उच्चभ्रू कुटुंबातील महिलांना ओढले जाळ्यात; 'आर्मी ग्रेड' फोनमध्ये लॉक 'त्या' कृत्यांचे पुरावे

५०० कोटींची माया, अघोरी कृत्ये आणि राजकीय कनेक्शनचा खळबळजनक खुलासा; भोंदू खरातला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30 mins ago
उच्चभ्रू कुटुंबातील महिलांना ओढले जाळ्यात; 'आर्मी ग्रेड' फोनमध्ये लॉक 'त्या' कृत्यांचे पुरावे

नाशिक: नाशिकमधील स्वयंघोषित 'कॅप्टन' आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्या अघोरी साम्राज्याचा पर्दाफाश झाल्यानंतर आता दररोज नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. खरात केवळ महिलांचे शोषण करणारा गुन्हेगार नसून, तो अत्यंत हाय-टेक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले काळे कारनामे लपवत असल्याचे उघड झाले आहे. सर्वप्रथम हे प्रकरण उजेडात आणणारे नाशिकचे स्थानिक वृत्तपत्र 'खबरदार पुढारी'चे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी केलेल्या गौप्यस्फोटांमुळे या प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय आणि राजकीय वळण मिळाले असून, तपास यंत्रणांच्या हाती देखील अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत.

'आर्मी ग्रेड' फोन आणि ५८ अश्लील व्हिडिओ

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अशोक खरातचा एक विशेष मोबाईल फोन लागला आहे. हा फोन सामान्य नसून परदेशातून मागवलेला आणि 'आर्मी ग्रेड' सिक्युरिटी फिचर्स असलेला आहे. या फोनमधील डेटा इतका सुरक्षित आहे की, त्याचे लॉक उघडणे सामान्य तंत्रज्ञांना अशक्य आहे. मात्र, फॉरेन्सिक टीमने अथक प्रयत्नांनंतर या फोनमधील डेटा रिकव्हर केला असून, त्यातून खरातने स्वतः चित्रित केलेले ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. विशेष म्हणजे, हे व्हिडिओ कोणत्याही छुप्या कॅमेऱ्याने काढलेले नसून, खरातने स्वतःच्या हाताने पिडीतांवर अत्याचार करताना मोबाईलवरून चित्रित केले होते. सरकारी वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये अनेक बड्या राजकीय नेत्यांचे नंबर 'डमी' नावांनी सेव्ह करण्यात आले आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

५०० कोटींची संपत्ती आणि अघोरी 'शुद्धीकरण'

दत्तात्रय खेमनार यांच्या दाव्यानुसार, खरातची संपत्ती केवळ २०० कोटी नसून ती किमान ५०० कोटी रुपयांच्या घरात आहे. नाशिकमधील आलिशान 'राजमहाल' आणि महागड्या गाड्यांचा ताफा त्याच्या वैभवाची साक्ष देतो. खरात महिलांना "तुझे आयुष्य सुखावह करण्यासाठी तुझे शुद्धीकरण करावे लागेल" असे सांगून त्यांना गुंगीचे पदार्थ मिश्रित पाणी किंवा पेढे द्यायचा. त्यानंतर महिलांची शुद्ध हरपली की तो त्यांच्यावर अघोरी आणि घृणास्पद अत्याचार करायचा. त्याच्याकडे येणाऱ्या क्लायंटमध्ये उच्चभ्रू वर्गातील महिला, आयएएस, आयपीएस अधिकारी आणि राजकारण्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. एका बड्या उद्योजकाला तर त्याने चक्क २० कोटी रुपयांना ब्लॅकमेल करून लुटल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

राजकीय दबाव आणि 'ट्रस्ट' कनेक्शन

या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पत्रकार खेमनार यांनी असा खळबळजनक दावा केला आहे की, खरातच्या आश्रमातील ट्रस्टवर चाकणकर या 'डायरेक्टर' म्हणून कार्यरत होत्या आणि आश्रमाच्या नावाच्या पाटीवर त्यांचे नाव होते. खरातवर पहिली बातमी छापली तेव्हा चाकणकर यांनी स्वतः फोन करून "कॅप्टन खरात 'तसे' नाहीत; चुकीचे काही छापू नका" म्हणत दबाव आणल्याचे आणि कायदेशीर कारवाईची धमकी दिल्याचा आरोप खेमनार यांनी केला आहे. यामुळे आता पोलीस खरात आणि चाकणकर यांच्यातील आर्थिक व्यवहारांची आणि सीडीआरची चौकशी करण्याची शक्यता आहे.

न्यायालयीन कोठडी आणि पुढील तपास

रविवारी अशोक खरातला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी लावून धरली. संशयित चौकशीत सहकार्य करत नाही, प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे देतो आणि महत्त्वाचा डिजिटल डेटा अद्याप रिकव्हर व्हायचा आहे, असा युक्तिवाद वकिलांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत खरातच्या कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. खरात स्वतःला मर्चंट नेव्हीमध्ये 'कॅप्टन' असल्याचे सांगायचा, मात्र त्याचे कोणतेही अधिकृत पुरावे पोलिसांना सापडलेले नाहीत. तो केवळ या नावाचा वापर करून लोकांवर दरारा निर्माण करत असे. आता इन्कम टॅक्स विभाग आणि पोलीस खरातच्या बेनामी मालमत्तेचा आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा शोध घेत आहेत.

हेही वाचा