
पणजी: कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यान तयार झालेला द्रोणीय पट्टा (Trough line) आणि इतर वातावरणीय बदलांमुळे राज्यात आज, उद्या आणि परवा (१ एप्रिल) रोजी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या तीन दिवसांत दुपारनंतर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. सोमवारी राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण होते, मात्र कमाल आणि किमान तापमानातील वाढीमुळे असह्य उकाडा कायम जाणवला.
सोमवारी पणजीत कमाल ३४.३ अंश, तर किमान २५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमध्ये कमाल तापमान ३४ अंश आणि किमान २४.८ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३४ अंश, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच, २ ते ५ एप्रिल दरम्यान राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांत राज्यातील विविध भागांत ढगाळ वातावरण होते, तर सत्तरी तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने मार्च ते मे या कालावधीत गोव्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आधीच वर्तवली होती. या काळात राज्यात सरासरी इतका किंवा त्याहून किंचित कमी पाऊस पडण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.