हा म्हणी म्हणजे लोकसाहित्याचा खरा बावनकशी दागिना आहे, जो कधीही उल्लेखला तरी हिऱ्यासारखा लखलखू लागतो. अशा प्रकारच्या म्हणींमुळेच आपली ग्रामीण भाषा समृद्ध, सुंदर आणि श्रवणीय आहे.

घरणी बाई ओव्या गाताना भावूक होते, मनाची सुखदुःखे ओव्यांमधून व्यक्त करते. पण रोजच्या आयुष्यात जेव्हा घरणी बाई आक्षेपार्ह काहीतरी बघते, त्यावेळी तिच्या ओठांतून अशा म्हणी बाहेर पडतात ज्या नेमक्या वर्मावर बोट ठेवतात.
घरणी बाईच्या रोजच्या आयुष्यात अशा कितीतरी व्यक्ती येतात ज्या स्वार्थीपणाचा कळस असतात. फक्त आपल्यालाच हवे अशी मनीषा बाळगून इतरांच्या प्रती द्वेषाची भावना बाळगतात. या माणसांचा हा अप्पलपोटेपणा आणि स्वार्थ बघून घरणी बाईच्या तोंडून शब्द बाहेर पडतात:
माजा माजा
किड्याचा खाजा
फक्त 'माझे माझे' म्हणून आपण दौलत, जमीन-जुमला गोळा करतो. या स्वार्थापोटी आपली जवळची माणसे दूर होतात, अनेकांशी शत्रुत्व निर्माण होते. माणसा-माणसांमध्ये मनाचे अंतर तयार होते. जो अतिस्वार्थी माणूस असतो, तो सर्व जोडून ठेवता ठेवता त्याचा उपभोग घेणे विसरतो. अशावेळी कधीतरी काळ येतो आणि तो माणूस काळाच्या अधीन होतो. शेवटी त्याने कितीतरी माणसांची मने दुखवून गोळा केलेली धनदौलत मागे तशीच राहते. जवळचा असा कोणी नसल्यामुळे त्याचे सारे धन 'किड्यांचा खाजा' होते; म्हणजेच कोणातरी तिऱ्हाइताच्या हाती लागते. त्यामुळे माणसाने 'माझे माझे, मला हवे मला हवे' म्हणून नुसते जमीन-जुमला आणि धनदौलतीच्या संकलनाला न लागता माणसे जोडावीत, जी आपल्या कठीण काळात उपयोगी पडतील.
जी रिकामटेकडी माणसे असतात, ज्यांना आपल्या आयुष्यात कोणतीही जबाबदारी घ्यायची नसते, ज्या माणसांना कष्ट करायचे नसतात, त्या माणसांना एकच काम असते; गावातील या घरात, त्या घरात डोकावून मिळेल त्याच्या चहाड्या करणे. अशा माणसांना बघून घरणी बाई म्हणते:
आदेग ना उदेग
आया बायाच्ये कुले ताशी
ना घरकाम, ना नोकरी-धंदा; अशी रिकामटेकडी बेकार माणसे दिवसभर आयाबायांचे 'कुले तासत' बसतात. याचा अर्थ असा की, दिवसभर याच्या-त्याच्या चहाड्या करत बसतात. अशा माणसांचे ना स्वतःच्या घरात लक्ष असते, ना संसारात. ही माणसे फक्त येता-जाता दिसणाऱ्या प्रत्येक माणसांमध्ये कोणत्या उणीवा आहेत, आपला संसार कसा अयोग्य रीतीने करतात, याबद्दल तिसऱ्याकडे उपदेशात्मक बोलत असतात. या अशा माणसांच्या बोलण्यामुळे इतरांचे काहीही नुकसान होत नाही, पण चहाडी करणारी माणसे मात्र स्वतःचा वेळ तर फुकट घालवतातच, शिवाय जनमानसातही त्यांना कोणी मान देत नाही. अशा माणसांच्या कुठल्याही गोष्टीकडे प्रत्येक जण कानाडोळा करत असतो.
चहाडी करणाऱ्या माणसापेक्षा छनालपण म्हणजेच नट्टापट्टा करून गाव फिरणाऱ्या स्त्रीला सुद्धा जास्त मान असतो. नट्टापट्टा करणाऱ्या स्त्रीचे आपल्या घरावर, संसारावर लक्ष नसते; ती फक्त आपल्या नटण्या-मुरडण्याकडेच लक्ष देत असते. पण अशी स्त्री दुसऱ्याचे काहीही नुकसान करत नाही. तिच्या या वागणुकीमुळे झाले तर तिचेच नुकसान होते. पण चहाडी करणारी स्त्री ही दुसऱ्यांची घरे मोडणारी असते. तिच्या चहाडी करण्याच्या सवयीमुळे इतरांना त्रास होतो. म्हणूनच घरणी बाई म्हणते:
छिणाल सर मदी
चाडी घर मोडी
याचा अर्थ 'छिणाल' बाई जर कधी घरी आली, तर ती सगळ्यांच्या मध्ये येणार, आपल्या रंग-रूपाचे प्रदर्शन करणार, मनात काहीही न ठेवता सगळ्यांशी बोलणार आणि निघून जाणार. पण चहाडी करण्याची सवय असलेली माणसे कोणत्याही कार्याच्या निमित्ताने घरात आली, तर ती एखादा कोपरा धरून चहाड्या करण्यात मग्न होतात. चहाडी करणारी माणसे घर मोडणारी असल्यामुळे त्यांना घरात सुद्धा बसवून घ्यायचे नाही, असा याचा गर्भित अर्थ.
