले आहेत.

अली खान यांच्या हत्या प्रकरणात बंगळुरू विमानतळावरून संशयित अल्ताफ शाह सय्यद याला अटक केली होती. गोव्यात आणल्यानंतर त्याच्यावर इस्पितळात उपचार झाले. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घोगळ फातोर्डा येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीतील वर्चस्वाच्या वादातून ३० जानेवारी रोजी मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्यावर चाकूने हल्ला झाला होता. यातच त्यांचा मृत्यू झाला.

जनगणनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून शिक्षकांवर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनगणनेचा पहिला टप्पा १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत होईल. 

हेही वाचा