'आजारी' समाज आणि अदृश्य भीतीचे बागुलबुवा...

चित्रपट असो की समाजमाध्यमे, जमेल तितके बौद्धिक विष कालवणारे मातले आहेत. त्यांचा अजेंडा एकच, आपल्या स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरायचे. संवेदनशील मुद्दे उपस्थित करून भीतीचा बागुलबुवा उभा करायचा आणि अगदी शिक्षित लोकांनाही बुद्धीभेदाच्या भरीस पाडायचे. परस्परसंवाद आणि बंधुता एकदा संपुष्टात आले की, आपल्याला हवी तशी समाजव्यवस्था उभी करता येईल, हे त्यांचे षडयंत्र. अशा सततच्या दिशाभूलकारक उपद्व्यापांमुळे समाज फार आजारी पडला आहे. त्याने वेळीच सावरायला हवे. अन्यथा उत्क्रांतीची, विकासाची स्वप्ने विसरावी लागतील.

Story: वर्तमान |
21st March, 10:57 pm
'आजारी' समाज आणि  अदृश्य भीतीचे बागुलबुवा...

प्रगतशीलता हा मानवी जीवनाचा मूळ धर्म. पण आज याच धर्माला भ्रष्ट करून काही घटक समाजमानसाला दूषित करू पाहत आहेत. परस्परसंवाद आणि बंधुता हा समाजाला जोडणारा दुवा. मात्र त्यावरच घाव घातला जात आहे. त्यातून नुकसान समाजाचेच होत आहे. मूठभर लोकांच्या नादी लागून बहुसंख्य लोक अख्खी समाजरचनाच उद्ध्वस्त करू पाहत आहेत. अशा गंभीर स्थितीत हातावर हात धरून न बसता निदान बुद्धिजीवी घटकांनी तरी या षडयंत्राला थोपवून धरण्याचा प्रयत्न करायला हवा. सरकारी यंत्रणेकडून मिळू शकणारे लाभ किंवा 'अर्बन नक्षली'सारखा शिक्का बसण्याच्या भीतीने गप्प बसून चालणार नाही. ते धाडस वेळ निघून जाण्यासाठी दाखवावे लागेल. या विवेचनामागे अलीकडेच घडलेल्या काही घटना आहेत. त्याचा संक्षिप्त आढावा घेऊ... 

महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे ‘केरला स्टोरी टू’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर एक अजब प्रकार घडला. हिंदूंनी अन्य धर्मीय व्यक्तींकडून खरेदी न करता केवळ हिंदूंकडूनच खरेदी करावी, अशी शपथ काहींनी उपस्थितांना घ्यायला लावली. हिंदूंवर होणारे अत्याचार आणि धर्मांतराविरोधातील या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर गैर हिंदूंशी मैत्रीदेखील करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. या प्रतिज्ञेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले किंवा ते जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आले. ‘भाजी घ्यायची तर हिंदूकडूनच घ्या, केस कापायचे तर हिंदूकडूनच कापून घ्या,' अशी अव्यावहारिक प्रतिज्ञा यावेळी उपस्थित असलेल्यांना सक्तीने देण्यात आली. कायद्याच्या चौकटीत ही कृती गुन्हा ठरते. त्याला पायबंद घालायला हवा, पण आजच्या दूषित यंत्रणेकडून तशी अपेक्षा करता येणार नाही. म्हणून समाजमन नासवणाऱ्या मानसिकतेची चिकित्सा करणे क्रमप्राप्त आहे.

केवळ स्वधर्माच्या प्रेमातून अन्य धर्माच्या लोकांना अशा हीन पातळीवर जाऊन लक्ष्य करण्याचे प्रकार अलीकडच्या काही वर्षांत सातत्याने घडताना दिसतात. या लोकांचे लक्ष्य केवळ दुसऱ्या धर्मियांना धाकात ठेवणे इतका मर्यादित नाही, तर आम्ही सांगू तेच धर्मनियम आणि आम्हाला अपेक्षित तेच धर्माचरण असा अहंकारी बाणा आहे. इतक्याच टोकाची भूमिका घ्यायची, तर या लोकांनी उघडपणे अन्य ध​र्माच्या देशातून कसलीच आयात सरकारने करू नये, अन्य धर्माच्या देशांशी सर्व संबंध तोडून टाकावे, अशी गर्जना करून पहावी. पण तशी भूमिका ते कधीच घेणार नाहीत. कारण त्यांचे ध्येय ते मुळीच नाही. त्यांचे ध्येय एकच, दुसऱ्या धर्माच्या कथित भीतीचा बागुलबुवा दाखवून आपल्या विचारसरणीप्रमाणे समाजमन कसे चालेल, हे पाहणे! 