एखादा माणूस मुळात आळशी असला तर त्याला प्रत्येक गोष्ट करण्यात आळस वाटतो. अशावेळी त्याचा हा गुण दाखवण्यासाठी घरणी बाई उपहासात्मक म्हण म्हणते:
आळशा आळशा भिकणा भाज
माजांन नजो मियां हरयीच खायन
आळशी माणसाला फणसाच्या बिया (म्हणजेच भिकणा) भाजून सर्वांना दे आणि तूही खा, असे सांगितले तर तो आळशी माणूस सरळ सांगतो की, "मला भिकणे भाजून खायला आवडत नाहीत, मी 'हरवी' म्हणजे कच्चीच भिकणे खाईन." याचाच अर्थ असा की, एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य याचा विचार सुद्धा न करता, ज्यामुळे शरीराला आराम मिळेल अशीच पद्धत आळशी माणूस स्वीकारतो. यामुळे त्या माणसाला अनेक नुकसानांना तोंड द्यावे लागते, पण जीवाला त्रास देण्यापेक्षा नुकसान सोसणे आळशी माणूस पसंत करतो.
काही माणसांचा स्वभाव असा असतो की, आपल्या हातून कितीही चुका झाल्या तरी त्या झाकून ठेवायच्या, पण दुसऱ्याची लहानात लहान चूक सुद्धा गावभर बोलून दाखवायची. अशा स्वभावाच्या माणसांना बघून घरणी बाई म्हणते:
आपला कुपात आणि दुसऱ्याचा सुपात
आपले जे काही गुपित आहे ते 'कुपात' म्हणजेच कोपऱ्यात दडवून ठेवायचे आणि दुसऱ्याचे गुपित मात्र 'सुपात' घेऊन वाऱ्यावर टाकायचे. ज्याप्रमाणे भात सुपात घेऊन पाखडले जाते आणि त्यातील कचरा चौफेर फेकला जातो, त्याप्रमाणे ही माणसे दुसऱ्यांची गुपिते सुपात घेऊन ती चौफेर पसरवतात. त्यामुळे दुसऱ्यावर आंधळेपणाने विश्वास न ठेवता आपले गुपित आपल्यापर्यंतच ठेवावे, असा संदेश घरणी बाईची ही म्हण देते.
असे अनेकदा होते की गोष्ट आपल्या अगदी जवळच असते, पण आपण तिला घरभर शोधतो आणि ती सापडत नाही म्हणून आपली चिडचिड होते. ही चिडचिड बघून घरणी बाई म्हणते:
खाकेर कळसो
गावार वळसो
'कळसो' म्हणजेच घागर काखेतच आहे आणि शोध मात्र गावभर घेतला जात आहे. ही म्हण आपल्याला सांगून जाते की, आपण एखादी गोष्ट शोधताना घाबरून न जाता किंवा चिडचिड न करता ती शांतपणे शोधली तर आपल्याला सहज मिळते. पण त्याच जागी आपण संताप केला तर आपला गोंधळ उडतो आणि अगदी पुढ्यात असलेली वस्तू देखील सापडत नाही.
आपल्या दैनंदिन आयुष्यात दिसणाऱ्या उदाहरणांमधूनच या अशा नेमक्या आणि वर्मावर बोट ठेवणाऱ्या म्हणी घरणी बाईच्या मुखातून बाहेर पडत असतात. दुटप्पीपणे वागणाऱ्या माणसांना बघून घरणी बाई म्हणते:
म्हारीन पडली सकली
दोनय खळी चुकली
'म्हारीन' हा शब्द येथे जातीवाचक नसून एक लोकप्रथा सांगण्यासाठी वापरला गेलेला शब्द आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा भातशेतीची मळणी व्हायची, त्यावेळी मळणीवर 'थोरली गावकरीण' खळे मागायला यायची (खळे म्हणजे आपल्या हिश्याचे भात). पण कधी कधी ही स्त्री एका खळ्यावर जाऊन वायफळ स्तुती करण्यात आपला वेळ घालवत असे. अतिस्तुतीमुळे मालकाला संशय येऊन तिथे तिला काही मिळत नसे आणि वेळ टळून गेल्यामुळे दुसऱ्या खळ्यावरही पोहोचता येत नसे; परिणामी तिथलेही खळे चुकत असे. नात्यांमध्ये व्यवस्थित मेळ घालता न आल्यामुळे जेव्हा एकाची फसगत होते, तेव्हा ही म्हण वापरली जाते.
सर्वात महत्त्वाची अशी अजून एक म्हण घरणी बाई म्हणते:
बागूक ना आवो
तेनी बगलो दिवो
तो दिपकलों
याचा अर्थ असा की, ज्या माणसाने कधी 'आवो' (भाताचे रोप) सुद्धा बघितलेले नाही, त्याने अचानक 'दिवा' बघितला आणि तो इतका दिपून गेला की आपले जुने दिवस विसरून गेला. एखाद्या गरीब माणसाला अचानक धनलाभ झाला की तो माणूस अशा प्रकारे दिपून जातो की त्याला स्वतःचे जुने दिवस आठवत नाहीत. आपण जन्मजात श्रीमंत असल्यासारखे वागणाऱ्यांना बघून घरणी बाई उपहासाने हे म्हणते.
या म्हणी नेमक्या शब्दांत जखमेवर बोट ठेवणाऱ्या आहेत. हा लोकसाहित्याचा खरा बावनकशी दागिना आहे, जो कधीही उल्लेखला तरी हिऱ्यासारखा लखलखू लागतो. अशा प्रकारच्या म्हणींमुळेच आपली ग्रामीण भाषा समृद्ध, सुंदर आणि श्रवणीय आहे.

गाैतमी चाेर्लेकर गावस