
मडगाव: सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादने प्रतिबंधक कायद्याचे (कोटपा) उल्लंघन केल्याप्रकरणी, ३० मार्च रोजी केपे तालुका सक्तवसुली पथकाने बाळ्ळी परिसरात धडक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान एकूण ११ आस्थापनांवर कारवाई करून २,२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळ्ळी येथील सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये 'कोटपा' कायद्याच्या कलम ४ चे उल्लंघन होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. नियमांचे पालन न करणाऱ्या या ११ आस्थापनांना प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे दंड ठोठावण्यात आला असून तशी चलने जारी करण्यात आली आहेत. ही कारवाई केपेचे संयुक्त मामलेदार सुरेंद्र गावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या सक्तवसुली पथकात बाळ्ळीच्या तलाठी रसिका गौरव, कुंकळ्ळी पोलीस उपनिरीक्षक सुहास वेळीप, दत्तराम वेळीप, बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्वच्छता निरीक्षक लक्ष्मीकांत पागी आणि 'गोवकॅन'च्या सचिव लॉर्ना फर्नांडिस यांचा समावेश होता. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी आणि नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. भविष्यातही अशा प्रकारची कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.