सर्वे भवन्तु ‘जुगाडाय’ भारतीय तंत्रज्ञानाचा ‘ठोक’तंत्र!

भारतात विज्ञानाचे पुस्तक आणि मॅन्युअलचे नियम लागू होत नाहीत, इथे फक्त अनुभवाचे जुगाड चालतात. इथल्या प्रत्येक घरात, प्रत्येक उपकरणात आणि प्रत्येक मनात एकच मंत्र जपला जातो, 'सर्वे भवन्तु जुगाडाय'.

Story: मिश्किली |
28th March, 10:50 pm
सर्वे भवन्तु ‘जुगाडाय’ भारतीय तंत्रज्ञानाचा ‘ठोक’तंत्र!

भा​रतीय माणूस इतका 'जुगाडू' प्राणी आहे की विदेशी वैज्ञानिक सुद्धा सिद्ध करू शकणार नाहीत. जगात कोणतीही वस्तू विकत घेतली की त्यासोबत एक 'युजर मॅन्युअल' येते. पण भारतीय घरांमध्ये या पुस्तिकेची जागा कचऱ्याच्या डब्यात किंवा रद्दीत असते. कारण आमच्याकडे प्रत्येक वस्तूसाठी घरातील कर्त्या व्यक्तीचे एक स्वतंत्र, अलिखित आणि स्व-निर्मित संविधान असते. एखादी वस्तू कशी वापरावी, तिने नखरे केल्यावर तिला कुठे आणि किती जोरात प्रसाद द्यावा, याचे नियम जगातील कोणत्याही इंजिनीअरला ठाऊक नसतील, पण ते भारतीय वापरकर्त्याला माहित असतात.

आपल्या जीवनाचा श्वास बनलेले अनुलोम-विलोम म्हणजेच मोबाईल आणि लॅपटॉपलाच बघा. आयटी कंपन्या कितीही 'फास्ट प्रोसेसर' आणि 'रॅम'चे दावे करोत, पण आपला मोबाईल आणि लॅपटॉप हे मालकाच्या मर्जीनुसारच चालतात. कदाचित कंपनीच्या मॅन्युअलमध्ये कुठेही लिहिलेले नसेल की, “मोबाईल किंवा लॅपटॉप हँग झाला तर रिस्टार्ट करा.” अपडेट करा लिहिलेले असेल. कुठलीही न चालणारी वस्तू परत व्यवस्थित रूळावर आणण्याची भारतीय पद्धत म्हणजे रिस्टार्ट करणे! हे ज्ञान अनेकदा डोकं आपटून मिळतं, मॅन्युअलमधून नाही व हे त्याच लोकांना माहित असतं. प्रत्येकाच्या मोबाईलचे नखरे त्याच्या मालकालाच माहित असतात. काही लोकांचे मोबाईल इतके 'नखरेल' असतात की, गॅलरी उघडण्यापूर्वी त्यांना एकदा 'क्लिन मास्टर'चे दर्शन घडवावे लागते. एखाद्या विशिष्ट अॅपवर दोनदा क्लिक केले तरच ते उघडणार, एकदा बॅक बटन टच केल्याने मागे जात नाही, दोन वेळा क्लिक करावे लागते. हे अॅप बंद करूनच दुसरं सुरू होते. कॅमेराच्या बाबतीत तर विचारूच नका! मोबाईल कोणत्या विशिष्ट कोनात धरल्यावर पोटाचा घेर कमी आणि चेहऱ्याचा नूर जास्त दिसतो, हे केवळ त्या मालकाच्या जुगाड मॅन्युअलमध्ये असते. लॅपटॉपचे तर वेगळेच प्राणायाम असते. तो सुरू केल्यावर किमान दहा मिनिटे त्याला ध्यानाला बसू द्यावे लागते. जर तुम्ही चुकून तो सुरू झाल्यावर लवकरच माऊस हलवला, तर तो असा हँग होतो की टास्क मॅनेजर सुद्धा ‘नॉट रिस्पॉन्डिंग’च्या व्हँटिलेटर स्थितीत जातो. मग त्याला प्रेमाने कुरवाळून किंवा रागाने बटन दाबून पुनर्जन्म (रिस्टार्ट) द्यावा लागतो.

