दुचाकी अपघातात बिट्स पिलानीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; एक जखमी

झुआरीनगर-सांकवाळ येथे ट्रकला धडक बसून अपघात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th March, 11:43 pm
दुचाकी अपघातात बिट्स पिलानीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; एक जखमी

वास्को : झुआरीनगर-सांकवाळ येथे रविवार, दि. २८ रोजी सायंकाळी झालेल्या दुचाकी अपघातात बिट्स पिलानीचा विद्यार्थी करण नृसिंहा मूर्ती (२५) याचा मृत्यू झाला. तर, दुचाकीच्या मागे बसलेला सोहन अधिकारी (२६) हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण व सोहन हे दोघे बिट्स पिलानीमध्ये जीवशास्त्र विभागात पीएचडीचे शिक्षण घेतात. ते दोघेजण रविवारी सायंकाळी दुचाकीने चालले होते. यावेळी दुचाकी करण चालवित होता. दुचाकीसह ते बिट्स पिलानीपासून काही अंतरावर असलेल्या झुआरीनगर-सांकवाळ येथील झुआरी इंडियन ऑयल टँकिंग लिमेटेडच्या प्रवेशद्वारासमोर पोहचल्यावर त्यांच्या दुचाकीची धडक पुढे जाणाऱ्या एका ट्रकाला बसली. सदर धडक ट्रकाच्या मागील टायराला बसल्याने ते दोघे रस्त्यावर पडले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या करणचा जागीच मृत्यू झाला.

करण हा मूळचा म्हैसूर कर्नाटकचा आहे. तर जखमी झालेला सोहन हा फोंडा येथे राहतो. अपघातप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविला आहे. अपघातप्रकरणी वेर्णा पोलीस स्थनकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा