आदिम तत्त्वाला मानवी भावभावनांचा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा तलम पोत आहे. नकळतपणे घडलेल्या चुकीचे परिमार्जन करताना एकमेकींच्या वियोगाची वेदनाही तेवढीच तीव्र होत जाते, म्हणूनच ही भेट मौल्यवान ठरते.

सात बहिणी आणि त्यांचा भाऊ खेतोबा अशी आठ भावंडे घाटातून प्रवास करीत येत होती. ती ऐरावतावर बसून प्रवास करीत होती. ऐरावताची बरीच दमछाक झाली होती. प्रवास करीत करीत ती डिचोलीतील श्री शांतादुर्गेच्या छत्रछायेत पोहोचली. त्यांनी देवीकडे विसाव्यासाठी जागा मागितली. देवीने त्यांना वंड्यार येथील तिच्या अखत्यारीत येणारी जागा दिली. सर्वांच्या पोटाला भूक लागली होती. मयेची केळबाय या भावंडात सर्वात मोठी बहीण. केळबाय व लईराईने भाऊ खेतोबाला गावात जाऊन विस्तव घेऊन येण्याची आज्ञा केली. थकलेल्या ऐरावताने वंड्यार जागेत शेवटचा श्वास घेतला. त्याची स्मृती जतन करणारे स्मारक आजही श्रद्धेचे प्रतीक बनून येणाऱ्या-जाणाऱ्या पांथस्थाला आश्वस्त करते.
खेतोबा विस्तव आणण्यासाठी जेव्हा गावात जाण्यासाठी निघाला, तेव्हा वाटेत त्याला काही मुले विटीदांडू खेळताना दिसली. तो खेळ बघताना खेतोबा देहभान विसरला. विस्तव आपल्या बहिणीकडे नेऊन द्यायचा आहे, हेही त्याच्या लक्षात राहिले नाही. इकडे वंड्यारला सर्व बहिणी भावाची वाट पाहून चिंतेत पडल्या. सर्वात धाकटा भाऊ, शिवाय अनोळखी प्रदेश; काय झाले असेल त्याचे वाटेत? मोठ्या बहिणीने लईराईला आज्ञा केली – गावात जाऊन भावाला शोधून आणण्याची!
लईराई जेव्हा गावात पोहोचली, तेव्हा तिने पाहिले की गावातील मुलांचा खेळ बघण्यात भावाने वेळ खर्ची घातला आहे. आधीच प्रवासाचा क्षीण होता, त्यात कडाडून भूक लागलेली. विस्तव घेऊन भाऊ वेळेत पोहोचला असता, तर चार घास शिजवून पोटात घातले असते; परंतु इथे तर तिला दुसरेच दृश्य दिसले. सांगितलेले काम न करता भाऊ खेळ बघण्यात रममाण झालेला पाहून तिला त्या क्षणी त्याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात तिने त्याच्या कमरेत जोराची लाथ घातली. अनपेक्षितपणे झालेल्या प्रसंगाने खेतोबा कोसळला... तो कमरेतून वाकला... तो कायमचाच! आजही त्याची ही अशी कमरेत वाकलेली पाषाणी मूर्ती आपल्याला मंदिरात पाहता येते.
इकडे आपल्या दोन्ही भावंडांची वाट पाहणाऱ्या बहिणींच्या काळजीत अधिकच भर पडली. त्यांना जेव्हा घडलेला प्रकार कळला, तेव्हा मात्र भावाच्या या अशा दशेला लईराईला दोषी ठरवून केळबायने संकल्प केला की, प्रत्येक वर्षी डोक्यावर अग्नी ठेवून सातशे धोंडांना सोबतीला घेऊन जत्रा भरवणार... तीच ही मयेची 'माल्याची जत्रा'! ही कथा परंपरेने चालत आलेली आहे. आजही लोकांच्या हृदयात तिने कायमचे स्थान पटकावले आहे. नकळतपणे भावावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्याचा हा प्रयत्न असून, त्यातून बहिणींचे भावावर असलेले प्रेमच
दिसून येते.
मुळगावची ग्रामदेवी ही सुद्धा त्यांचीच बहीण. तिची पेठेची जत्रा संपन्न झाली की, आपल्या भावंडाच्या भेटीसाठी माल्याच्या जत्रेत सहभागी होण्यासाठी म्हातारघाटीतून ती मयेच्या प्रवासात निघते. तिला भेटण्यासाठी मयेच्या केळबायची पेठ येते. वाटेत चव्हाट्यावरील चौथऱ्यावर पारंपरिक नैसर्गिक सहवासात ती विसावते. बहिणी-बहिणींच्या दोन पेठा (पेट्या) एका रात्रीसाठी एकत्रित विसावतात. ब्रह्मशक्ती, विष्णूशक्ती आणि शिवशक्तीचा हा समन्वय 'याची देही याची डोळा' पाहता येतो. बहिणींच्या विसाव्याची ही जागा मये चव्हाट्यावर आहे; जिथे एका बाजूला पानापानातून बहरून आलाय तो घोटिंग! छत्रछाया धरली आहे बकुळ फुलांच्या झाडाने. नैसर्गिक सुगंधाने भरलेल्या आणि भारलेल्या वातावरणातील भगिनींचे मिलन हा आध्यात्मिक, कौटुंबिक जिव्हाळ्याचा क्षण असतो. त्याचा प्रत्यक्षातील अनुभव ही एक आगळीवेगळी अनुभूती आहे.
भेटाभेट झाल्यावर माल्याची जत्रा संपन्न होते. 'माले' म्हणजे भले मोठे मातीचे दिवज, ज्यावर शेकडो पणत्या तेवत असतात. अशा पणत्यांनी प्रज्वलित झालेल्या दिवजाला डोक्यावर घेऊन भक्त नृत्य करतात. किती वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजच्या विज्ञान युगातही तेवढ्याच श्रद्धेने आणि आत्मीयतेने लोकमानसाने जतन करून ठेवलेली आहे. आपण मात्र अहंकार आणि वृथा अभिमानाची झुल पांघरून देवतत्वाच्या मुळावरच घाव घालत आहोत. आदिम तत्त्वाला मानवी भावभावनांचा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा तलम पोत आहे. नकळतपणे घडलेल्या चुकीचे परिमार्जन करताना एकमेकींच्या वियोगाची वेदनाही तेवढीच तीव्र होत जाते, म्हणूनच ही भेट मौल्यवान ठरते. अबोलीच्या फुलांनी सजवून, नाचत-वाजत-गाजत मुळगावच्या ग्रामदेवीची मुखवट्यांनी भरलेली पेठ भक्तगणांसहित पारंपरिक आडवाटेने अनवाणी पायांनी प्रवास करते; तर दुसरीकडे मयेची केळबाय तितक्याच उत्कट आर्ततेने बहिणीची भेट घेण्यासाठी तत्पर होते...!

पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)