वाहनांच्या बाबतीत तर आपली प्रगती थक्क करणारी आहे. जुन्या स्कूटर म्हणजे जणू काही 'रुसलेली सासू'च! ती सरळ उभी राहून कधीच सुरू व्हायची नाही. जोपर्यंत तिला एका बाजूला ४५ अंशाच्या कोनात झुकवून 'घी सीधी उँगली से न निकले तो...' वाला मंत्र वापरला जात नाही, तोपर्यंत ती एकदाही श्वास घेणार नाही. आजच्या 'स्मार्ट' गाड्यांमध्येही आपण तोच वारसा जपला आहे. एखाद्या गाडीचा दरवाजा इतक्या जोरात आदळावा लागतो तरच तो नीट लागतो. काही गाड्यांच्या क्लच आणि गिअरचे नाते कसे आहे ते समजायला वेळ लागतो, ते त्या मालकालाच माहित असते. क्लच किती इंच सोडला की गाडी पुढे सरकेल, हे शोधण्यासाठी अचानक दुसरी गाडी हातात घेतलेल्या ड्रायव्हरला थोडा वेळ नीट समजावं लागतं, नाहीतर क्लच-गियरचा ब्रेक-अप झालाच समजा! त्याला आर.टी.ओ. ऑफिसर पेक्षा त्या गाडीच्या स्वभावाचा अभ्यास जास्त करावा लागतो. पणजी-मिरामार रस्त्यावर तर एक खूप जुनी ऑटोमॅटीक बस आहे, मी तिचा 2018 मध्ये व्हिडियो पोस्ट केला होता. ती सर्व जुगाडांचा कळस आहे, जिथे ड्रायव्हर क्लच न दाबता गिअर बदलतो.

घरातील दारांचे आणि कड्या-कुलपांचे तर वेगळेच पुराण आहे. काही दारे लावायची एक म्युझिकल पद्धत असते. आधी दार थोडे वर उचलून धरा, मग डावीकडे ओढा आणि शेवटी हळूच खांद्याचा धक्का द्या, मगच ते विशिष्ट आवाज करून बंद होते. पाहुणे आले की ते बिचारे सुसंस्कृतपणे दार लावायचा प्रयत्न करतात, पण अयशस्वी होतात. मग घरातील लहान मुलगा सुद्धा आश्चर्यरित्या दार लावून पाहुण्यांना थक्क करतो.

एकदा मी एका दुकानात गेलो, तिथे कपाटाचे हँडलच नव्हते. दुकानदार मोठ्या अभिमानाने म्हणाला, "हे आमचं 'गांवठी लॉक' आहे!" त्याने खालचा एक गंजलेला खिळा काढला आणि कपाट उघडले. हे पाहून वाटले की, जगातील मोठे हॅकरही या ऑफलाईन सिक्युरिटी सिस्टीम पुढे नतमस्तक होतील. चिऱ्यांच्या भिंतीच्या मधल्या जागेत लोखंडी दाराऐवजी मारूती ८०० गाडीचे दार लावणे हे भारतीयांनीच तर शोधले!

विद्युत उपकरणांच्या बाबतीत तर आपण भारतरत्न मिळवण्यालायक जुगाड करतो. प्रत्येक घरात एक तरी असं लडखडणारं सॉकेट असतंच, जिथे प्लग घातला की तो ढिला पडतो. मग तिथे कागदाची घडी, आगपेटीची काडी किंवा टूथपीक लावून तो फिट केला जातो. हे कनेक्शन म्हणजे नाजूक नातं असतं; म्हणजे कुणी जोरात श्वास घेतला व वायर हलली तरी ते उपकरण किंवा चार्जर बंद पडू शकतो. सार्वजनिक ठिकाणी अशा सॉकेटचा तुम्ही अनुभव घेतलेलाच असणार. मिक्सर चालू झाला नाही तर त्यावर एक मुक्का घातल्याशिवाय तो गरगरत नाही. जुने टीव्ही मार खाल्ल्याशिवाय नीट चालत नाहीत. सर्वात जास्त जर आपण आज पर्यंत कोणाचे शोषण केलेले आहे तर ते टीव्ही रिमोटचे. कंपनीनेही विचार केला नसेल की सुरुवातीचे ३ महिने रिमोट सेलवर चालणार आणि शेवटचे २ महिने तो आमच्या ‘थापां’वर.

