वासनेचे जाळे आणि आपली जबाबदारी

शालेय पातळीपासून मुलींची सक्षम जडणघडण समुपदेशनाच्या माध्यमातून करायला हवी. बिकट प्रसंगी काय भूमिका घ्यावी, हे त्यांना समजावून सांगायला हवे. विशेष म्हणजे आजच्या सोशल मीडियाशरण युगात पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद ठेवायला हवा. त्यांच्या वर्तनाकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. वर्तनात बदल दिसून आले, तर त्याचा ठाव घ्यायला हवा. त्यातून कुडचडेतील वासनाकांडासारखी घटना वेळ निघून जाण्याआधी उघडकीस येऊ शकते. सामाजिक प्रबोधन हा दुवाही तितकाच महत्त्वाचा आहे.

Story: वर्तमान |
28th March, 11:20 pm
वासनेचे जाळे आणि आपली जबाबदारी

सत्य असत्याशी

मन केले ग्वाही ।

मानियले नाही बहुमता ।।

संत तुकारामांच्या रचनेतील या ओळी आजच्या घडीला प्रत्येकाने डोक्यात घेणे गरजेचे बनले आहे. सत्य काय किंवा असत्य काय, याचा निर्णय मी अन्य लोकांच्या सांगण्यानुसार घेत नाही. माझ्या विवेकी बुद्धीला स्मरून मी त्यासंबंधी निर्णय घेतो, इतका स्वच्छ विचार तुकोबांनी आपल्याला दिला आहे. आजचा भवताल या ओळींचे गांभीर्य अधिक गडद करतो. नाशिकमधील अशोक खरातचे भोंदूगिरी आणि लैंगिक शोषणाचे प्रकरण असो, कुडचडेतील सोहम नाईकचे वासनाकांड असो की पुण्यातील भोंदू ह्रषिकेश वैद्य असो, या सर्व बाबतींत अंधानुकरणशीलता दिसून आली. आपण नेमके कोण आहोत, आपण शिक्षण घेतले म्हणजे नेमके काय केले, समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला जे सांगितले जाते, त्याची पडताळणी करायची का, की जे इतरांकडून घडले तेच आपण का म्हणून करायचे, इतकाही विचार बहुतांश लोक करत नाहीत. त्याचे परिणाम मग अशा प्रकरणांच्या परिणतीत होतात. त्यापासून स्वतःला वाचवायचे असेल, तर तुकोबांनी सांगितलेला विवेक जोपासायला हवा. 

खुद्द माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग. दोन वर्षांपूर्वी पर्वरीतील आमच्या इमारतीत एके दिवशी सकाळीच ‘वासुदेव आला’ अशी हाळी ऐकू आली. जोडीला सुमधूर गायन आणि टाळांचा मंद किणकिणाट होता. स्वाभाविकपणे आपण दारी आलेल्या याचकाला काही तरी द्यावे, या उद्देशाने त्या व्यक्तीला धान्य अर्पण केले. लगेच त्या व्यक्ती​ने भविष्यकथन करायला सुरुवात केली. अशा लोकांना काही गोष्टी सरावाने माहीत असतात. काही गोष्टी ‘घरोघरी मातीच्या चुली’ या न्यायानुसार सांगितल्या जातात, ज्या आपल्यालाही लागू होतात. वर्तमानातील वास्तविकतेला धरून त्याने काही​ बाबी सांगितल्या, मलाही त्या काही अंशी पटल्या. मी मान डोलावत होतो, तो एकेक पुडी सोडत होता. बोलता बोलला त्याने आपल्या पोतडीतून दोन पांढऱ्या रंगाचे दोरे माझ्या हातात दिले. एक खाण्याचे पान काढले. माझ्या हातावर पान आणि दोरे धरून डोळे मिटून काही तरी पुटपुटला. ‘बाळूमामाचं हे पान हाये बगा. मी सांगतो, तुमच्यावर आमोण्याच्या वेताळाकडे करणी केलीया. पन काय घाबरू नका. तुम्हाला पितृदोष हाये, त्रिपिंडी श्राद्ध घाला, त्यातून तुमचं भलं हुईल बगा. सग्गळं नीट हुईल, विश्वास ठिवा. नोकरीत बरकत येईल. स्वत:चं घर हुईल, मोठी प्रसिद्धी मिळंल, घरात सुखसमृद्धी यील. करणीबाधा छूमंतर हुईल...’ असे काही बाही बोलत त्याने अचानक हातातील पान उघडले. त्यात दोन्ही दोरे जोडले गेल्याचे दिसून आले. ही जादू पाहून मला क्षणभर त्याचे कौतुक वाटले. माझे डोळे विस्फारले आहेत असे पाहून त्याने ‘तुमच्यावतीनं फकस्त धा हज्जारांत मी सोत्ता त्र्यंबकेश्वरला त्रिपिंडी श्राद्ध विधी करतो!’ असं म्हणताच मी​ भानावर आलो.

