दरवाजा उघडण्यावरून जुंपले आणि रागाच्या भरात सख्ख्या भावाचा गळा चिरण्याचा प्रयत्न; संशयित गजाआड

डिचोली / पणजी : मये येथील हळदणवाडी भागात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत थरारक घटना रविवारी रात्री उशिरा घडली. किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले आणि एका भावाने दुसऱ्या भावावर सुरीने सपासप वार करून त्याला मृत्यूच्या दारात ढकलले. या जीवघेण्या हल्ल्यात ३८ वर्षीय सागर गुरुदास माईणकर गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित संशयित संजय गुरुदास माईणकर (वय ४४) याला बेड्या ठोकल्या आहेत.
वादाची ठिणगी आणि रात्रीचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित संजय आणि त्याचा धाकटा भाऊ सागर यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता. रविवारी रात्री साडेनऊ ते अकराच्या सुमारास संजय आपल्या जुन्या घरी आला. यावेळी सागरने घराचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. यामुळे दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर संतापात झाले आणि संजयने रागाच्या भरात घरातून सुरी आणून सागरवर जीवघेणा हल्ला चढवला. संजयने सागरच्या शरीराच्या अत्यंत नाजूक भागांवर आणि गळ्याच्या आसपास सुरीने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरची आर्त हाक ऐकून परिसरातील लोक धावून आले, तोपर्यंत संजयने तेथून पळ काढला होता.
तक्रार आणि पोलिसांचा सापळा
जखमी सागरची पत्नी स्वरा सागर माईणकर, जी गोमेकॉमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे, तिने या घटनेची तक्रार डिचोली पोलीस स्थानकात दाखल केली. स्वरा सध्या आपल्या माहेरी राहत असून, पतीवर झालेल्या या हल्ल्याने तिला मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासचक्र फिरवले. सोमवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास संशयित संजय माईणकर याला तो ज्या ठिकाणी लपला होता त्या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय हा पेशाने ड्रायव्हर असून त्याने जाणीवपूर्वक आणि खुनाच्या उद्देशानेच हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
कायदेशीर कारवाई आणि तपास
डिचोली पोलिसांनी संशयित संजयविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) च्या कलम १०९ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर व डिचोलीच्या उपअधीक्षक श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस उपनिरीक्षक (PSI) आकाश परवार करत आहेत. भरवस्तीत आणि सख्ख्या भावांमध्ये घडलेल्या या खुनी हल्ल्यामुळे संपूर्ण डिचोली तालुका हादरला आहे.