गुढी ही एक प्रकारची काठीच असते. अशी काठी पूजन परंपरा जगाच्या विविध भागांत प्रचलित आहे. फाल्गुनात वाईट गोष्टींची होळी केली जाते; पुढे येऊ घातलेल्या चैत्र पालवीच्या स्वागताची ती तयारीच असते.

फाल्गुन महिन्यात गोव्याच्या कानाकोपऱ्यात वैविध्यपूर्ण अशा विधीनृत्य-नाट्याचा अभूतपूर्व आविष्कार अनुभवता येतो. गूढ, रहस्यमय असे विधी भाविकांना अद्भुतरम्य वातावरणात नेऊन सोडतात. नैसर्गिक अधितत्त्व, पृथ्वीतलावरील भव्यत्व-दिव्यत्वाची प्रचिती या विधी नृत्यातून येते. हे सर्व अनुभवताना सर्वसामान्य लोकमानस अचंबित होते. त्या अनाकलनीय शक्तीसमोर देहभान विसरून तो नतमस्तक होतो.
चैत्रात निसर्गाने स्वतःची गुढी उभारलेली आपल्याला सभोवतालाच्या निरीक्षणातून जाणवते. आंबा, फणसाच्या झाडावर गुलाबी-पोपटी छटा पसरलेली दिसते. पिंपळ तर उभाच्या उभा गुलाबी-तांबूस रंगाची लवलव धारण करून भर उन्हात तेवढ्याच चैतन्याने सळसळत आहे. बहावा पिवळ्या धम्मक रंगाची रस्त्याच्या दुतर्फा, माळरानावर उधळण करीत आहे. फाल्गुनात पानांविना फांद्या फुटून फुलणारा देवचाफा आता तर कोवळ्या पानांची सोबत घेऊन झुबक्या-झुबक्यांनी मंदिराच्या प्रांगणात, टेकाडावर मंदगंधी फुलत आहे.
फाल्गुनात पांढऱ्या रंगाच्या केसाळ फुलांनी लक्षवेधक ठरलेला 'कुमयो', शिमगोत्सवात स्थान असलेली 'हुस्कीची' फुले तर चैत्राच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. या चैत्रपालवीचे स्वागत कोकीळ मधुरस्वरांनी करून देताना 'वसंत आलाय' याची ग्वाही देत आहे. वृक्षवेली, पशुपक्षी एवढेच काय तर आसमंत सुद्धा रंग-गंधाने पुलकित झाला आहे. एवढा सारा बदल जर निसर्गात घडून येत असेल, तर मग त्याचे प्रतिबिंब मानवी जीवनव्यवहारावर पडणे सहज शक्य आहे. गुढीपाडव्याचा उत्सव 'नववर्ष' म्हणून साजरा करण्यामागची हीच तर मानवी मनाची धारणा आहे.
संपूर्ण देशात विविध रूढी-परंपरांनी साजरा होणारा हा सण. अनेक कथा-दंतकथा प्रदेशपरत्वे या सणाला चिकटून आहेत. त्यातून सकारात्मक भावना जाणवतात; त्याचबरोबरीने वाईटावर चांगुलपणाचा विजय, मांगल्य आणि पावित्र्याचे प्रतीक म्हणूनही हा सण परंपरेने साजरा होत आलेला आहे. गुढी उभारून तिची पूजा करणे, पताका, गुढ्या-तोरणांनी परिसर सजवणे आणि नव्या पर्वाचे स्वागत करण्याचा आनंद लुटला जातो. प्रभू रामचंद्र चौदा वर्षे वनवासात होते. रावण नावाच्या दुष्ट प्रवृत्तीचा वध करून विजयी मुद्रेने ते अयोध्येत परतले, तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता.
गुढीपाडव्याच्या पहिल्याच रात्री पर्ये गावातील बारा वाड्यांवरील बारा 'रोमटामेळ' भूमिकेच्या मंदिरप्रांगणात एकत्रित येतात. ढोल-ताशांच्या गजरात देहभान विसरून नाचतात. या दिवशी आम्रपल्लव आणि पताकांनी तोरणे उभारली जातात. डिचोली तालुक्यातील साखळी पूर्वीपासून सांस्कृतिकदृष्ट्या सत्तरीच्या पर्ये'शी जोडले गेलेले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी साखळीतील विविध जाती-जमातींत विखुरलेले समाजमन देवीचे आशीर्वचन घेण्यासाठी पर्येला येते.
गोव्यात गुढीपाडव्याला 'संसारपाडवा' असेही म्हटले जाते. कष्टकरी समाजाच्या ओठावर रुळलेला हा शब्द! याच दिवशी नवीन लग्न करून सासरी आलेल्या मुलीची, लग्नाच्या दिवशी 'घरभरवणी'च्या वेळी भरलेल्या ओटीतील तांदूळ-नारळाचा वापर करून खीर शिजवून ती सर्वांना वाटली जाते.
सत्तरीच्या ग्रामीण भागात गुढीपाडव्याला 'रणमाले' हे पारंपरिक लोकनाट्य सादर करण्याची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे.
”परताम नमन गणपते, माघा नमल्या सरस्पते”...
