रितेशचीच खऱ्या अर्थाने कसोटी

​जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर आता फोंडा मतदारसंंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी त्याचा सरकारवर वा एकंदर राजकारणावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र स्व. रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक यांचे राजकारणातील भवितव्य ठरणार आहे. यामुळे या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार रितेश नाईक यांचीच खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
28th March, 10:58 pm
रितेशचीच खऱ्या अर्थाने कसोटी

​गोव्याचे माजी मुख्यमंत्री व लाडके 'पात्राव' १५ ऑक्टोबर २०२५ रोजी आम्हा सर्वांना सोडून गेले. गेली काही वर्षे त्यांची प्रकृती ठीक नव्हती, तरीही त्यांचे अकस्मात सोडून जाणे हा सर्वांसाठी धक्का होता. बहुजन समाजामध्ये एक वेगळेच स्थान निर्माण करणारे रवी नाईक हे बरीच वर्षे राजकारणात टिकून होते. मगोप, काँग्रेस व भाजप अशा तिन्ही पक्षांतर्फे त्यांनी निवडणुका लढविल्या आणि तिन्ही पक्षांतर्फे ते विजयी झाले. आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार अशी सर्व पदे त्यांनी भूषविली होती. सामान्यांपर्यंत पोहोचणारे व कायम हसतमुख या गुणांमुळे संपूर्ण राज्यात ते लोकप्रिय होते. अशा या पात्रावाचा वारसा पुढे चालविणे त्यांचे सुपुत्र रितेश यांना शक्य होणार का? खरोखरच रवींचे वारस म्हणून फोंड्यातील जनता त्यांना स्वीकारेल का? या प्रश्नाचे उत्तर ४ मे रोजी मिळणार आहे.

​रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या फोंडा मतदारसंघाची जागा भरण्यासाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ही लढत त्रिकोणी होणार असून ती बरीच अटीतटीची होणार आहे. मतदानाला आता अवघेच दिवस उरले असल्याने प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. स्व. रवी नाईक हे लोकप्रिय नेते होते, तरीसुद्धा गत निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी त्यांना कडवा संघर्ष करावा लागला होता. त्यांच्याप्रती असलेली सहानुभूती आणि त्यांची लोकप्रियता त्यांच्या सुपुत्राला विजय मिळवून देईल का? हा एक प्रश्न आहे.

​भाजप व मगोपची मते आणि रवी नाईक यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती या रितेशसाठी जमेच्या बाबी आहेत. काँग्रेस किंवा 'आप'च्या तुलनेत भाजप हा बऱ्याच प्रमाणात शिस्तबद्ध पक्ष आहे. या पक्षाकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. कोणतीही निवडणूक असली तरी भाजपचे कार्यकर्ते व नेते दमदारपणे प्रचार करतात. कोपरा बैठका, जाहीर सभा घेत एक वेगळेच वातावरण निर्माण करतात, यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढते. याचा निश्चितपणे पक्षाला लाभ होतो. भाजपच्या तुलनेत काँग्रेस पक्ष जनसंपर्क वा प्रचारात कमी पडतो. काँग्रेसच्या गट समित्या भाजपच्या गट समित्यांएवढ्या सक्रिय नाहीत. तसेच प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रीय नेतेही प्रचारासाठी गोव्यात येतात; काँग्रेसमध्ये अशी स्थिती नाही. अभावानेच राष्ट्रीय नेते गोव्यात येतात आणि अभावानेच ते जाहीर सभा घेतात. संघटना, कार्यकर्ते व प्रचाराच्या बाबतीत आपल्या देशात भाजपचा हात कोणीही धरू शकत नाही.

​यात पुन्हा पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सर्वत्र संचार सुरू असतो. यावेळी अन्य मतदारसंघांत निवडणूक नसल्याने मुख्यमंत्री फोंडा मतदारसंघात ठाण मांडून असतील. मंत्री, आमदार तसेच इतर मतदारसंघांतील कार्यकर्त्यांची फौजही दिमतीला असेल. यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा रितेश नाईक यांचेच पारडे आजमितीस जड आहे. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. पोटनिवडणुकीत सर्वसाधारण मतदार हा सत्ताधारी पक्षाच्याच उमेदवाराला पसंती देतो. यात पुन्हा स्व. रवी नाईक यांचे कार्य व वारसा पुढे नेण्यासाठी त्यांना मंत्रिपदही मिळणे शक्य आहे. स्व. रवी नाईक यांच्या निधनाने मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली आहे. ही जागा पोटनिवडणुकीनंतर भरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर स्व. रवी नाईक यांची मंत्रिमंडळातील जागा त्यांच्या सुपुत्रालाच मिळण्याची अधिक शक्यता वाटते. यासाठी त्यांना निवडणुकीचा अडसर दूर करावा लागेल. तसे पाहता पोटनिवडणुकीपूर्वीही रितेश नाईक यांना मंत्रिपद देणे भाजपला शक्य होते, तरीही तसे न करता पोटनिवडणुकीपर्यंत ही जागा रिक्तच ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. या निर्णयामागे एक विशिष्ट 

हेतू आहे.

​डॉ. प्रमोद सावंत यांनी १९ मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची सात वर्षे पूर्ण केली आहेत. सलग सात वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविणे ही सहजसाध्य बाब नाही. आणखी वर्षभरानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे पोटनिवडणुकीत विजयी होणारा उमेदवार हा जेमतेम नऊ महिन्यांसाठी आमदार असेल. एवढ्या छोट्या कार्यकाळात तो कोणते प्रकल्प वा कोणती कामे पूर्ण करू शकणार? हा प्रश्न आहेच. भाजपकडे सध्या पूर्ण बहुमत आहे. फोंड्यात भाजप उमेदवाराचा पराभव झाला तरी सरकारच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नाही. काँग्रेसचा विजय झाला तर काँग्रेस आमदारांची संख्या तीनवरून चारवर पोहोचेल. एकंदर राजकीय स्थितीत फार मोठा बदल घडणार नाही. मात्र भाजपचा पराभव झाला तर सरकारसाठी ती नामुष्की ठरेल. भाजपचा विजय झाला तर पक्षापेक्षा रितेश नाईक यांच्या पुढील वाटचालीला बळकटी मिळेल. रवींचा वारसा समर्थपणे चालविण्याची धमक रितेशमध्ये असल्याचे सिद्ध होईल. यासाठी पोटनिवडणूक ही भाजप वा सरकारपेक्षा रितेशसाठीच महत्त्वाची ठरणार आहे.


गणेश जावडेकर  

(लेखक गोवन वार्ताचे 

मुख्य प्रतिनिधी आहेत.)