कळंगुट खून प्रकरण : संशयिताला सहा दिवसांची पोलीस कोठडी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
37 mins ago
कळंगुट खून प्रकरण : संशयिताला सहा दिवसांची पोलीस कोठडी

म्हापसा: कळंगुट येथील तिवायवाडा भागात झालेल्या राजभर रामदर्शनभाई (२७, रा. सुरत) या युवकाच्या खून प्रकरणी मुख्य संशयित कोमल बारसकर (२८, रा. मध्य प्रदेश) याला म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आयपीएल सट्टेबाजीसाठी गोव्यात आलेल्या या गटात पत्नीच्या छायाचित्रावरून झालेल्या वादातून हा थरार घडला. संशयिताने राजभरचा गेस्ट हाऊसमधून पाठलाग केला व समोरील रिसॉर्टच्या स्विमिंग पूलजवळ गाठले. यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप वार केले, यात राजभरचा जागीच मृत्यू झाला.

कळंगुट पोलिसांनी मुख्य संशयिताला काल शनिवारी ताब्यात घेऊन अटक केली होती. गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या टोळीच्या सट्टेबाजीतील सहभागाची चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित अन्य १४ जणांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली होती. आज त्यांना बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, भविष्यात अशा कृत्यांत सामील न होण्याची ताकीद देऊन वैयक्तिक बॉन्डवर त्यांची सुटका करण्यात आली. 

हेही वाचा