मेगाप्रकल्पांना बांधकाम परवाना देण्यास चिंबल ग्रामसभेत तीव्र विरोध

जमीन रूपांतरणाचे प्रस्ताव रद्द करण्याचा ठराव संमत; पंचायतीचा अर्थसंकल्प फेटाळला

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
26 mins ago
मेगाप्रकल्पांना बांधकाम परवाना देण्यास चिंबल ग्रामसभेत तीव्र विरोध

पणजी: चिंबल येथील मेगाप्रकल्प तसेच बाहेरील व्यक्तींना बांधकाम परवाना देण्यास स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी झालेल्या ग्रामसभेत जोरदार विरोध दर्शवला. कॅसिनोसह 'कलम ३९ अ' अंतर्गत येणारे जमीन रूपांतरणाचे सर्व प्रस्ताव पंचायत पातळीवरच फेटाळण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून, त्याबाबतचे ठरावही संमत करण्यात आले आहेत.

मागील १५ मार्च रोजी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा ठरल्याप्रमाणे रविवारी खुल्या जागेत पार पडली. मात्र, सभेतील पोलिसांची उपस्थिती, जागा मालकाची परवानगी न घेता सभेचे आयोजन आणि मेगाप्रकल्पांचे वाढते प्रस्थ या मुद्द्यांवरून ही सभा चांगलीच गाजली. अ‍ॅड. गोविंद शिरोडकर आणि अजय खोलकर यांनी विविध प्रश्न उपस्थित करून सरपंच संदेश शिरोडकर व पंच सदस्यांना धारेवर धरले. विशेष म्हणजे, पंचायतीने तयार केलेला २०२६-२७ चा वार्षिक अर्थसंकल्प ग्रामस्थांनी हरकती घेत फेटाळून लावला. आता हा सुधारित अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी एप्रिलमध्ये पुन्हा विशेष ग्रामसभा बोलावली जाणार असल्याची माहिती सरपंचांनी दिली.

अडवलपालकर कन्स्ट्रक्शनसह इतर मेगाप्रकल्पांना देण्यात आलेल्या परवान्यांवर सभेत वादळी चर्चा झाली. यापुढे पंचायतीने कोणत्याही मेगाप्रकल्पाला किंवा बाहेरील व्यक्तीला बांधकाम परवाना देऊ नये, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. त्याऐवजी स्थानिक ग्रामस्थांना २०० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावर एक मजली घरासाठी परवाने देण्यास प्राधान्य द्यावे, असा ठराव संमत झाला.

नगरनियोजन कायद्याच्या 'कलम ३९ अ' अंतर्गत होणाऱ्या जमीन रूपांतरणाच्या कोणत्याही प्रस्तावाला पंचायतीने कडाडून विरोध करावा आणि असे प्रस्ताव सुरुवातीलाच फेटाळावेत, अशी मागणी अ‍ॅड. गोविंद शिरोडकर यांनी मांडली, ज्याला महेश कुंकळकर यांनी अनुमोदन दिले. याव्यतिरिक्त, रायबंदर येथे बांधण्यात येणाऱ्या जेटीमुळे भविष्यात कॅसिनो येण्याची शक्यता वर्तवत, चिंबलवासीयांनी कॅसिनो संस्कृतीलाही आपला ठाम विरोध दर्शवला.

हेही वाचा