सोहमच्या अटकेसाठी हस्तांतरण वाॅरंटची गुन्हा शाखेकडून मागणी

आज फैसला : बाल न्यायालयात करणार हजर


30th March, 11:52 pm
सोहमच्या अटकेसाठी हस्तांतरण वाॅरंटची गुन्हा शाखेकडून मागणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कुडचडे येथील अल्पवयीन मुली आणि युवतींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने गोवा हादरून गेला अाहे. या प्रकरणात अटक केलेला संशयित सोहम नाईक याला पोलीस कोठडीसाठी मंगळवार, ३१ रोजी बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात सोहमला अटक करण्यासाठी हस्तांतरण वाॅरंटची गुन्हा शाखेने मागणी केली आहे.
कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरण २२ मार्च रोजी उघडकीस आले होते. प्रकरणाची दखल घेऊन कुडचडे पोलिसांनी एका तक्रारीवरून गुन्हा दाखल करून संशयित सोहमला अटक केली होती. त्यानंतर इतर दोन मुलींनी तक्रार दिल्याने त्याच्यावर पॉक्सो आणि गोवा बाल कायद्याअंतर्गत दोन गुन्हे नोंदवण्यात आले. याच दरम्यान, हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले. प्रथम गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर इतर दोन गुन्ह्यांचा तपास निरीक्षक महेश गडेकर आणि विकास दयेकर करत आहेत. याच दरम्यान १४ वर्षीय मुलीने गुन्हा शाखेत तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन महिला उपनिरीक्षक संध्या गुप्ता यांनी संशयित सोहमवर पॉक्सो आणि गोवा बाल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बाल न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
संशयित सोहमची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. त्यानुसार, संशयित सोहमला मंगळवारी बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, उपनिरीक्षक संध्या गुप्ता यांनी सोहमच्या पोलीस कोठडीसाठी बाल न्यायालयात हस्तांतरण अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी बाल न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. गुन्हा शाखेने सोहमची दुसऱ्या प्रकरणात पोलीस कोठडी घेण्याची तयारीही ठेवली आहे, अशी माहिती समोर आली आहे.