
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि 'पद्यभूषण' पुरस्काराने सन्मानित डॉ. विजयपत सिंघानिया यांचे मुंबईत निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. सिंघानिया यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून ही माहिती देण्यात आली आहे.
रेमंड समूहाचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी 'X' (ट्विटर) वर वडिलांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, "अत्यंत जड अंतकरणाने सर्वांना कळवण्यात येते की माझे वडील, पद्मभूषण डॉ. विजयपत कैलाशपत सिंघानिया यांचे निधन झाले आहे. ते दूरदृष्टी, उदारता आणि प्रेरणादायी नेतृत्व यांचा अद्वितीय संगम होते. त्यांचे महान व्यक्तिमत्त्व पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील."
डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी ३ वाजता मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आशादेवी सिंघानिया, मुले मधुपती सिंघानिया, गौतम सिंघानिया आणि मुलगी शेफाली रुईया असा परिवार आहे.
रेमंड समूहाला जागतिक फॅशन उद्योगात भक्कम स्थान मिळवून देण्यात त्यांचे योगदान विलक्षण होते. ४ ऑक्टोबर १९३८ रोजी जन्मलेल्या सिंघानिया यांनी १९८० मध्ये रेमंड समूहाची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर त्यांनी वस्त्रोद्योगासह पोलाद आणि हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रांत विस्तार करून समूहाला नवीन उंचीवर नेले.
उद्योगजगतासोबतच ते एक निष्णात वैमानिक म्हणूनही प्रसिद्ध होते. 'हॉट एअर बलून'मधून सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रमही त्यांच्या नावे आहे. त्यांच्या उद्योग आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन २००६ मध्ये भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरवले होते. दोन दशकांहून अधिक काळ रेमंडचे नेतृत्व केल्यानंतर त्यांनी २००० मध्ये कंपनीची सूत्रे मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली होती.