पंख्याचे नखरे तर वेगळेच. गोव्यातील एका सरकारी इमारतीत बटणाखाली लिहिलं आहे - "किरकिर फॅन!" तो न वाचता चालू केला की मग संगीताची मैफलच सुरू होते. रेग्युलेटर '२' वर असेल तर पंखा इतका हळू फिरतो की आपल्याला स्वतःला वारा घालावा लागतो आणि '५' वर केला की वाटते पंखा उडून शेजारच्या गल्लीत जाईल! अशा वेळी भारतीय माणूस हवामान नियंत्रित करण्यासाठी अजब युक्ती शोधतो— अंगावर चादर घ्यायची आणि एक पाय बाहेर काढायचा! हे 'एक पाय बाहेर' ठेवण्याचं शास्त्र जगातील कोणत्याही डॉक्टर किंवा हवामान तज्ज्ञाला अजून समजलेलं नाही.

नळाच्या बाबतीत तर 'वॉशर' नावाचा पदार्थ आपल्याकडे केवळ शोभेसाठी असतो. नळ बंद करण्यासाठी तो ठराविक कोनातच पिळावा लागतो. जास्त आवळला तर तो पुन्हा चालू होतो. सार्वजनिक नळाखाली जो नवीनच जातो तो संपूर्ण स्नान केल्याशिवाय बाहेर येत नाही. दुसरे म्हणजे कुठला नॉब फिरवल्यावर शॉवर चालू होणार की नळ हेच समजे पर्यंत आपण स्नान घेतलेले असते. फ्रीजचं दार हळूहळू बंद करून आतली लाईट नेमकी कधी विझते, हे बघण्यात आमचे अर्धे बालपण गेले आहे, मग बटन मिळाल्यावर आम्ही आधीच दाबायचो. सर्व काही बदलले पण फ्रीजचा बटन, नेलकटर व स्टॅपलर यांचे डिझाईन तसेच आहेत. काही महाभाग तर 'गुड नाईट' लिक्विडचा शेवटचा थेंब वाचवण्यासाठी मशीनच उलटी लावतात!

किचनमध्ये कोणत्या सुरीने काय कापायचे आणि कात्रीच्या नेमक्या कोणत्या 'विशिष्ट' भागात धार आहे, हे त्या घरच्या गृहिणीलाच ठाऊक असते. नवीन माणसाने ती सुरी घेतली तर साधे कागद सुद्धा कापत नाही. हे सर्व पाहून असे वाटते की, आपण वस्तूंना आपल्या सोयीनुसार वळवले नाही, तर वस्तूंनी आपल्याला त्यांच्या नखऱ्यांनुसार वागायला शिकवले आहे. एका बसमध्ये घंटीचा बटन नाही. दोन उघड्या तारा एकमेकांना भिडवून 'सर्किट' पूर्ण करणारा हा कंडक्टर थॉमस एडीसनचा सुद्धा आत्मा तडपवणारा आहे. तो हा नियम नवीन येणाऱ्या एकदिवसीय कंडक्टरला मोठ्या अभिमानाने शिकवत असे.

भारतात विज्ञानाचे पुस्तक आणि मॅन्युअलचे नियम लागू होत नाहीत, इथे फक्त अनुभवाचे जुगाड चालतात. इथल्या प्रत्येक घरात, प्रत्येक उपकरणात आणि प्रत्येक मनात एकच मंत्र जपला जातो, 'सर्वे भवन्तु जुगाडाय'. कारण शेवटी यंत्र कितीही स्मार्ट असलं, तरी त्याला आपल्या तालावर कसं नाचवायचं, याचं गुपित फक्त आपल्याकडेच असतं!


आदित्य सिनाय भांगी, पणजी