एक ठार, एक गंभीर जखमी : कारचालकाला पोलिसांकडून अटक

म्हापसा : थिवी येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याने झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी कार चालक यल्लाप्पा संतोष राऊत (३८, रा. पेडे-म्हापसा) याला अटक केली आहे.
सोमवारी (दि. ३०) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास लोबोवाडा, थिवी येथील हुंडाई शोरूमजवळ हा अपघात घडला. संशयित जीए ०३ एएफ ९८३० क्रमांकाची टाटा हेरिअर कार भरधाव वेगाने व डुलक्या घेत चालवत असताना समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना त्याने जोरदार धडक दिली. या धडकेत पहिल्या स्कूटरवरील दिव्यांश सिंग व त्याच्यासोबत मागे बसलेले सचिन चाचिया तसेच दुसऱ्या दुचाकीवरील रजत हळर्णकर हे तिघेही गंभीर जखमी झाले. यात दिव्यांश सिंग याच्या डोक्याला व शरीराला गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदत करत जखमींना रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. यामध्ये सचिन चाचिया याच्यावर उपचार सुरू असून रजत हळर्णकर याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या अपघाताचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र साटेलकर व सहाय्यक उपनिरीक्षक अनिल पिळगावकर यांनी केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजित कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
बेदरकारपणे कार चालवून अपघात
प्राथमिक तपासात आरोपी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. वाहन चालवताना कोणतीही खबरदारी न घेता बेदरकारपणे गाडी चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १०५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.