सात जणांना अटक : सायबर क्राईम विभागाकडून कारवाई

म्हापसा : पे-डे कंपनीच्या नावाने कर्ज देण्याचे भासवून अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या खोर्ली म्हापसा येथील एका बंगल्यामध्ये चालणाऱ्या कॉल सेंटरचा सायबर क्राईम विभागाकडून पर्दाफाश करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक करून २१ लाखांचे साहित्य जप्त केले.
लक्ष्मण कौशिक (रा. ठाणे मुंबई), सौरभ विकास घोडके (रा. रायगड, महाराष्ट्र), प्रवेश नामदेव सावंत (रा. कांदिवली पूर्व, मुंबई), निसर्ग चेतनकुमार ठक्कर (रा. अहमदाबाद, गुजरात), राजस रमेश भगत (रा. कांदिवली पूर्व, मुंबई), अविनाश प्रदीप वर्मा (रा. शामली, उत्तर प्रदेश) आणि हर्ष दिलीप बारुत (रा. अहमदाबाद) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर डिजिटल वस्तू मिळून २१ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई सायबर क्राईम विभागाने शुक्रवारी मध्यरात्री केली. अमेरिकन नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवून पे डे नामक कंपनीचे एजंट असल्याचे सांगत त्यांना गंडविले जात असल्याची इंटरपोलकडून माहिती सायबर क्राईम पोलिसांना मिळाली होती. पोलीस चौकशीत हे कॉल सेंटर खोर्ली म्हापसा येथील एका बंगल्यातून सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार सदर बंगल्यावर विभागाच्या पोलिसांनी छापा टाकला. हा बंगला संशयितांनी भाड्याने घेतला होता.
कर्ज आणि त्वरित रोख रक्कम देण्याचे खोटे आमिष दाखवून संशयित आरोपी अमेरिकन नागरिकांना गिफ्ट कार्ड्सच्या (जसे सेफोरा, मॅसिस ग्रीन डॉट मनी पॅक, ॲपल गिफ्ट कार्ड, रेझर गोल्ड आणि एक्स बॉक्स) स्वरूपात मोठी रक्कम भरण्यास भाग पाडत व त्यांची आर्थिक फसवणूक करत होते.
पोलीस अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेरविन डिकॉस्टा, मंदार गावकर, हवालदार योगेश खांडेपारकर, यदेश गावडे, कॉन्स्टेबल इब्राहिम करोल, मयूर राणे, महिला कॉन्स्टेबल स्नेहा च्यारी, मिनिका या पथकाने ही कामगिरी केली.
२१ लाखांचे साहित्य जप्त
सायबर गुन्हे पोलीस ठाण्याच्या पथकाने सायबर गुन्हे पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली खोर्ली म्हापसा येथील एका भाड्याच्या बंगल्यात चालवल्या जाणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत ७ व्यक्तींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जप्त केलेल्या सर्व साहित्याचे एकूण मूल्य सुमारे २१ लाख रुपये इतके आहे. लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर डिजिटल वस्तूंचा यात समावेश आहे.