डिक्लेरेशन करून घेणं कधीही शक्य होतं, पण त्यानंतर लग्नानंतरचं एक नाव असं मिळून तीन-तीन नावांच्या जंजाळात ती आयुष्यभरासाठी अडकली असती आणि म्हणूनच तिने ठाम निर्धार केला; लग्न करेन तर 'सिंगबाळ'शीच…

अहो, काय म्हणायचं या पोरीला..! आडनावावर अडून बसलीये. गोरा-काळा, पैसेवाला-नोकरीवाला, शहरवाला, गुण-शिक्षण यातलं काहीच न मागता नुसत्या आडनावावर भिस्त ठेवलीये कार्टीनं. काय एवढं सोनं लागलंय त्या 'सिंगबाळ' आडनावाला...!" शैलेशराव वैतागले होते आपल्या लेकीच्या अजब मागणीवर. सुरुवातीला त्यांनी आणि इतरांनी थट्टेवारीच घेतला होता हा विषय, पण स्थळं बघायला लागल्यावर मात्र 'सिंगबाळ' नाही तर लग्न करणार नाही यावर शुभदा अधिकाधिक ठाम होऊ लागली, तेव्हा मात्र शैलेशराव मेटाकुटीला आले. गोव्यासारख्या ठिकाणी हे कठीण नव्हतं, पण बाकीचंही जुळून यायला नको का?
शुभदा त्यांची एकुलती एक सुकन्या होती, त्यामुळे त्यांना सदानकदा तिच्या सुखाचा ध्यास. त्यांनी कष्टाने आपला व्यवसाय उभा केला होता. बंगला बांधला होता; त्यांची स्वतःच्या मालकीची जमीन होती. लहानपणापासून त्यांनी तिचे सगळे लाड पुरवले होते, छान संस्कार तिच्या अंगी बाणवले होते. ती मुळात समजूतदार निपजली होती, पण एखादी गोष्ट जर तिच्या मनात आली, तर ती पूर्ण केल्याशिवाय शुभदा स्वस्थ बसत नसे. याचा प्रत्यय शैलेशरावांना अनेकदा आला होता. तिचा हा हटवादीपणा आतापर्यंत चांगल्या गोष्टींसाठी होता, त्यामुळे शैलेशरावांना तिचे कौतुकच होते.
ते आल्या-गेल्यापाशी तिच्याविषयी बोलताना, "जिद्दी आहे लेक आमची; लाथ मारेल तिथे पाणी काढेल असा स्वभाव आहे तिचा..." असे उद्गार काढीत. पण आता हेच त्यांच्या अंगलट येण्याच्या मार्गावर होतं. पुढे-मागे तीच त्यांच्या संपत्तीची मालकीण होणार होती, म्हणून तिला शोभेल अशा सुस्वरूप, शिकलेल्या आणि गुणसंपन्न अनुरूप वराच्या शोधात ते होते. त्यांचं वयही सत्तरीकडे झुकत होतं, त्यामुळे ती जवळपास असावी या विचारानं ते जवळची स्थळं बघत होते, पण शुभदा मात्र सरसकट सर्वांवर फुल्ली मारत होती.
तिचा हा आडनावाचा ध्यास आजकालचा नव्हताच मुळी... लहान असताना अनेकदा रात्रीच्या वेळी तिची आजी तिला झोपवताना आपल्या गतकाळातल्या गोष्टी सांगायची. त्यात अनेकदा ते मूळचे 'सिंगबाळ' असल्याचा संदर्भ तिच्या बोलण्यात येई; त्यांनी गाजवलेल्या शौर्यगाथा ती रंगवून सांगे. याचमुळे की काय 'सिंगबाळ' आडनावाचं महात्म्य तिच्या बालमनावर बिंबत गेलं. इतकं की जिथे संधी मिळेल तिथे तिने स्वतःला 'सिंगबाळ' जाहीर केलं होतं. ती शाळा, कॉलेजमध्ये असेपर्यंत त्याचा फारसा परिणाम कशावर झाला नाही, कारण तिथलं सगळं रीतसर असल्याने नेहमी तिचं अधिकृत नाव लागत असे आणि नाही म्हटलं तरी त्यावरून ती खट्टू होई.
