प्रेयसीचे तुकडे करून फ्रिजमध्ये लपवले; नौदल कर्मचाऱ्याचे विशाखापट्टणममध्ये क्रूर कृत्य

ऑनलाईन कटर मागवून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
6 mins ago
प्रेयसीचे तुकडे करून फ्रिजमध्ये लपवले; नौदल कर्मचाऱ्याचे विशाखापट्टणममध्ये क्रूर कृत्य

विशाखापट्टणम : माणुसकीला काळिमा फासणारी आणि कोणत्याही क्राईम थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल अशी एक भीषण घटना विशाखापट्टणमच्या गजुवाका परिसरात उघडकीस आली आहे. भारतीय नौदलात तंत्रज्ञ (टेक्नीशियन) म्हणून कार्यरत असलेल्या एका विवाहित कर्मचाऱ्याने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयिताने पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचा काही भाग फ्रिजमध्ये, तर काही भाग बेडखाली लपवून ठेवला होता. 

या प्रकरणातील संशयित ३० वर्षीय चिंतादा रवींद्र हा आयएनएस डेगा (INS Dega) वर कार्यरत आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून गजुवाका येथील एलव्ही नगरमध्ये एका भाड्याच्या घरात आपल्या कुटुंबासह राहत होता. रवींद्रची ओळख २०२१ मध्ये एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून २८ वर्षीय पोलिपल्ली मौनिका हिच्याशी झाली होती. रवींद्र विवाहित असूनही मौनिका आणि त्याचे प्रेमसंबंध होते. दरम्यान, रवींद्रच्या पत्नीने काही आठवड्यांपूर्वीच एका बाळाला जन्म दिला होता आणि ती सध्या आपल्या माहेरी गेली होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून रवींद्रने रविवारी, २९ मार्च रोजी मौनिकाला आपल्या घरी बोलावले. मात्र, याच भेटीदरम्यान दोघांमध्ये पैशांच्या व्यवहारावरून आणि संबंधांच्या गुंतागुंतीवरून तीव्र वादावादी सुरू झाली.

रवींद्रच्या दाव्यानुसार, मौनिकाने त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले होते आणि जेव्हा त्याने पैशांची मागणी केली, तेव्हा तिने त्यांच्या अवैध संबंधांची माहिती त्याच्या पत्नीला देण्याची धमकी दिली. याच रागाच्या भरात रवींद्रने आपला संयम गमावला आणि मौनिकाचा गळा आवळून तिचा खून केला. रवींद्रने हा गुन्हा लपवण्यासाठी अत्यंत थंड डोक्याने नियोजन केले. तो सुरुवातीला नजीकच्याच एका स्टोअरमध्ये धारदार चाकू शोधण्यासाठी गेला, पण तिथे शस्त्र न मिळाल्याने त्याने ऑनलाईन कटर आणि करवतीची ऑर्डर दिली. या हत्यारांच्या साहाय्याने त्याने मौनिकाच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले.

क्रूरतेची सीमा ओलांडत रवींद्रने मृतदेहाचा वरचा भाग घरातील फ्रिजमध्ये टाकून दिला, तर खालचा भाग एका पोत्यात भरून बेडखाली लपवून ठेवला. इतकेच नव्हे, तर मृतदेहाचा तिसरा भाग म्हणजेच डोके आणि हात त्याने एका निर्जन ठिकाणी नेऊन जाळून टाकले. ज्यावेळी या फ्लॅटच्या भिंतींमागे हा अंगावर काटा आणणारा थरार सुरू होता, त्यावेळी शेजारील रहिवाशांना याची पुसटशी कल्पनाही आली नाही. शेजाऱ्यांच्या मते, तिथून कधीही कोणताही आवाज आला नाही, उलट तिथे नेहमीप्रमाणेच शांतता होती.

मात्र, गुन्हा लपवण्याचे सर्व प्रयत्न करूनही रवींद्रच्या मनातील अपराधीपणाची भावना त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने आपल्या एका जवळच्या मित्राला फोन करून या साऱ्या कृत्याची कबुली दिली. मित्राने त्याला पळून जाण्याऐवजी कायद्यासमोर शरणागत होण्याचा सल्ला दिला. अखेर सोमवारी, ३० मार्च रोजी रवींद्रने स्वतःहून गजुवाका पोलीस स्थानकात हजर होऊन आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास केला असता, त्यांना फ्रिज आणि बेडखाली मृतदेहाचे अवशेष आणि रक्ताने माखलेली शस्त्रे सापडली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून मृतदेहाचे अवशेष उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

हेही वाचा