पेन्ह-दी-फ्रान्समधील जमीन व्यवहार; वाराणसीच्या व्यावसायिकाची १६ कोटींची मोठी फसवणूक

बनावट कागदपत्रे आणि दुसऱ्याची जमीन आपली असल्याचे भासवून घातला गंडा; उत्तर गोव्यातून दोघांना अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13 mins ago
पेन्ह-दी-फ्रान्समधील जमीन व्यवहार; वाराणसीच्या व्यावसायिकाची १६ कोटींची मोठी फसवणूक

पणजी : निसर्गसंपन्न गोव्यातील जमिनींचे वाढते भाव आणि त्यातून मिळणारा नफा या मोहापायी परराज्यातील बड्या व्यावसायिकांना लक्ष्य करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पेन्ह-दी-फ्रान्स येथील एका जमिनीच्या व्यवहारात वाराणसी येथील बांधकाम व्यावसायिक अनुराग कुशवाहा आणि त्यांच्या भागीदारांची १६.६२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील भेलूपुर पोलिसांनी गोव्यातून दोन संशयितांना अटक केली असून, त्यांना रविवारी वाराणसी न्यायालयात हजर करण्यात आले.

या प्रकरणाचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा फिर्यादी अनुराग कुशवाहा आपल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी गोव्यात पोहोचले. वाराणसीच्या दुर्गाकुंड येथील रहिवासी असलेल्या कुशवाहा यांना अमित कुमार सिन्हा नामक व्यक्तीने फोनवरून संपर्क साधला होता. 'व्हिटोरिया जोस वेल्हो' नावाच्या व्यक्तीची पेन्ह-दी-फ्रान्स येथील मौल्यवान जमीन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. संबंधित मालक कॅनडामध्ये असून त्याला व्यवसायात नुकसान झाल्याने तो तातडीने जमीन विकत आहे, असे आमिष दाखवून संशयितांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

या व्यवहारासाठी वाराणसीच्या तेलियाबाग येथील कार्यालयात प्राथमिक चर्चा झाली आणि त्यानंतर गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आली. संशयितांनी जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून ती व्हिटोरिया जोस वेल्हो याच्या मालकीची असल्याचे भासवले. १६.६२ कोटी रुपयांची पूर्ण रक्कम दिल्यानंतर जेव्हा कुशवाहा जमिनीवर ताबा घेण्यासाठी गेले, तेव्हा तिथे एका महिलेने या जमिनीवर आपला हक्क असल्याचे सांगितले. तपासाअंती ती जमीन प्रत्यक्षात संशयितांच्या मालकीची नव्हतीच, तर केवळ बनावट कागदपत्रांच्या आधारे हा सावज टिपला गेल्याचे उघड झाले.

पैसे परत मागितले असता संशयितांनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर भेलूपुर पोलीस ठाण्याचे प्रभारी सुधीर त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोव्यात धाव घेत प्रजय प्रसन्ना शिरोडकर (पर्वरी) आणि अमित कुमार सिन्हा (मूळचा डेहराडून, सध्या करंजाळे-गोवा) या दोघांना अटक केली. या प्रकरणात 'व्हिटोरिया जोस वेल्हो' नावाची व्यक्ती, डॉ. अमित कुमार सिंह आणि सीए प्रमोद पटेल यांचाही सहभाग असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. जमिनींच्या वाढत्या व्यवहारांमध्ये अशा प्रकारे बनावट कागदपत्रे आणि 'इंपर्सोनेशन' (दुसऱ्याच्या नावाने वावरणे) करून फसवणूक करणाऱ्या या टोळीने अन्य कोणाला शिकार बनवले आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

हेही वाचा