शुभदाला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. सुंदर, सहज वळण होतं तिच्या हाताला. लहानपणापासून तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसं जिंकली होती. त्यातल्या शाळा-कॉलेजातर्फे असणाऱ्या स्पर्धांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांवर तिचं अधिकृत नाव असे, पण अनेक अनौपचारिक स्पर्धांमध्ये ती बिंधास्त 'सिंगबाळ' आडनाव लावून मोकळी होई. सोशल प्लॅटफॉर्म्सवरही ती 'सिंगबाळ' याच नावाने प्रसिद्ध होती आणि नाही म्हटलं तरी तिच्याशी जोडले गेलेले अनोळखी लोक तिला 'सिंगबाळ' नावानेच ओळखत होते. एक दिवस सहज बसलेली असताना तिच्या मैत्रिणीने तिला एक पीडीएफ पाठवलं.
ती राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कारांसाठी नावनोंदणीची माहिती होती. त्यात 'राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट युवा चित्रकार पुरस्कार' नावाने एक विभाग होता. शुभदा हरखून गेली; तिने पटापट सगळी माहिती वाचून काढली. त्यात वयाच्या अटीसोबतच चित्रकाराचं काम अलीकडच्या तीन वर्षांतील भरीव कामगिरी असली पाहिजे अशीही अट होती. तिने त्या तीन वर्षांत भरपूर काम केलं होतं, पण बहुतांश काम हे 'सिंगबाळ' याच नावाने केलेलं होतं; अधिकृत नावाचा तिथे क्वचित प्रसंगी उल्लेख होता. सुरुवातीला तिच्या ते लक्षात आलं नाही, पण जेव्हा ती नावनोंदणीसाठी आपली कागदपत्रं सादर करण्यासाठी गेली, तेव्हा तिथल्या मॅडमनी तिला रोखलं. त्या म्हणाल्या, "बाळ, तुझी सगळी सरकारमान्य कागदपत्रं एका नावाने आहेत आणि तुला स्पर्धेत मिळालेली प्रमाणपत्रे मात्र वेगळ्याच नावाने आहेत, हे आम्ही अप्रूव्ह करू शकत नाही."
"तुझ्या प्रमाणपत्रावर जे नाव आहे, ती तूच आहेस हे सिद्ध करणारं एखादं सरकारमान्य कागद तुझ्याकडे असलं तर आण, म्हणजे पुढचा विचार करू शकतो. तसा तो तुझ्याकडे नसेल आणि पुढे-मागे कोणी या नावाने पुढे आलं तर तुझं सगळं काम त्या व्यक्तीच्या नावे होईल. नपेक्षा तुला या नावाचं डिक्लेरेशन करून घ्यावं लागेल; पण मला तरी असं वाटतं की ही सगळी गुंतागुंत करण्यापेक्षा तू तुझ्या अधिकृत नावाने नवीन सुरुवात करावीस आणि हा पुरस्कार तर काय, पुढच्या वर्षी पण तू घेऊ शकतेस." त्या म्हणाल्या. हे सगळं ऐकून शुभदाला धक्काच बसला, पण त्यातही तिला त्यांच्या शेवटच्या ओळीचा प्रचंड राग आला.
ती तशीच घरी परतली आणि त्या दिवसापासून सतत तिच्या डोक्यात तो विचार घोळत होता. काय करावं न सुचून तिने सगळं काम स्थगित केलं. डिक्लेरेशन करून घेणं कधीही शक्य होतं, पण त्यानंतर लग्नानंतरचं एक नाव असं मिळून तीन-तीन नावांच्या जंजाळात ती आयुष्यभरासाठी अडकली असती आणि म्हणूनच तिने ठाम निर्धार केला; लग्न करेन तर 'सिंगबाळ'शीच... मध्यंतरी एक-दोन वर्षं सरली, ती लग्नाच्या वयाची झाली आणि शैलेशरावांनी वर-संशोधन मोहीम हाती घेतली. पण ती वारंवार त्यांना या अटीची आठवण करून देई. "पप्पा, हे नाव आपला वारसा आहे आणि मला ते पुढे चालवायचंय.." म्हणत ती त्यांना दटावे.
शैलेशरावांनी अनेकांना तिला समजावण्याविषयी गळ घातली, पण प्रत्येकाला तिचं ठणकावून सांगणं असे, "या नावाने मला ओळख मिळवून दिली, ती पुसणं मला शक्य नाही." यावर कोण आणि काय बोलणार? शेवटी यातच बराच कालावधी लोटला आणि शेवटी शुभदाच्या प्रतीक्षेला फळ मिळालं अन् तिला हवा असलेला नि शैलेशरावांच्या मनासारखा 'सिंगबाळ' तिच्याशी विवाहाला सज्ज झाला. यावेळीही शैलेशरावांच्या लेकीने आपल्या मनात आलेली गोष्ट पूर्णत्वास नेली होती आणि मानाने 'सौ. सिंगबाळ' म्हणून अधिकृतपणे मिरवणार होती आयुष्यभर..!

अनु देसाई