शेतकरी संकटात : टनांच्या टन भाजीपाला कचऱ्यात, हॉटेल-रेस्टॉरंट बंद

जोयडा : कर्नाटकातील बेळगाव येथील एपीएमसी घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दरात झालेल्या अभूतपूर्व घसरणीचे पडसाद आता गोवा राज्यातही उमटू लागले आहेत. गोव्याच्या बाजारपेठेसाठी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पुरवठा करणाऱ्या बेळगाव बाजारात मागणी कोसळल्याने शेतकरी आणि व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
सध्या बेळगाव एपीएमसी यार्डमध्ये मुळा, टोमॅटो, गाजर, कोबी, फ्लॉवर आणि घेवड्याच्या शेंगांचे मोठमोठे ढीग साचलेले दिसत आहेत. खरेदीदार नसल्याने हा भाजीपाला विक्रीअभावी कुजत असून अखेरीस महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तो कचरा डेपोत टाकावा लागत आहे. या परिस्थितीमुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, मध्य-पूर्वेतील तणाव आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स व रेस्टॉरंट्स पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. याचा थेट परिणाम गोव्यासारख्या पर्यटनाधारित राज्यावर झाला आहे. गोव्यातील अनेक हॉटेल्स आणि खानावळी बंद किंवा अर्धवट सुरू असल्याने भाजीपाल्याची मागणी अचानक घटली आहे. परिणामी, बेळगावहून गोव्याकडे जाणारा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
बेळगाव एपीएमसीतील व्यापारी परशुराम झंगरुचे म्हणाले, यार्डमध्ये खरेदीदारच नाहीत. मोठे ग्राहकच नसल्याने भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. दरम्यान, भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. गाजराचा दर ५०-६० रुपयांवरून १०-१२ रुपयांवर, टोमॅटो ३० वरून १० रुपयांवर, तर हिरवी मिरची ७०-८० वरून ३५-४० रुपयांवर आली आहे. कोथिंबिरीची जुडी केवळ ३-४ रुपयांना विकली जात आहे. कांदा व बटाट्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.
कडोली गावातील शेतकरी व माजी सैनिक सूरज कटांबळे यांनी सांगितले, वाहतूक खर्चही निघत नाही. बियाणे, खते, मजुरी यावर मोठा खर्च करूनही काहीच हातात राहत नाही. सध्याच्या परिस्थितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना काही काळ पिके काढू नयेत, असा सल्ला दिला जात आहे. आता माल आणल्यास केवळ तोटा होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
गोव्याच्या बाजारपेठेवरही परिणाम
गोव्यातील बाजारपेठेत सध्या भाजीपाल्याचा पुरवठा अनियमित झाला असून, काही ठिकाणी दर कमी झाले असले तरी उपलब्धता अस्थिर आहे. पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय पूर्णपणे सुरळीत न झाल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.