इतका वेळ त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकल्यामुळे त्यातील फोलपणा आणि विसंगती सहज पकडली होती. त्याला म्हटले, ‘त्रिपिंडी श्राद्धासाठी इतके पैसे लागत नाहीत. तुम्ही खूपच पैसे सांगितलेत.’ मग गोड हसून त्याने ‘माऊली, तुमच्यासाठी सहा हज्जारात काम हुईल, आता न्हाई म्हनू नका,’ असा धोषा लावला. पण मी त्याची फिरकी घेण्यासाठी ठोकून दिले, ‘त्रिपिंडी श्राद्ध तर घरातील ज्येष्ठ माणसाने करायचे असते. ज्याचे आई-वडील हयात नसतात, त्यांनीच ते करायचे असते. आणि माझे आई-वडील तर जिवंत आहेत. शिवाय वडिलांनी गोकर्णला जाऊन आमच्या पितरांचे त्रिपिंडी श्राद्ध घातले आहे. त्यामुळे मी असे करण्याची​ गरजच नाही. शिवाय तुम्हाला माझे आई-वडील हयात आहेत, हे कसे काय कळले नाही?’ हे ऐकताच गडी पार गांगरला. एक ग्लास पाणी मागून घेतले. घटाघटा पाणी पिऊन कसंनुसं हसत तो ‘रामराम, तुमचं भलं हुईल. देवाची किरपा हाय तुमच्यावर’ असे म्हणत टाळ कुटत आणि गात गात पुढे गेला...

