
पणजी: पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात आणि उपमहापौरपदी वसंत आगशीकर यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. सलग सहाव्यांदा महापौर बनण्याचा बहुमान मिळवत रोहित मोन्सेरात यांनी नवा इतिहास रचला आहे. महापौरपदाच्या या कार्यकाळात पणजीतील प्रलंबित समस्या सोडवण्यासोबतच निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी निवडीनंतर स्पष्ट केले. तत्पूर्वी, महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्या पदाची शपथ घेतली.
निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना रोहित मोन्सेरात म्हणाले की, पणजीतील जनतेने आम्हाला पुन्हा निवडून देऊन जनसेवा करण्याची मोठी संधी दिली आहे. मागील कार्यकाळातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर आमचा भर असेल. शहरातील पे-पार्किंग आणि वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील. वाहतूक कोंडीबाबत आम्ही वाहतूक पोलिसांची भेट घेतली असून, या समस्येवर काय उपाययोजना करता येतील, याबाबत त्यांच्याकडून तांत्रिक शिफारसी मागवल्या आहेत. आगामी सहा महिन्यांत ही समस्या लक्षणीयरीत्या कमी करण्याचे आमचे प्रयत्न राहतील.
सुरुवातीच्या टप्प्यात कॅसिनो परिसरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले. स्मार्ट सिटीची कामे पूर्ण झाली असताना, पीएनजीच्या पाईपलाईनसाठी पुन्हा रस्ते खोदण्यास आमचा विरोध आहे. मात्र, नागरिकांच्या सुविधेसाठी इतर पर्यायी उपाययोजनांबाबत आम्ही विचार करू. आमचे प्रशासन पणजीतील सामान्य जनतेच्या हिताला प्रथम प्राधान्य देईल, असे आश्वासन मोन्सेरात यांनी दिले.
महापौर निवडीनंतर महापालिकेच्या विविध वैधानिक समित्यांचीही निवड करण्यात आली:
स्थायी समिती: रोहित मोन्सेरात, विठ्ठल चोपडेकर, रुपेश हळर्णकर, उदय मडकईकर, कबीर मखिजा आणि निकिता नाईक.
बाजार समिती: कॅरोलिना पो, अस्मिता केरकर, किशोर शास्त्री, कीर्ती साखळकर, सिल्वेस्टर फर्नांडिस आणि विद्या गडकर.
सार्वजनिक बांधकाम समिती: शुभम चोडणकर, प्रसाद आमोणकर, करण पारेख, युतिका झांबवलीकर, वर्षा शेट्ये आणि तुकाराम चिन्ननावर.