५ रुपयांवरून लाकूड २० रु. प्रतिकिलो : इलेक्ट्रिक चुलींची मागणीही वाढली

पणजी : राज्यात गॅस सिलिंडर पुरवठ्यात होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असून, अनेकांनी पर्याय म्हणून पारंपरिक चुलींचा वापर सुरू केला आहे. यामुळे लाकडाच्या दरात तब्बल चौपटीने वाढ झाली आहे. तसेच इलेक्ट्रिक चुलींची मागणीही लक्षणीय वाढली आहे.
घरगुती गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर पूर्वी १५ दिवसांत मिळणारा पुरवठा आता २५ दिवसांपर्यंत लांबत आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये गॅस संपल्यानंतर नवीन सिलिंडर मिळेपर्यंत नागरिकांना इंडक्शन किंवा चुलींचा आधार घ्यावा लागत आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाईही मोठ्या प्रमाणात जाणवत असून, विशेषतः किनारपट्टी भागातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. उपलब्ध कोट्याच्या केवळ २० टक्के सिलिंडर मिळत असल्याने उर्वरित गरज भागवण्यासाठी व्यावसायिकांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी, अनेकांनी पर्यायी चुलींचा वापर सुरू केला आहे.
चुलींसाठी लागणाऱ्या लाकडाच्या मागणीत वाढ झाल्याने त्याचे दरही वाढले आहेत. पूर्वी ५ रुपये प्रति किलो दराने मिळणारे लाकूड आता २० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. भंगारातून मिळणाऱ्या लाकडाच्या तुकड्यांनाही आता मोठी मागणी निर्माण झाली आहे.
गॅस पुरवठा लवकरच सुरळीत होणार
नागरी पुरवठा विभागाने गॅस टंचाईबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, पुरवठा सुरळीत असून अचानक वाढलेल्या बुकिंगमुळे तात्पुरती अडचण निर्माण झाली आहे. प्रत्येक एजन्सीकडे दररोज ३०० ते ६०० सिलिंडर पुरवण्याची क्षमता असली, तरी मागणी वाढून दररोज सुमारे ४ हजार सिलिंडरपर्यंत पोहोचली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त सिलिंडरचा पुरवठा सुरू करण्यात आला असून, दोन दिवसांत परिस्थिती सुधारेल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
काय आहे इलेक्ट्रिक चुल?
लाकडाची इलेक्ट्रिक चूल (ज्याला अनेकदा इलेक्ट्रिक ब्लोअर चूल किंवा धूरमुक्त चूल असेही म्हणतात) हे पारंपारिक लाकडाच्या चुलीचे एक आधुनिक आणि सुधारित रूप आहे. ग्रामीण भागात किंवा जिथे अजूनही सरपण वापरले जाते, तिथे इंधनाची बचत करण्यासाठी आणि धूर कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते.
या चुलीचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
१. रचना कशी असते?
ही चूल लोखंडी किंवा स्टीलच्या पत्र्यापासून बनवलेली असते.
याच्या खालच्या बाजूला एक छोटा इलेक्ट्रिक फॅन (ब्लोअर) बसवलेला असतो.
हा फॅन चालवण्यासाठी बॅटरी किंवा थेट वीज (अॅडॉप्टरद्वारे) वापरली जाते.
२. हे कार्य कसे करते?
जेव्हा तुम्ही चुलीत लाकूड पेटवता, तेव्हा तो छोटा पंखा बाहेरून वेगाने हवा (ऑक्सिजन) चुलीच्या आत ढकलतो.
विज्ञानाच्या नियमानुसार, आगीला जितका जास्त ऑक्सिजन मिळतो, तितकी ती प्रखर पेटते.
यामुळे लाकूड पूर्णपणे जळते आणि धूर अत्यंत कमी किंवा नगण्य निघतो.
३. मुख्य फायदे:
इंधनाची बचत: साध्या चुलीच्या तुलनेत यात खूप कमी लाकूड लागते. अगदी छोट्या काड्यांवरही मोठे स्वयंपाक होऊ शकतात.
धूरमुक्त स्वयंपाक: लाकूड पूर्ण जळाल्यामुळे धूर होत नाही, ज्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही आणि किचन काळे पडत नाही.
वेगवान स्वयंपाक: हवेच्या प्रवाहामुळे जाळ मोठा लागतो, परिणामी जेवण गॅससारख्या वेगाने शिजते.
स्वस्त पर्याय: गॅसच्या वाढत्या किमती पाहता, शेतात किंवा बागेत पडलेले लाकूड वापरून फुकटात स्वयंपाक करता येतो.