ऋतुचक्र बदल धोक्याची घंटा

ऋतुचक्र हा निसर्गाचा समतोल राखणारा महत्त्वाचा भाग आहे. तो बदलत असल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण करून निसर्गाचा समतोल टिकवणे अत्यंत आवश्यक आहे.

Story: साद निसर्गाची |
28th March, 10:48 pm
ऋतुचक्र बदल धोक्याची घंटा

व​संत ऋतुत कडाडणारी वीज, धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या धारा अन् शरीराला असह्य होणारी उष्णता पाहता प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकरांची "असे हे जगाचे फिरे चक्र बाळा, हिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा" ही निसर्गाच्या ऋतूचक्रावर लिहिलेली कविता कालबाह्य होतेय की काय असा प्रश्न निर्माण होतो. बदलणारे ऋतुचक्र ह्या जगताकरीता किती घातक आहे हे समजण्याएवढा देखील माणूस बुद्धिमान नाही का?

वर्षभरात निसर्गात होणारे ऋतूंचे नियमित बदल म्हणजे ऋतुचक्र. हिंदू संस्कृतीनूसार भारतात मुख्यतः वसंत ऋतू (चैत्र आणि वैशाख), ग्रीष्म ऋतू (ज्येष्ठ आणि आषाढ), वर्षा ऋतू (श्रावण आणि भाद्रपद), शरद ऋतू (अश्विन आणि कार्तिक), हेमंत ऋतू (मार्गशीर्ष आणि पौष) व शिशिर ऋतू (माघ आणि फाल्गुन) असे सहा ऋतू अनुभवायला मिळतात. पूर्वी हे ऋतू ठराविक वेळेत आणि ठराविक स्वरूपात येत असत; परंतु आजकाल ऋतुचक्रात मोठे बदल दिसून येत आहेत. 

साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल, म्हणजे आपण वर्तमानात ज्या काळात आहोत त्या काळात अनुभवायला मिळतो तो ऋतु वसंत. ज्या ऋतूत झाडांना नवीन पालवी फुटते, सुरंगीच्या फुलांचा सुगंध दरवळतो व कोकीळेचा कुहू कूहू ऐकू येतो तो ऋतु म्हणजे वसंत. वसंत हा वर्षातील सर्वात सुंदर आणि आनंददायी ऋतू मानला जातो. पूर्वीच्या काळात वसंत ऋतू आला की निसर्गात एक वेगळीच चेतना निर्माण होत असे. झाडांना नवीन पालवी फुटत असे, फुलांचा सुगंध दरवळत असे आणि वातावरणात गारवा व ताजेपणा जाणवत असे. शेतांमध्ये हिरवीगार पिके डोलत असत आणि पक्ष्यांचे किलबिलाट वातावरण अधिक प्रसन्न बनवत असे. लोकांच्या जीवनातही या ऋतूमुळे उत्साह आणि आनंद निर्माण होत असे. पूर्वीचा वसंत ऋतू संतुलित हवामानामुळे विशेष ठरत असे. ना फार थंडी ना फार उष्णता, असा हा मध्यम आणि सुखद ऋतू होता. वसंत पंचमीसारखे सणही या काळात साजरे केले जात, यासारख्या गोष्टी आता फक्त आजीच्या तोंडून ऐकायला मिळतात. 

आजच्या काळात वसंत ऋतूमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. या बदलामागील सर्वात मोठे कारण म्हणजे मानवनिर्मित पर्यावरणीय बदल. जंगलतोड, वाढते प्रदूषण, औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्यामुळे ऋतूंचा कालावधी, तीव्रता आणि स्वरूप बदलत आहे. उन्हाळा पूर्वीपेक्षा अधिक उष्ण होत आहे. तापमान सतत वाढत असल्यामुळे उष्माघातासारख्या समस्या वाढत आहेत. पावसाळ्यातही अनियमितता दिसते. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. हिवाळा कमी कालावधीचा आणि कमी थंड होत चालला आहे. काही ठिकाणी तर हिवाळ्याची जाणीवही होत नाही. या बदलांचा परिणाम केवळ निसर्गावरच नव्हे तर मानवी जीवनावरही होत आहे. शेतीचे नुकसान, पाण्याची टंचाई, आरोग्याच्या समस्या आणि जैवविविधतेचा ऱ्हास यांसारख्या समस्या वाढत आहेत. अनेक वनस्पती आणि प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 

आजचा वसंत ऋतू पूर्वीसारखा आनंददायी राहिलेला नाही. यामागे मानवी क्रियाकलापांचा मोठा वाटा आहे. बदलणाऱ्या ऋतुचक्रामुळे आपल्याला सावध होण्याची गरज आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. झाडे लावणे, पाणी वाचवणे, प्रदूषण कमी करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणे यासारख्या उपायांनी आपण या समस्येवर काही प्रमाणात मात करू शकतो. शेवटी, ऋतुचक्र हा निसर्गाचा समतोल राखणारा महत्त्वाचा भाग आहे. तो बदलत असल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण करून निसर्गाचा समतोल टिकवणे अत्यंत आवश्यक आहे.


स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका इलेक्ट्रिकल आणि 

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)