निसर्गातील प्रत्येक सजीव पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असतो. काही कीटक चक्क माणसासारखी शेती करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंग्या, ज्या अन्नासाठी मावा कीटकांची वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने जोपासना करतात.

निसर्गातील प्रत्येक सजीव पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असतो. अन्न शोधणे, त्या अन्नातून मिळालेली ऊर्जा वापरून शिकार करणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे, आपली पिढी पुढे नेणे यासारखी दैनंदिन कामे करत असतात. काही सजीव अन्नासाठी थेट इतर प्राण्यांवर अवलंबून असतात तर काही आपल्या उदरनिर्वाहासाठी अप्रत्यक्ष पद्धती वापरतात. गंमत म्हणजे काही कीटक माणसासारखी शेतीही करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंग्या.
मुंग्या लहान कीटकांची शेती करतात. माणूस कसा मधासाठी मधमाशांची शेती करतो, अगदी तशी. याला 'mutualism' असे म्हणतात. हा शेतीचा तो प्रकार आहे ज्यात शेती करणाऱ्याला व ज्याची शेती केली जाते त्याला, अशा दोघांनाही फायदा होतो. मुंग्या 'मावा कीटक' (अफिड) नामक कीटकांची शेती करतात. ते हिरव्या, काळ्या, तपकिरी किंवा पिवळ्या रंगाचे असतात. मावा कीटक वनस्पतीच्या कोवळ्या पानांवरचा, शेंड्यावरचा रस शोषून घेतात. झाडांवरचा रस शोषून घेणारा हा कीटक मऊ शरीराचा असतो. हे बहुधा झुंडीने (गट करून) राहतात. या प्रक्रियेत मावा कीटकाला कसलीच हानी पोहोचत नाही, उलट फायदा होतो. हा कीटक झाडांचा रस शोषून 'हनीड्यू' (झाडाच्या पानांवर आढळणारा मधासारखा गोड चिकट द्रव) नावाचा गोड द्रव तयार करतो.
मुंग्यांना हा गोड द्रव खूप आवडतो. त्यामुळे मुंग्या मावा कीटकाला पाळतात, त्यांना जपतात व त्यांचे संरक्षण करतात. मावा कीटक राहतात ते ठिकाण (झाडाची फांदी/खोड इत्यादी) सुरक्षित नसल्यास किंवा मावा कीटकाला भक्षकांनी खाण्याची भीती असल्यास मुंग्या त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवतात. शत्रूंपासून त्यांचे रक्षण करतात. त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करतात. गरज पडल्यास अफिडच्या पिल्लांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी त्यांना जमिनीच्या आत लपवतात व त्यांची देखभाल करतात. हा सगळा खटाटोप मुंग्या फक्त
हनीड्यू मिळवण्यासाठी करत असतात. हनीड्यू खाण्यासाठी मुंग्या अफिडच्या शरीराला हलका स्पर्श करतात. स्पर्श करताच अफिडच्या शरीरातून
हनीड्यू बाहेर येतो. मुंग्या तो हनीड्यू प्रचंड आवडीने खातात. या प्रक्रियेला मुंग्यांची 'दुग्धशेती' असेही म्हटले जाते.
अफिडच्या व्यतिरिक्त मुंग्या 'खवला कीटकाची' (स्केल कीटक) देखील शेती करतात. हे कीटक सहसा लहान, गोल किंवा ओव्हल आकाराचे असतात. हे झाडाच्या फांद्या किंवा पानांवर घट्ट चिकटून राहतात. झाडाला चिकटून ते झाडाचा रस शोषून घेतात. हा रस वापरून स्केल कीटक गोड द्रव तयार करतात. अफिड असो किंवा स्केल कीटक, मुंग्यांचा हा खटाटोप फक्त हनीड्यू मिळवण्यासाठीच सुरू असतो.
'लीफकटर' मुंग्या (पान कापणाऱ्या मुंग्या) प्रत्यक्षात शेती करतात. जशी माणसे भातशेती करून अन्न पिकवतात एकदम तशी. कामगार मुंग्या झाडांची पाने छोटे छोटे तुकडे करून कापतात व कापलेली पाने भूमिगत घरट्यात घेऊन जातात. घरट्यात गेल्यानंतर पानांचे तुकडे चावून ते मऊ करतात व त्यावर विशेष प्रकारची बुरशी वाढवतात. ही बुरशीच त्यांचे मुख्य अन्न असते. म्हणजे मुंग्या थेट पाने खात नाहीत, त्या बुरशी पिकवून खातात. इतकेच नव्हे तर बुरशीच्या संरक्षणार्थ मुंग्या अँटीबायोटिकसारखे पदार्थही तयार करतात. अशा प्रकारे कीटकच इतर कीटकांची किंवा बुरशीची शेती करतात. मुंग्यांच्या दुग्धशेतीचा हा प्रकार निसर्गातील सहजीवनाचे उत्तम उदाहरण मानले जाते.

स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका इलेक्ट्रिकल आणि
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)