दोन धरणांत पाणी असूनही नागरिकांना भेडसावतेय पाणी टंचाई

पैंगीण : काणकोण तालुक्यात ‘चापोली’ आणि ‘गवाणे’ अशी दोन धरणे असतानाही पाण्याचा पुरवठा अत्यंत अनियमित आहे. जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने काणकोणात पाणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे श्रीस्थळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवराज देशमुख यांनी सांगितले.
काणकोण पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, ‘चापोली’ धरण हे तालुक्याचा प्रमुख पाणीस्त्रोत आहे. तर ‘गवाणे’ धरण हे गावडोंगरी येथे असून परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आले आहे. मात्र, या धरणाशी संबंधित पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने आसपासच्या भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
तालुक्यात ठिकठिकाणी भेडसावणारी पाण्याची टंचाई आणि वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या सहा दिवसांपासून ‘चार-रस्ता’ परिसरातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, चापोली आणि गवाणे येथे पुरेसा जलसाठा उपलब्ध असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.
२०२६ च्या सुरुवातीपासूनच तालुक्यात जलवाहिन्या फुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. श्रीस्थळ, मोखर्ड आणि मास्तीमोळ या भागांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे आढळून आले आहे.
मास्तीमोळचे नगरसेवक पांडुरंग नाईक गावकर यांनी सांगितले की, गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे, तर दुसरीकडे नागरिकांचे नळ कोरडेच राहतात. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
काही भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाण्याची टंचाई कायम आहे.
तक्रारी करूनही कामे संथगतीने!
अनेकदा तक्रारी करूनही दुरुस्तीची कामे संथगतीने केली जातात किंवा लांबणीवर टाकली जातात. परिणामी, नागरिकांना पाण्याच्या टँकर्सवर किंवा इतर असुरक्षित स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. नगर्से ते चार-रस्ता (पाळोळे) दरम्यानची पाण्याची वाहिनी वारंवार फुटत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हा प्रकार म्हणजे जनतेच्या पैशाचा उघड अपव्यय असल्याचे श्रीस्थळचे माजी सरपंच किसान नाईक गावकर यांनी सांगितले.