या लोकांना कतार, इराणमधून आलेले इंधन चालते, अमेरिकेतून आलेले धान्य, कृषी उत्पादने चालतात, पण आपल्याच शेजारी असलेल्या एखाद्या परधर्मीय व्यक्तीचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय डोळ्यांत खुपतो. बरं, यांच्या विचारांप्रमाणे वाटचाल करता येईलही, पण केवळ तोंडपट्टा चालविणाऱ्यांकडून धर्मावर आधारित पर्यायी व्यवस्था उभारली जाईल का? उत्तर नाही असेच येईल. कारण मांसाहारी घटकांचा व्यवसाय करणाऱ्या ठराविक वर्ग, पक्षी जातीचे लोक तिथे अपेक्षित आहेत. तीच गत पादत्राणे तयार/दुरुस्ती​ करणाऱ्यांची, गवंडीकाम, गॅरेज, केशकर्तनासह अन्य परंपरागत किंवा आधुनिक कष्टाचे व्यवसाय करण्याची धमक अशा लोकांत मुळीच नसते. पांढरपेशा जमातीतून येणारी ही दर्पोक्ती व्यावहारिकतेच्या कसोटीवर मुळीच टिकून राहत नाही. कारण हे सर्व व्यवहार अन्य धर्मातील घटकांनी काबिज केले आहेत. यामागे श्रमप्रतिष्ठा हे एक कारण आणि आपल्या धर्मातील लोकांनी अशा व्यवसायांकडे फिरवलेली पाठ हे दुसरे कारण. समाजव्यवस्थेतील या ‘रिकाम्या जागा’ भरण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे समाजातील समतोल टिकून आहे, हे सत्य आपण स्वीकारणार नसू, तर आपल्याइतके बिनडोक आपणच! धर्म धर्म म्हणून भुई थोपटताना आपण इतके द्वेषाने आंधळे का होत आहोत, त्याची खरेच गरज आहे का, याचा सारासार विचार प्रत्येकाने करायला हवा. कोणाच्या तरी डोक्यातून आलेल्या या मागास संकल्पना आपण स्वीकारायच्या का, ते विचार पटत नसतील, तर निदान त्याविरोधात आवाज तरी उठवायचा का, हे प्रत्येकाने ठरवावे. एक सोपा प्रश्न. हीच शपथ ​किंवा प्रति​ज्ञा उघडपणे अन्य धर्मियांनी केली, तर आपली काय प्रतिक्रिया असेल? तीच प्रतिक्रिया आपण तटस्थपणे आपल्याबाबतीतही तपासून पाहायला हवी. 

रस्त्यावर वाहन बंद पडले, आपल्याला आपत्कालीन वैद्यकीय मदतीची गरज भासली, तर आपण आपल्या धर्माचा माणूस येईपर्यंत वाट पाहणार आहोत का? अशा स्थितीत जो विचार आपल्या मनात येतो, तोच विचार म्हणजे माणुसकी. राज्यघटनेच्या मजबूत पायावर आधारित लोकशाहीचे आपण घटक आहोत. आपल्या किंवा कोणाच्याही धर्मावर घाला घालणारे समाजविघातक प्रकार घडतील, त्याच्या मुळावर घाव घालायलाच हवा, पण तो कायद्याच्या बळावर. आणि ते करण्याची कुवत राज्यकर्त्यांत आणि नोकरशहात नसेल, तर आपण चुकीच्या माणसांकडे आपले प्रतिनिधित्व सोपविले आहे, हे जाणले पाहिजे. धार्मिक भूमिकांच्या आधारे कायमस्वरूपी राजकीय ध्रुवीकरण करणाऱ्या शक्ती राज्यघटनेतील मूल्यांचे थेट उल्लंघन करतात. त्यांना खडेबोल सुनावण्याचा अधिकार असणाऱ्या यंत्रणा त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करतात. हा एकांगीपणा जागरूक नागरिकांनीच मोडून काढायला हवा. आपल्या अवतीभोवती अनेक अप्रिय घटना घडत असतात. अनेकांना विविध समस्या सतावत असतात. त्याकडेही आपण दरवेळी जाती-धर्माच्या चष्म्यातून पाहणार आहोत का? आपल्या मुलांना अशा संकुचित मानसिकतेची शिकवण आपण देणार आहोत का? जगण्याकडे पाहण्याची आपली दृष्टी विशाल असायला हवी. ती दृष्टीच आपण गमावून बसण्याकडे वेगाने वाटचाल करत आहोत. पण यात नमूद करण्याजोगी एक गोष्ट म्हणजे, अशा संकुचित गोष्टींचा आग्रह धरणारे स्वत: मात्र नामानिराळे राहतात. अशांचे आप्तस्वकीय खुशाल अन्य धर्मियांचे प्राबल्य असलेल्या विदेशांत सुखाने नांदतात. याचा विचार कोणी करणार आहे की नाही? 

