भारतात जोपर्यंत चार लोक एकत्र बसून गप्पा मारणार आहेत, तोपर्यंत समोश्याचं हे 'सिंहासन' हलवणं शक्य नाही. पित्झा, मोमो, पास्त्याच्या युगात आज फक्त समोसाच आहे जो एकटाच सर्वांना टक्कर देतो. समोशापुढे कुणाचेच चालत नाही. समोशाच्या हुक्मावर सर्वांची मान खाली होते.

सोशल मीडियावर एकदा फोटो व्हायरल झालेला, जो पाहून कोणत्याही खवय्याच्या तोंडातून लाळ गळण्याऐवजी गॅसमुळे पोट फुगेल. त्या फोटोत एका भव्य सिंहासनावर 'समोसा महाराज' विराजमान आहेत आणि त्यांच्या पायाशी वडापाव, डोसा, पोहे आणि पाणीपुरी नतमस्तक झाले आहेत. खरे म्हणजे हे भारतीय खाद्यसंस्कृतीचे एक तिखट-गोड सत्य आहे. ‘समोसा’ भारतीय जनतेने निवडलेला, तळलेल्या लोकशाहीचा निर्विवाद सम्राट आहे. इडली, डोसा, पोहा, कचोरी, ढोकळा, वडापाव, मोमो, भेल, पावभाजी, चाट आणि पाणीपुरी—हे सगळे आपापल्या प्रांताचे मुख्यमंत्री. कोणी दक्षिणेचा सोज्वळ नेता, कोणी मध्य भारताचा साधेपणाचा प्रतिनिधी, तर कोणी मुंबईचा झणझणीत आवाज! पण जेव्हा “सार्वत्रिक लोकप्रियता” या मुद्द्यावर मतदान होतं, तेव्हा सर्वच एकमताने म्हणतात— “समोसा, तुम आगे बढ़ो!”
समोशाची खरी ताकद काय? तो शाकाहारी असूनही मांसाहाऱ्याला भुलवतो आणि स्वस्त असूनही राजेशाही वाटतो. सकाळी कॉलेजच्या कँटीनमध्ये तो विद्यार्थी चळवळीचा नेता असतो, दुपारी ऑफिसच्या चहाबरोबर तो तणावनाशक असतो आणि संध्याकाळी पाहुण्यांसमोर तो झटपट आदरातिथ्य मंत्री बनतो. तो बहुपदरी कारकीर्द निभावणारा एकमात्र राजा आहे.
समोसा एखाद्या मुरलेल्या राजकारण्यासारखा असतो, कोणत्याही 'पार्टी'मध्ये फिट होतो. ऑफिसची मीटिंग असो, लग्नाचा मुहूर्त असो किंवा पाहुण्यांचा अचानक झालेला हल्ला — समोसा धावून येतो. तो इतका लवचिक आहे की, तो कधी चटणीसोबत युती करतो, तर कधी 'समोसा चाट' होऊन दह्या-कांद्यासोबत आपले सरकार स्थापन करतो. इडली-डोसे म्हणत असतील, “आम्ही हलके-फुलके, आरोग्यदायी!” पोहा म्हणतो, “मी सकाळचा राजा!” वडापाव गर्जतो, “मी मुंबईची ओळख!” मोमो म्हणतो, “मी आंतरराष्ट्रीय आहे!” पण समोसा फक्त हसतो. कारण त्याला माहीत आहे — वादविवादाने पोट भरणार नाही, फक्त समोशाने भरणार. सिंहासनावर बसलेला समोसा केवळ खाद्यपदार्थ नाही, तर तो भारतीय मानसिकतेचं प्रतीक आहे. आपल्याला कितीही ‘डाएट’, ‘कॅलरीज’ आणि ‘फिटनेस’ सांगितलं, तरी चहाबरोबर समोर समोसा आला की सगळे तत्त्वज्ञान गुंडाळून बाजूला ठेवतो. राजकीय नेत्यांना सुद्धा बघा, जरी ‘राष्ट्र प्रथम’ असले, पण बैठकीमध्ये ‘समोसा सर्वोपरि’ असतो!
