पुण्यात बलात्काराचा गुन्हा, गोव्यातील ऐतिहासिक 'हात कातरो' खांबाबाबत केलेली पोस्ट उजेडात

मुंबई/ पुणे/ पणजी : धर्माच्या नावाखाली उच्छाद मांडणाऱ्या आणि वासनेचा बाजार भरवणाऱ्या भोंदू बाबांच्या पापांचा घडा आता भरला आहे. योगायोगाने 'मार्च एंड'च्या काळात जेव्हा हिशेब पूर्ण केले जातात, तेव्हाच या भोंदूंच्या कर्मांचा हिशेब घेण्याचे कामही कायद्याने सुरू केले आहे. सध्या नाशिकचा कॅप्टन अशोक खरात आणि वसईचा ऋषिकेश श्रीकांत वैद्य यांच्या 'हैदोस' कथांनी समाजमन सुन्न झाले असून, श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमेवर उभ्या असलेल्या सामान्य माणसाला आता भानावर येण्याची वेळ आली आहे. नाशिकचे प्रकरण ताजे असतानाच वसईतील 'आमची वसई' या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य याच्या विकृत कृत्यांच्या पोथ्या समाजासमोर उडल्या पडल्या आहेत.

ऋषिकेश वैद्य याने स्वतःला साक्षात 'शंकराचा अवतार' घोषित करून एका ३५ वर्षीय विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मी शंकराचा अवतार आणि तू माझी पार्वती आहेस, असे भासवून त्याने अध्यात्माच्या नावाखाली त्या महिलेचा विश्वास संपादन केला. पीडित महिला पुण्यातील असून तिची ओळख २०२३ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून या नराधमाशी झाली होती. वैद्य याने स्वतःला धर्मगुरू आणि समाजसेवक म्हणून सादर करत तिच्या धार्मिक वृत्तीचा गैरफायदा घेतला. डिसेंबर २०२३ मध्ये तो पीडितेला भेटण्यासाठी पुण्यात गेला आणि तिथे एका लॉजवर तिला थंड पेयातून गुंगीकारक अमली पदार्थ देऊन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला.
गुन्ह्याचा हा सिलसिला केवळ अत्याचारावरच थांबला नाही, तर एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्याने पीडितेचे अश्लील छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. याच छायाचित्रांचा धाक दाखवून त्याने मे २०२५ मध्ये तिला वसईतील एका आलिशान हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा नाशिकमधील अशोक खरातच्या भोंदूगिरीचे प्रकरण प्रसारमाध्यमांवर झळकले, तेव्हा पीडितेने धीर एकवटला. तिने आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली आणि बुधवारी रात्री वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात दाद मागितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल केला आहे, मात्र तांत्रिक कारणास्तव हे प्रकरण आता पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

ऋषिकेश वैद्य हा वसई परिसरात 'गुरुजी' म्हणून वावरत होता. पूजा-पाठ, आध्यात्मिक प्रवचने आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आडून त्याने तरुण-तरुणींना आणि विशेषतः महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. त्याची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती; मागील वर्षी तो गोव्यातील जुने गोवे येथील 'हातकातरो खांब' येथेही गेला होता. तिथे पोर्तुगीजांच्या अत्याचाराचा पाढा वाचताना त्याने धर्मावर मोठी व्याख्याने दिली होती, याबाबत त्याने फेसबुकवर पोस्ट शेअर केला होता. हे सर्व केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःची 'धार्मिक इमेज' बनवण्यासाठी रचलेले एक जाळे होते, हे आता स्पष्ट झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या भोंदूगिरीचे संकेत ८ वर्षांपूर्वीच मिळाले होते. नालासोपाऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते भूपेश पाटील यांनी २०१८ मध्येच ऋषिकेश वैद्य हा भोंदू असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी एका मुलावर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता, परंतु बदनामीच्या भीतीने संबंधित मुलाच्या पालकांनी माघार घेतली होती. आरोपीचा मोठा भाऊ वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य हा देखील पुरीच्या शंकराचार्यांचा शिष्य असल्याचा खोटा दावा करत असे. प्रत्यक्षात त्या पीठाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही बंधू घरगुती पूजा करण्यासाठी २५ ते ४० हजार रुपये उकळून लोकांची आर्थिक लूटही करत असल्याचा आरोप आता समोर येत आहे.

कायद्याने या नराधमाच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असली तरी, 'शिव-पार्वती'च्या नावाने वासनेचा खेळ मांडणाऱ्या या भोंदूच्या मागे जाणाऱ्या भक्तगणांनी आता आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. धर्माचे उपरणे ओढून अधर्मी कृत्ये करणाऱ्या या लोकांमुळे खऱ्या अध्यात्माची प्रतिमा मलिन होत आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या भोंदू बाबाच्या जाळ्यात अजून किती महिला अडकल्या आहेत आणि त्याच्या 'आमची वसई' संस्थेच्या आडोशाने नेमके काय चालत होते, याचे गुपित लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.