मंत्री दिगंबर कामत : नागरी पुरवठा खाते, हॉटेल असोसिएशनसोबत बैठक

हॉटेल व्यावसायिक असोसिएशनसोबत चर्चा करताना मंत्री दिगंबर कामत, नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी.
मडगाव : दक्षिण गोवा हॉटेल असोसिएशनचे बहुतांशी प्रश्न मार्गी लावलेले आहेत. नोंदणीकृत नसलेल्या आस्थापनांना नोंद करण्यास सांगितले. आता ४० टक्के व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होणार असून, सरकारी निर्देशानुसार सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येतील, असे मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.
दक्षिण गोवा हॉटेल व रेस्टॉरंट मालक असोसिएशन यांच्याकडून वेळेत गॅस सिलिंडर मिळत नाहीत, अशी तक्रार आलेली होती. त्यानुसार मंत्री दिगंबर कामत यांनी नागरी पुरवठा खात्याचे संचालक, सचिव, गॅस कंपनींचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेतली. मंत्री कामत यांनी सांगितले की, काही रेस्टॉरंट व्यावसायिकांची सिलिंडर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी होत्या. याबाबत माहिती घेतली असता काही व्यावसायिक एजन्सींकडे नोंदणीकृत नसल्याचे समजले. या बैठकीत रेस्टॉरंट व हॉटेल व्यावसायिकांच्या ज्या समस्या होत्या त्यावर चर्चा करून त्यातील बहुतांशी सोडवण्यात आल्या. जे नोंदणीकृत नाहीत, त्यांना दोन दिवसांत कागदपत्रे देउन नोंदणी करण्यास सांगितले असून, नोंदणी झाल्यानंतर त्यांना सरकारच्या निर्देशानुसार सिलिंडर उपलब्ध केले जातील, असे स्पष्ट केले.
असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पै यांनी सांगितले की, मंत्री कामत यांनी आश्वासन दिल्यानुसार नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नॅचरल गॅस वाहिनीच्या जोडणीबाबत व दरांबाबत माहिती दिली. वाहिनी उपलब्ध असलेल्या ठिकाणी जोडणी घेण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले. तसेच कंपनीकडे नोंद असलेल्या आस्थापनांना तत्काळ दरदिवशी एक सिलिंडर उपलब्ध करण्यात येतील, असेही आश्वासन देण्यात आल्याचे पै यांनी सांगितले.