गेल्या फेब्रुवारी महिन्यात उत्तर भारतातील दोन घटनांनी देशाचे लक्ष वेधले. मात्र या घटनांची फारशी चर्चा माध्यमांतून झालेली दिसली नाही. कदाचित अशा गोष्टींना माध्यमांनी थारा देऊ नये, असे दबावतंत्र असू शकते. असो. पहिली घटना आहे पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील. पुन्नेवाल गावातील स्थानिक मुस्लिमांना नमाझ अदा करण्यासाठी अन्य गावातील मशिदीत जावे लागत असे. ही​ अडचण ओळखून पंडित जसपाल राम आणि विजय कुमार यांनी मशीद उभारण्याकरिता आपली खासगी जमीन भेट देऊन सामाजिक सलोखा वृद्धिंगत केला. या गोष्टीचे अपार कौतुक झाले. अशीच दुसरी अनुकरणीय घटना घडली ती पंजाबच्याच मोहाली जिल्ह्यात. जामपूर येथील हिंदूंना मंदिर बांधण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्या भागात हॅपी मलिक या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मोहम्मद इम्रान या व्यापाऱ्याने आपली ८० लाख रुपये किमतीची जमीन हिंदूंना मंदिर बांधण्यासाठी दान केली. अन्य धर्मियांकडून भाजीपाला, कपडे विकत घेऊ नका म्हणणाऱ्या प्रवृत्तींच्या श्रीमुखात लगावलेली ही चपराकच नाही का? दोन्ही धर्मातील व्यक्तींना दुसऱ्या धर्मातील व्यक्तींपासून धोका वाटत नाही. त्यामुळेच त्यांनी एकमेकांची अडचण ओळखून भूदान केले. आता यावर काही जण काश्मीरमधील पंडितांच्या शिरकाणाचा दाखला देऊन युक्तिवाद करतीलही. कारण त्यांना या दोन्ही घटनांतील चांगली बाजू वर्ज्यच असते. अशा सकारात्मक गोष्टी आपल्या अवतीभोवती घडलेल्याच त्यांना नको असतात. पण ज्यांची विवेकबुद्धी शाबूत आहे, अशा सर्वच धर्मातील लोकांनी यातून शिकण्यासारखे फार काही आहे.

आपला समाज हल्ली फार आजारी असल्याचे दिसून येते. त्याची बुद्धी भ्रष्ट करण्याचे कारस्थान सातत्याने रचले जाते. समाजातील सगळेच घटक त्याला बळी पडतात. घातक गोष्टींच्या प्रचाराला बळी पडून त्याचे अंधानुकरण केले जाते. आपल्या डोळे, कान, नाक, जीभ अशा ज्ञानेंद्रिंयांची अवस्था बिकट झाली आहे. प्रत्येक गोष्टीत जातीयवाद, टोकाचा धार्मिक द्वेष पेरला जातो. एका अर्थाने सगळ्या समाजाला मानसिक गुलामगिरीचाच आजार जडला आहे. हा समाज या आजारातून सावरायला हवा. त्याला प्रेमाच्या, परस्परसंवदाच्या आणि विश्वासाच्या उपचारांची फार गरज आहे. केवळ हिंदूंनीच नव्हे, तर इतर धर्मियांनीसुद्धा या उपचार प्रक्रियेत आपला वाटा उचलायला हवा. भारतात गुण्यागोविंदाने राहायचे असेल, तर आपला धर्म तितकाच श्रेष्ठ यहा भ्रामक समजुतीतून बाहेर पडायला हवे. परधर्माचा आदर करायचा मोठेपणा दाखवायला हवा. कुठल्याही देशाची प्रगती ही त्या देशातील एकात्मतेच्या तत्त्वावर अवलंबून असते. ती साधायची असेल, देश ‘विश्वगुरू’ बनवायचा असेल, तर आताच एकदिलाने जगायची सवय लावून घ्यायला हवी. अन्यथा विकासाच्या बाता फक्त तोंडाच्या वाफा काढण्यापुरत्या राहतील आणि इतर विकसित देशांची प्रगती निमुटपणे पहाण्याची अगतिकता आपल्यावर ओढावेल, हे ध्यानात घ्यायला हवे!


सचिन खुटवळकर 
(लेखक गोवन वार्ताचे
वृत्त संपादक अाहेत..)