कुडचडे अत्याचार प्रकरण : मैत्रीच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार; एका महिलेने दाखल केली तक्रार

मोबाईलमधील डिलिट केलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत; संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
कुडचडे अत्याचार प्रकरण : मैत्रीच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार; एका महिलेने दाखल केली तक्रार

पणजी: कुडचडे येथील खळबळजनक लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली असून, संशयित सोहम नाईक याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणात आता एका पीडित महिलेने नव्याने तक्रार दाखल केली असून, सोमवारी या संदर्भात रीतसर पाचवा गुन्हा नोंदवला जाणार आहे. यापूर्वीच सोहमविरोधात चार गंभीर गुन्हे दाखल झाले असून, तपासाची व्याप्ती वाढल्याने हे प्रकरण आता गुन्हा शाखेकडे (क्राईम ब्रँच) वर्ग करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा उलगडा २२ मार्च रोजी झाला होता, यानंतर कुडचडे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सोहम नाईकला अटक केली होती. अटकेवेळी पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला होता, मात्र संशयिताने त्यातील सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ आणि डेटा हटवल्याने सुरुवातीला पोलिसांच्या हाती काहीही लागले नव्हते. तांत्रिक पुराव्यांचे महत्त्व लक्षात घेऊन पोलिसांनी आता तो मोबाईल वेर्णा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठविला आहे. तेथून 'डिलिट' केलेला डेटा पुन्हा मिळवल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आत्तापर्यंत दोन मुली आणि एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून सोहमवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान, गुन्हा शाखेने संशयिताच्या घराची कसून झडती घेतली, मात्र तेथे कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत. शुक्रवारी संशयिताला बाल न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्ह्यातील संशयास्पद भूमिका लक्षात घेऊन चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नव्याने समोर आलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने महिलेशी मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अत्यंत सावधगिरीने तपास करत असून, अधिकाधिक पीडितांनी समोर येण्याचे आवाहन केले जात आहे.

हेही वाचा