पूर्वी समोसा म्हणजे बटाटा, थोडे वाटाणे, हिरवी मिरची आणि भरपूर तेल. पण काळानुसार समोसा अपग्रेड झाला आणि मग कितीतरी प्रकारचे समोसे जन्माला आले. समोसा हा खरोखरच 'किंग मेकर' आहे आणि आता त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला आहे! भारतात पनीरने स्वतंत्र प्रजासत्ताकच स्थापन केलं आहे, समोश्यात सुद्धा पनीर घुसलाय - मटर पनीर समोसा, चिली पनीर समोसा, शाही पनीर समोसा. बिचारा बटाटा कुठे कोपऱ्यात उभा राहून म्हणत असेल - “मी मूळ संस्थापक आहे, पण आज मला ‘साधा समोसा’ म्हणतात!” पित्झा समोसा पाहून इटली हादरलं असणार, पास्ता समोसा पाहून नूडल्स गोंधळात पडले आणि चॉकलेट समोसा पाहून मधुमेहाने थेट अर्जच भरला — “माझी कायमस्वरूपी मानवी शरीरात नेमणूक करा!”
आज ग्राहक दुकानात जातो तेव्हा प्रश्न असतो — गरम काय आहे? समोसा म्हटल्यावर कुठला समोसा हा प्रश्न पडतो. १० रुपयांचा साधा समोसा गरिबांचा, तर ६० रुपयांचा चॉकलेट-स्ट्रॉबेरी समोसा इंस्टाग्रामचा. चव तोंडात नाही, तर फोटोमध्ये असते. ज्या इटलीने जगाला पित्झा आणि पास्ता दिला, त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की एक दिवस त्यांचा पास्ता भारतीय समोशाच्या पोटातील स्टफिंग बनेल. समोसा म्हणजे तिखट आणि चटपटीत हे समीकरण आता जुनं झालंय. आता 'चॉकलेट समोसा', 'स्ट्रॉबेरी समोसा' आणि चक्क 'पाइनअप्पल समोसा' मैदानात उतरले आहेत. लग्नामध्ये जेवण झाल्यावर लोकांनी 'आईस्क्रीम'च्या जागी 'फ्रूट समोसा' खाल्ला तर नवल वाटायला नको. समोशाने आता 'मेन कोर्स'पासून 'डेझर्ट'पर्यंत सर्व खात्यांवर आपली हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. समोशाच्या या वाढत्या व्याप्तीमुळे आता 'पोट' सुटलेल्या माणसाला 'तुझं शरीर बेढब झालंय' म्हणण्याऐवजी 'तू समोसा झाला आहेस' असं म्हणणं जास्त सन्मानजनक वाटू लागलंय.
चिकन, पनीर समोसा तर होताच, आता कदाचित व्हीगन शैलीमुळे ‘सोयाबीन खिमा समोसा’ आलाय. म्हणजे 'फील' मांसाहारी, पण तत्त्व शाकाहारी! समोसा आता 'युनिव्हर्सल कंटेनर' झाला आहे. जगातलं जे जे काही चांगलं किंवा विचित्र आहे, ते सर्व समोशाच्या त्या त्रिकोणी आवरणात कोंबता येतं हे भारतीय लोकांनी सिद्ध केलंय. बिचारा वडापाव अजूनही 'पाव' आणि 'लसूण चटणी'च्या प्रेमात अडकून पडलाय, इकडे समोशाने मात्र 'चॉकलेट' आणि 'चाऊमीन' सोबत आंतरराष्ट्रीय करार केले आहेत! वडापाव जरी मुंबईचा दादा असला, पण समोसा हा 'कॉस्मोपॉलिटन' आहे. तो कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत स्वतःचा 'त्रिकोण' टिकवून आहे. त्याची भूमिती कधीच चुकत नाही! तो कधीच आऊट ऑफ शेप होत नाही. उलट तो आणखीनच हृष्टपुष्ट होत चाललाय. मोमोला स्टाईल आहे, मेयॉनीजचा आधार आहे, पण समोश्याच्या बटाट्यामध्ये जी 'मॅच्युरिटी' आहे, ती या वाफेवर शिजलेल्या पोरांमध्ये कुठून येणार?