सांगण्याचे तात्पर्य इतकेच, की तुकोबारायांनी जो विवेकबुद्धीचा मार्ग सांगितला आहे, तोच मार्ग साेडून आपण दिशाहीन वर्तन करतो, त्याचा फायदा असे भोंदू उठवतात. विशेषत: महिलांच्या बाबतीत त्यांचा अभ्यास पक्का असतो. बायकांना ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ करण्यात त्यांचा हात काेणीही धरू शकत नाही. त्या कथनाला महिला भाळतात. एकदा का समोरच्या व्यक्तीची मनोवृत्ती त्यांच्या अधीन झाली की​, ते आपला स्वार्थ साधतात. त्यासाठी संमोहन, लैंगिक भावना जागविणारी उत्तेजक द्रव्ये, देवांच्या नावे थापा मारून बुद्धिभेद करणे अशा मार्गांचा अवलंब करून महिलांना जाळ्यात ओढतात. विवेकबुद्धी हरवून बसणारा माणूस अशा लोकांच्या भजनी लागतो. विवेकी माणसांनी त्यांना कितीही जागे करायचा प्रयत्न केला, तरी त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. किंबहुना अशा लोकांना ते दूर लोटतात. कथित चमत्कारांच्या नादी लागून पैसा, संपत्ती गमावून बसतात आणि अखेरीस हताशपणा पदरात पडतो. अशोक खरातने हाच फंडा वापरून महिलांना फसवून आपला कार्यभाग साधला. कुडचडेच्या प्रकरणातील सोहम नाईकनेही अशाच प्रकारे मुलींना प्रलोभने, धाक दाखवून वासनातृप्ती करून घेतली. या दोन्ही प्रकरणांत पीडितांची संख्या मोठी आहे. प्रश्न हा आहे की, एक-दोघांच्या बाबतीत असा प्रकार घडला, तर त्याची त्यांनी वेळीच वाच्यता का केली नाही? याला कारणीभूत आपली समाजव्यवस्था आणि कायद्याची लंगडी बाजू आहेत. लोकलज्जेस्तव अशा गोष्टी उघडपणे सांगण्यास अजूनही महिला धजावत नाहीत. आणि कायदा व्यवस्था किती दबावाखाली कासवगतीने काम करते, हे कुडचडेच्या प्रकरणात दिसून आले आहे. या दोन्ही कमकुवत बाजूंवर आपण लक्ष देण्याची गरज आहे. सर्वप्रथम अशी संवेदनशील प्रकरणे वेगवान हालचाली करून हाताळायला हवीत. पीडितांना पाठबळ द्यायला हवे. कारण सामाजिक लज्जेस्तव अशा व्यक्तींकडून टोकाचे पाऊल उचलले जाऊ शकते. समाजानेही थोडी माणुसकी आणि पोक्तपणा दाखवून पीडितांना स्वीकारले पाहिजे. खोट्या प्रतिष्ठेपोटी आपण आणखी किती काळ समाज नासवणार आहोत, याचाही विचार व्हायला हवा. 

या कामी समाजप्रबोधन हाच मोठा दुवा ठरू शकतो. उठसूट दुसऱ्या धर्माच्या लोकांची भीती घालून समाज एकसंध करण्याची गर्जना करणाऱ्या संस्था, संघटनांनी हे आव्हान पेलायला हवे. पुराणातल्या वानग्या, कथाकथन आणि गायन वगैरे करून समाजप्रबोधन करण्याचा टेंभा मिरविणाऱ्यांनी तर या गोष्टींना गांभीर्याने घेऊन आताच कामाला लागायला हवे. समाजाला दिशा देण्याची जबाबदारी या घटकांची आहे. आज समाजाला खरा धोका परकीय धर्मातील लोकांपेक्षा आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या अशा मतलबी लोकांपासून आहे. त्यांचे वारू वेळीच आवरण्याचा प्रयत्न व्हायला हवा. स्त्री शिक्षणासाठी, सामाजिक समानतेसाठी खस्ता खाणाऱ्या पूर्वसुरींचे आदर्शवादी, सुधारणावादी विचार पुढे न्यायला हवे. धर्म महत्त्वाचा आहेच, पण त्याहून महत्त्वाचे आहे ते अशा घटकांना जागृत करणे. शालेय पातळीपासून मुलींची सक्षम जडणघडण समुपदेशनाच्या माध्यमातून करायला हवी. अशा बिकट प्रसंगी काय भूमिका घ्यावी, हे त्यांना समजावून सांगायला हवे. विशेष म्हणजे आजच्या सोशल मीडियाशरण युगात पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद ठेवायला हवा. त्यांच्या वर्तनाकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. वर्तनात बदल दिसून आले, तर त्याचा ठाव घ्यायला हवा. त्यातून कुडचडेतील वासनाकांडासारखी घटना वेळ निघून जाण्याआधी उघडकीस येऊ शकते. या खल प्रवृत्ती नियंत्रणात ठेवायच्या असतील, तर सामाजिक जबाबदारीचे भान सर्वांनीच राखायला हवे. केवळ न्याय व्यवस्था किंवा पीडितांच्या मर्यादांवर टिप्पणी करून काहीच साध्य होणार नाही!


सचिन खुटवळकर 

(लेखक गोवन वार्ताचे वृत्त संपादक अाहेत..)