दोन किलो गांजा जप्त : ‘एसआयआयबी’ची कारवाई

पणजी : आंतरराष्ट्रीय पोस्टामार्फत विदेशातून पार्सलद्वारे अमली पदार्थ मागविल्याप्रकरणी मुंबई कस्टमच्या स्पेशल इंटिलिजेंस अॅन्ड इन्व्हेस्टिगेशन ब्रँच (एसआयआयबी)च्या अधिकाऱ्यांनी केपे पोलिसांच्या मदतीने अवेडे–पारोडा येथील अॅडविन डिकॉस्टा या युवकाला अटक केली. त्याच्याकडून एकूण २ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विदेशातून आलेले एक पार्सल संशयास्पद वाटल्याने एसआयआयबी अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. तपासणीदरम्यान त्या पार्सलमध्ये १ किलो गांजा आढळून आला. त्यानंतर तो जप्त करून गुन्हा नोंदविण्यात आला.
या पार्सलवर अवेडे–पारोडा येथील अॅडविन डिकॉस्टा याचे नाव असल्याचे उघड झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बनावट पार्सल तयार करून ते डिकॉस्टाच्या नावाने पुढे पाठविण्यात आले.
यानंतर एसआयआयबीचे अधिकारी गोव्यात दाखल झाले आणि केपे पोलिसांची मदत घेतली. पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली केपे पोस्ट कार्यालयात सापळा रचण्यात आला. पार्सल घेण्यासाठी आलेल्या अॅडविन डिकॉस्टा याला ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर त्याच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. या छाप्यात आणखी २ किलो गांजा जप्त करण्यात आला. पुढील चौकशीसाठी अॅडविन डिकॉस्टा याला मुंबईला नेण्यात आले असून, या प्रकरणाची पुढील तपासणी एसआयआयबीकडून सुरू आहे