भारतीय समोसा हा मूळ 'बाप' माणूस. गोवन समोसा इतर समोशांपेक्षा थोडा जास्त 'रिलॅक्स' असतो. पंजाबी समोसा हा समोशांचा 'दारासिंग' आहे. आकाराने मोठा आणि बटाट्यांनी इतका गच्च भरलेला की याचे पोट नंतर माणसाला पण येते. समोशात चिकन घालणे म्हणजे नरकासुरच्या रात्रीला ‘आज की रात मज़ा हुस्न का आँखों से लीजिए’ हे गीत लावण्यासारखे आहे. ज्यांना बटाटा आवडत नाही आणि जे डाएटवर आहे म्हणतात, त्यांच्यासाठी मशरूम समोसा हा एक अयशस्वी प्रयत्न आहे. पनीर समोसा हा 'हाय सोसायटी' समोसा आहे. अंडी समोसा हा सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचा स्नॅक्स एकत्र रूपात जन्माला आलाय. पालक समोसा हा ‘पोपाय दी सेलर मॅन’ बघून लहान मुलांना फसवण्यासाठी आईने केलेला कट असू शकतो.
भारतीय खाद्यसंस्कृतीच्या इतिहासात अनेक युद्धं झाली, पण २०२० मध्ये एका अशा युद्धाची ठिणगी पडली ज्याने समोसा प्रेमींच्या आत्मसन्मानाला थेट धक्का लावला - 'ब्रोकोली समोसा'! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप भारत भेटीवर आले होते, तेव्हा त्यांच्यासाठी मेनूमध्ये खास 'ब्रोकोली समोसा' ठेवण्यात आला होता. हे ऐकल्यावर अख्ख्या भारताने एकच सूर लावला— "Don't change the filling of Samosa, it hurts Samosa's feelings!" समोशाच्या आवरणात ब्रोकोली भरणे म्हणजे जीन्सवर कुंकू लावण्यासारखे आहे. 'कुछ भी करने का था सिंघम, पर जयकांत शिक्रे का इगो हर्ट नहीं करने का था...' तशी परिस्थिती समोशाची झालेली. लोकांनी म्हटलंय की विदेशी पदार्थ आणून समोशाच्या पोटात कोंबू नका. पण, जसे काही लोक आता गोव्यात येऊन म्हणतात, 'मला ३० वर्षे झालीत गोव्यात येऊन व तुमच्या पेक्षा जास्त गोवेकर आहे', तशी स्थिती झालीय बटाट्याची. कारण बटाटा सुद्धा विदेशी आहे पण आता तो जास्त भारतीय झालाय. तसे ब्रोकोलीला भारताची सिटीझनशिप मिळायला कदाचित आणखी थोडी वर्षे लागणार.
पाणीपुरी ही जरी जनतेची लाडकी असली, तरी पोट भरण्याच्या बाबतीत लोक समोश्यालाच बहुमत देतात. भारतामध्ये प्रांत बदलतो, भाषा बदलते, विचारधारा बदलते; पण समोसा मात्र सगळ्यांना एकत्र आणतो. तो शाकाहारी-मांसाहारी भेद मिटवतो, गोड-तिखट वाद मिटवतो आणि चहाच्या कपाजवळ सगळ्यांना समान दर्जा देतो. आज समोसा अनेक रूपांत आहे, पण तत्त्व एकच — तेलात तळलेलं आणि मनात भरलेलं! मूळ चवीपेक्षा ‘नावीन्य’ अधिक महत्त्वाचं झालं आहे म्हणून नाना प्रकारचे समोसे अस्तित्वात येत आहेत. भारतात जोपर्यंत चार लोक एकत्र बसून गप्पा मारणार आहेत, तोपर्यंत समोश्याचं हे 'सिंहासन' हलवणं शक्य नाही. पित्झा, मोमो, पास्त्याच्या युगात आज फक्त समोसाच आहे जो एकटाच सर्वांना टक्कर देतो. समोशापुढे कुणाचेच चालत नाही. समोशाच्या हुक्मावर सर्वांची मान खाली होते.

आदित्य सिनाय भांगी, पणजी