फोंडा पोटनिवडणूक : विश्वनाथ दळवींच्या सक्रियतेमुळे भाजपच्या प्रचाराला मोठी गती

खांडेपारसह विविध भागांत 'डोअर-टू-डोअर' कॅम्पेनिंग

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
53 mins ago
फोंडा पोटनिवडणूक : विश्वनाथ दळवींच्या सक्रियतेमुळे भाजपच्या प्रचाराला मोठी गती

पणजी : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. विश्वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी यांच्या सक्रिय सहभागामुळे भाजपच्या प्रचाराला सध्या वेग आला असून, कार्यकर्त्यांचे बळ वाढले आहे. दळवी यांनी स्वतः फोंडा आणि खांडेपार परिसरातील विविध भागांमध्ये मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे.



प्रचाराच्या या मोहिमेत दळवी यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारीही मैदानात उतरले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर आणि नगरसेवक शौनक बोरकर यांचा समावेश असून, त्यांनी घरोघरी जाऊन भाजपच्या ध्येयधोरणांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. फोंडा पोटनिवडणुकीत आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजप सध्या संपूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.



मुळात फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचे नेते विश्वनाथ दळवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 'माझ्यावर अन्याय झाला' असे म्हणत त्यांनी सुरुवातीला बंडखोरीचे संकेत दिले होते. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर व संवादानंतर दळवी यांनी अखेर रितेश नाईक यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.




प्रचारादरम्यान गुजराती-पाटीदार समाजाच्या कोपरा बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप उमेदवार रितेश नाईक यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. स्व. रवी नाईक यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी आणि फोंड्याच्या सर्वांगीण विकासासाठी रितेश नाईक यांनाच निवडून आणण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.


हेही वाचा