गोव्यात अनेक बँकांच्या शाखा आहेत, परंतु बँकिंग क्षेत्रातील गोमंतकीयांचे प्रमाण आजही कमी दिसते. सरकारी नोकरीच्या मर्यादित संधींवर अवलंबून न राहता, गोमंतकीय तरुणांनी या स्पर्धा परीक्षांकडे वळणे गरजेचे आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँकिंग क्षेत्रात आज करिअरच्या अफाट संधी उपलब्ध आहेत. भारतात शेकडो बँका कार्यरत आहेत, जिथे दरवर्षी हजारो कर्मचारी निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन, तरुण रक्ताची निवड केली जाते. पूर्वी बँकांमधील भरती प्रक्रिया विखुरलेली होती, परंतु जागतिकीकरण आणि औद्योगिकीकरणानंतर यात मोठी सुधारणा झाली आहे. आज 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन' (IBPS) सारख्या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने ही निवड केली जाते.
बँकिंग परीक्षांची पार्श्वभूमी
भारतात सध्या ११ सार्वजनिक क्षेत्रातील (Public Sector) बँका आहेत, ज्यांच्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CWE) घेतली जाते. यामध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि युको बँक यांचा समावेश होतो. या बँकांमध्ये लिपिक (Clerk), प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि विशेषज्ञ अधिकारी (SO) अशा विविध पदांसाठी भरती केली जाते.
परीक्षेचे टप्पे
बँकिंग परीक्षा मुख्यतः दोन स्तरांवर विभागलेली असते: पूर्व परीक्षा (Prelims) आणि मुख्य परीक्षा (Mains).
१. पूर्व परीक्षा (Preliminary Exam):
ही परीक्षा केवळ पात्रतेसाठी असते. यात १०० प्रश्न विचारले जातात, ज्यासाठी १ तासाचा वेळ असतो.
इंग्रजी भाषा: ३० प्रश्न (३० गुण)
अंकगणित (Numerical Ability): ३५ प्रश्न (३५ गुण)
तर्कक्षमता (Reasoning Ability): ३५ प्रश्न (३५ गुण) या परीक्षेत ठराविक 'कट-ऑफ' पार करणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात.
२. मुख्य परीक्षा (Main Exam):
मुख्य परीक्षेचे स्वरूप अधिक सविस्तर असते. यात साधारणपणे १५५ ते १९० प्रश्न असतात आणि २०० गुणांची परीक्षा असते. यासाठी सुमारे २ ते ३ तासांचा वेळ दिला जातो. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांसोबतच काही पदांसाठी 'डिस्क्रिप्टिव्ह' (लेखन) चाचणीही घेतली जाते, ज्यात पत्रलेखन आणि निबंधाचा समावेश असतो.
विषय आणि अभ्यासक्रम
बँकिंग परीक्षेचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि तार्किक क्षमतेची चाचणी घेणारा असतो:
अंकगणित (Quantitative Aptitude): यात सरलीकरण (Simplification), सरासरी, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, काळ-काम-वेग, अंतर, मेन्सुरेशन, संख्या मालिका आणि डेटा इंटरप्रिटेशन (DI) यांसारख्या विषयांवर भर दिला जातो.
तर्कक्षमता (Reasoning): यात नातेसंबंध, दिशा ज्ञान, बैठकीची व्यवस्था (Sitting Arrangement), कोडिंग-डिकोडिंग, पझल्स आणि सिलॉगिझम यांसारख्या आव्हानात्मक घटकांचा समावेश असतो.
इंग्रजी: व्याकरण, वाचन आकलन (Reading Comprehension), एरर डिटेक्शन आणि शब्दसंग्रह यावर प्रश्न विचारले जातात.
सामान्य ज्ञान (General/Financial Awareness): यात चालू घडामोडी, बँकिंग क्षेत्रातील घडामोडी आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित माहिती विचारली जाते.
यशस्वी होण्यासाठी मंत्र
बँकिंग परीक्षेत 'निगेटिव्ह मार्किंग' (ऋण गुणदान) असते, त्यामुळे अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे. केवळ प्रश्न सोडवून चालत नाही, तर ते वेळेत सोडवणे हे मोठे आव्हान असते. यासाठी नियमित सराव, योग्य कोचिंग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. शॉर्टकट ट्रिक्स आणि वेळेचे नियोजन या परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली आहे.
गोमंतकीयांसाठी संधी
गोव्यात अनेक बँकांच्या शाखा आहेत, परंतु बँकिंग क्षेत्रातील गोमंतकीयांचे प्रमाण आजही कमी दिसते. सरकारी नोकरीच्या मर्यादित संधींवर
अवलंबून न राहता, गोमंतकीय तरुणांनी या स्पर्धा परीक्षांकडे
वळणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारी परीक्षा आणि बँकिंग परीक्षांचा अभ्यासक्रम ८०% सारखाच असतो. त्यामुळे थोडे अधिक कष्ट घेतल्यास एक सुरक्षित आणि सन्मानजनक करिअर घडवणे सहज शक्य आहे.

- अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)