असे नमन करून “शारदे गे सुंदर तू मोरार सुवार..” अशा गीतांतून शारदास्तवन करीत संपूर्ण रात्र जागवली जाते. रणमालेच्या सादरीकरणातून त्या परिसरातील सामाजिक-सांस्कृतिक संचिताचे वेगळेपण अधोरेखित होते. नृत्य, नाट्य, संगीत, अभिनय यांचा सुंदर मिलाफ अनुभवता येतो. रामायण-महाभारत या महाकाव्यांच्या कथानकाच्या पार्श्वभूमीवर 'पाती'ला उभे राहिलेले कलाकार 'जती' गायन करतात. घुमट, कासाळे, ढोल, ताशा या वाद्यांच्या साथीने संपूर्ण रात्र मंतरल्यागत होते. सामाजिक विडंबन, राजकारण, कौटुंबिक जीवन, गावगाड्याचे स्वरूप, तत्कालीन जीवनजाणिवा आणि मानवी नातेसंबंध यांचे प्रतीकात्मक दर्शन 'रणमाले'तून घडते. नवीन वर्ष साजरे करण्याच्या आनंदानिमित्त रणमाले सादर करण्याची परंपरा गोवा, कोकण, तसेच कर्नाटक प्रांतात आजही दृष्टीस पडते.
पेडणे तालुक्यातील पालये गावात गुढीपाडव्याच्या दिवशी पारंपरिक हौशी रंगभूमीवरील नाटकाचे सादरीकरण झाल्यानंतर पहाटप्रहरी 'ताटिका वध' केला जातो. दुष्ट शक्तीवर सुष्टांनी मिळविलेला हा विजय असतो. 'गावडोंगरीचा मलकाजाण' हे मल्लिकार्जुनाचे रूप. गुढीपाडव्याच्या दिवशी मलकाजाणाच्या परिसरात 'दिण्या जत्रे'ला प्रारंभ होतो. अविवाहित पुरुषांनी दिण्याची काठी जत्रेत नाचविण्याची परंपरा आहे. ही दिण्या काठी जोपर्यंत 'दिंडी मुले' (अविवाहित युवक) हातात घेऊन नाचवत नाहीत, तोपर्यंत त्यांना लग्नबंधनात अडकता येत नाही असा रिवाज आहे. वेळपाच्या कुमारीका/तरुणी मस्तकी 'दिवज' धारण करून या जत्रेत सहभागी होतात. हे दिवज पेटवल्यानंतर त्यांना लग्न करण्याची अनुमती प्राप्त होते.
खोतीगाव अभयारण्यात येणाऱ्या आमोणे गावात 'हुसकीच्या' जंगलफुलांनी आणि फळांनी गुढी सजविली जाते. अविवाहित तरुण दिण्याकाठी धारण करतो, तर कुमारिका शेणापासून दिवजे तयार करतात. या दिवजावर तिसरे (शिंपले) बसवतात व त्यात तेल-वात घालून दिवजे पेटवतात. काही गावांत तर गुढीपाडव्याच्या दिवशी
माहेरहून सासरी येताना जी ओटी भरलेली असते, ती पाडव्याच्या दिवशी शिजवून तयार केलेली 'खीर' सर्वांना वाटण्याची प्रथा आहे. यावेळी साडी घालून सासरी तिची ओटी भरली जाते.
ब्राह्मण समाजात तर या नूतन संवत्सराचे पूजन आयुरारोग्य प्राप्ती, ब्रह्मदेवाची पूजा या अंगाने केले जाते. गुढी उभारतानाच्या 'ब्रह्मध्वजात' ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच ज्ञान, कर्तृत्व आणि दुर्जनांची संहारक शक्ती या स्वरूपात मानले गेले आहे. या तिन्ही शक्ती आपल्या दैनंदिन जीवनात गरजेच्या आहेत. ठिकठिकाणच्या मंदिरांत पंचांग वाचन केले जाते. भजन-कीर्तनात मन तल्लीन होऊन जाते. आजच्या दिवशीच विश्वाची निर्मिती झाली असे मानले जाते. विश्वकर्मा समाज यासंदर्भात आपली कृतज्ञता व्यक्त करतो तो हाच दिवस आहे. मोपा-पेडणे येथे आंब्याची 'होळी' घातली जाते. त्यानंतर याच होळीचा वापर करून त्यातून 'गिरोबा' देवाची मूर्ती कोरून तिची स्थापना करतात. गिरोबाची जत्रा भरते. शेकडो भाविक याप्रसंगी उपस्थिती दर्शवून गिरोबाचे दर्शन घेतात.
गुढी ही एक प्रकारची काठीच असते. अशी काठी पूजन परंपरा जगाच्या विविध भागांत प्रचलित आहे. फाल्गुनात वाईट गोष्टींची होळी केली जाते; पुढे येऊ घातलेल्या चैत्र पालवीच्या स्वागताची ती तयारीच असते. हा मंगलमय दिवस. त्याची सुरुवात कडवटपणातून (कडुलिंब) जरी केली गेली असली, तरी उर्वरित दिवस गोड असतो. गोडाधोडाचे जेवण, भजन-कीर्तनाचे श्रवण यातून शारीरिक-मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते. नवीन वर्षाचे स्वागत करण्याची ही अनोखी आणि वैविध्यपूर्ण परंपरा आपल्या प्रदेशाचे वेगळेपण आहे. सण-उत्सव हे आनंदाची पेरणी करतात.

पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)