आवढा व्हिएगस : कुडचडे लैंगिक शोषण प्रकरण

मडगाव : कुडचडे लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित सोहम नाईक याने सुमारे १५ व त्यापेक्षा जास्त मुलींचे शोषण केल्याचे ‘बायलांचो एकवोट’ संस्थेच्या अध्यक्ष आवढा व्हिएगस यांनी सांगितले. मुलींशी समाजमाध्यमांवरुन मैत्री वाढवून त्याचा फायदा सोहम याने घेतल्याचेही व्हिएगस यांनी स्पष्ट केले.
आवढा व्हिएगस म्हणाल्या की, सोहम नाईक हा नववी ते बारावी या इयत्तांमधील मुलींना हेरुन त्यांना लक्ष्य करत होता. एखाद्या मुलीशी ओळख करून घेतल्यानंतर तिला तू सुंदर आहेस, आपणास तू पाहिजेस, आपण तुझ्याशी लग्न करणार असे कौतुक करत त्यांचा विश्वास संपादन करत होता. त्यांच्याशी मैत्री वाढवून त्यांना फसवायचा. एखाद्या मुलीला पटवल्यानंतर तिच्याकडूनच तिच्या दुसर्या मैत्रिणीचा किंवा बहिणीचा मोबाईल क्रमांक घेत होता. कायद्याची माहिती व त्यांच्यावरील अन्यायाची पालकांना माहिती नसते. त्यामुळे झाल्या प्रकाराबाबत पीडिता पुढे येत नाहीत, असेही आवढा यांनी सांगितले.
अपघात झाल्यानंतर पुढे येऊन न्याय मागितला जातो तसाच हा देखील प्रकार आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात पीडितांनी पुढे येत न्यायाची मागणी करण्याची गरज आहे. असे प्रकार आपल्याप्रमाणे दुसर्याबरोबर होऊ नये यासाठी हे गरजेचे आहे. नाव खराब होईल या भीतीने मागे राहू नये कारण संशयित सोहम याने त्यांच्या नावांची बदनामी केलेली आहे. संशयिताने पीडितांचे फोटो, व्हिडिओही काढलेले असून काहींना पाठवलेले आहेत. पीडितांचे फोटो काढणे, साठवणे, दुसर्याला पाठवणे हा गुन्हा असल्याने आवढा यांनी म्हटले.
आणखीही काहीजणांचा समावेश
कुडचडे लैंगिक शोषण प्रकरणात सोहम नाईककडून करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या प्रकरणात आणखीही काहीजणांचा समावेश आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान जसजशी नावे येतील त्यांच्यावरही कारवाई होईल. या प्रकरणात सुमारे सध्यातरी १५ पीडिता असतील, असेही आवढा व्हिएगस यांनी सांगितले.
पीडितांची ओळख समोर येत नाही!
कोणत्याही लैंगिक शोषण प्रकरणात पीडितांची ओळख कोणत्याही प्रकारे लोकांसमोर येत नाही. ओळख समोर न येण्याची काळजी घेतली जाते. त्यांची ओळख समोर आणणे हा गुन्हा असल्याचे आवढा व्हिएगास यांनी सांगितले. या प्रकरणात आता पीडिता तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांनी संपर्क साधल्यानंतर पीडितांची भेट घेत त्यांचे समुपदेशन केले जाते व त्यानंतर जबाबासाठी पोलिसांना कळवले जाते.
मुलींच्या इच्छा पूर्ण करत घ्यायचा फायदा
सोहम नाईक हा स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम व इतर समाजमाध्यमांच्या वापराद्वारे मुलींशी ओळख वाढवून त्यांच्याशी मैत्री करायचा. मोठ्या कारमधून फिरणे, चांगल्या महागड्या दुचाकीवरुन फिरणे अशी काही मुलींची इच्छा असते. सोहम याच्याकडे दुचाकी व कारही होत्या. त्यामुळे मुलींच्या इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देत त्यांचा फायदा सोहम नाईक याच्याकडून घेण्यात आला.
पालकांनीही मुलांकडे लक्ष देण्याची गरज
या प्रकरणानंतर पालक आपली कर्तव्य पाळण्यात कमी पडत असल्याचे दिसून येते. पालकांसह मुलेही सध्या मोबाईलवर जास्त वेळ घालवतात. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने नातेसंबंध जुळण्याच्या प्रकारात वाढ होते. ऑनलाइन पद्धतीत समोरील व्यक्तीचा खरा स्वभाव कळत नाही व त्यात मन गुंतले जाते. पालकांचे या प्रकारांकडे लक्ष नसते. प्रेम व वासना यातील फरक मुलांना कळत नाही. यात पालकांचे अपयश आहे, असेही आवढा व्हिएगस यांनी सांगितले.